Core include appears below:
प्रेरणादायी व्यक्तिमत्वं असणाऱ्या 100 प्रभावशाली महिलांची यादी बीबीसीने प्रकाशित केली आहे.
यामध्ये संगीत क्षेत्रातील बिली आयलिश, युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सेल्मा ब्लेअर, 'रशियन पॉपच्या झारिना' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅला पुगाचेवा, इराणच्या क्लाईंबर एल्नाज रकाबी, ट्रिपल जम्पमध्ये रेकॉर्ड नोंदवणाऱ्या अॅथलीट ज्युलिमान रोहास, घानाच्या लेखिका नॅना दारकोआ सेकियामा यांचा समावेश आहे.
100 विमेन यादी जाहीर करण्याचं हे दहावं वर्षंं आहे आणि यानिमित्ताने आढावा घेऊयात गेल्या 10 वर्षांतल्या प्रगतीचा. एकीकडे महिला हक्कांच्या दृष्टीने बरीच सुधारणा झालेली आहे. महिला नेत्यांनी ची संख्या वाढली आहे, MeToo सारख्या मोहीमा अन्यायाला वाचा फोडत आहेत. पण असं असलं तर जगाच्या अनेक भागांमध्ये अजूनही महिलांसाठी प्रगतीचा मार्ग खडतर आहे.
या यादीमध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्या 2022 या वर्षात जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांमध्ये केंद्रस्थानी आहेत. इराणमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शूरपणे आंदोलन करणाऱ्या महिला, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्ष आणि लढ्यामध्ये ठामपणे उभ्या राहणाऱ्या महिला या यादीत आहेत. पहिल्यांदाच आम्ही यापूर्वी बीबीसीच्या 100 विमेन यादीत ज्यांचं नाव होतं, अशांनाही 2022 च्या यादीसाठी नामांकन करण्यास सांगितलं आहे.
विद्यार्थी
अफगाणची किशोरवयीन फातिमा अमिरी ही काबुलमधील शिकवणी केंद्रावरच्या आत्मघातकी हल्ल्यातून वाचलेल्यांपैकी एक आहे. या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त लोक मारले गेले. यात बहुतांश विद्यार्थीनी होत्या. फातिमाही गंभीर जखमी झाली होती, तिला तिचा एक डोळा गमवावा लागला. तसेच जबडा आणि कानाला गंभीर इजा झाली.
या हल्ल्यातून सावरत असताना, तिने तिच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास केला आणि या परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवले. आता काबुल विद्यापीठात कॉम्प्यूटर सायन्सचे शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न आहे. ती म्हणते की, हल्ल्यात तिने डोळा गमावला आहे पण त्यामुळे ती आता आणखी मजबूत व निश्चयी झाली आहे.
कायद्याच्या प्राध्यापक
युनिव्हर्सिटी ऑफ नायजेरियामधील एमिरेट्स डीन आणि मानवी तस्करीसंदर्भातील संयुक्त राष्ट्राचे विशिष्ट वार्ताहर असलेल्या जॉय इझायलो या आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांमधील एक आघडीच्या आणि सन्माननीय व्यक्ती समजल्या जातात.
त्या विमन एड कलेक्टिव्हच्या (WACOL) संस्थापक संचालक आहेत. या संस्थेने मागील २५ वर्षात नायजेरियातील ६०,००० असहाय्य स्त्रियांना मोफत कायदेशीर साह्य आणि निवारा दिला आहे. तसेच लैंगिक छळ झालेल्या आणि त्यातून बचावलेल्या महिलांना जलद प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांनी तमर सेक्शुअल असल्ट रेफरल सेंटरही स्थापन केले आहे.
२०२१ च्या विजेत्या लेखिका चिमामांडा न्गोझी अडिचिए यांनी त्यांचे नाव सुचवले आहे.
“प्राध्यापक इझायलो यांनी गरीब, विशेषत: ज्या महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांना पायदळी तुडवले गेले आहे अशा स्त्रियांना मोफत कायदेशीर साह्य देऊ करत अनेक आयुष्यांवर परिणाम केला आहे.”
वकील
या वर्षी येमेनमधील नागरी युद्ध अधिक हिंसक झाले, या काळात वकील मिन अल ओबेदी यांनी वेढा घातलेल्या ताईझ शहरात शांतता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी परस्परविरोधी गटांमधील कैद्यांची देवाणघेवाण सुलभ करून मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांना कधीकधी अपयश येते, आणि सैनिकांची सुखरूप घरवापसी होत नाही. परंतु अशा सैनिकांचे किमान मृतदेह तरी त्यांच्या घरच्यांना मिळावेत यासाठीही त्या प्रयत्न करतात.
त्यांनी येमेन महिला संघासाठी सेवा दिली आहे. या काळात त्यांनी तुरुंगातील महिलांचे रक्षण केले. मानवाधिकार आणि स्वातंत्र्य समितीच्या देखरेखीखाली वकील सिंडिकेट कौन्सिलमध्ये पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
राजकीय प्रचारक
कायद्याच्या विद्यार्थीनी झबिदा ओलियान यांना नैऋत्य इराणमधील खुझेस्तान प्रांतात कामगारांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्या चार वर्षांपासून चार वेगवेगळ्या इराणी तुरुंगात आहेत. यामध्ये राजकीय कैद्यांच्या निवासस्थानाचे प्राथमिक ठिकाण मानल्या जाणाऱ्या एविनचाही समावेश आहे. ओलियान यांना येथे ऑक्टोबर 2021 साली आणण्यात आलं.
त्यांच्यावर झालेल्या "अमानवीय" वागणुकीचे वर्णन करणारी एक ऑडिओ टेप पाठवून, त्यांनी तुरुंगातूनही त्यांचे काम सुरू ठेवले आहे. त्या महिला कैद्यांचा आवाज बनल्या आहेत. तसेच जामिनावर असताना त्यांनी इराणच्या तुरुंगात महिलांवर होणारे "अत्याचार" आणि "अन्याय" याबद्दल एक पुस्तक लिहिले.
सेक्शुअल कन्सेन्ट अॅक्टिव्हिस्ट
टीच अस कन्सेन्ट' ही मोहीम शनेल काँटॉस यांनी सुरू केली. लैंगिक शिक्षण देताना त्यामध्ये कन्सेन्ट म्हणजे सहमतीविषयी शिकण्याचं महत्त्वं ही मोहीम सांगते. शनेल यांनी 2021मध्ये इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. शाळेत असताना लैंगिक अत्याचार झालेली व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का असा प्रश्न त्यांनी फॉलोअर्सना विचारला आणि 24 तासांमध्ये 200 पेक्षा जास्त जणांनी त्याला हो असं उत्तर दिलं.
ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक संबंधांसाठीच्या सहमती - consent विषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण द्यायला सुरू करावं, यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली. त्यानंतर आता 2023पासून ऑस्ट्रेलियातल्या सर्व शाळांमध्ये केजीपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांना याविषयीचं शिक्षण देणं बंधनकारक असणार आहे. सहमतीशिवाय संबंधांदरम्यान कंडोम काढणे म्हणजेच स्टिल्थिंग (Stealthing) विषयीची मोहीम राबवत असून हा गुन्हा ठरवण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे.
अपंगत्त्व कार्यकर्ता
एक बौद्धिक अपंगत्व असलेली महिला म्हणून फर्नांडा कॅस्ट्रो त्यांच्यासारख्या इतरांना राजकारणात सहभागी होता यावे यासाठी लढा देत आहेत. ह्युमन राईट्स वॉचच्या पाठिंब्याने चालणाऱ्या अपंगांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समुहाचा त्या भाग आहेत. बौद्धिक अपंगत्व आणि शिकण्याच्या क्षमता नसलेल्यांना धोरणात समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन त्यांनी मेक्सिकोमधील सर्व राजकीय पक्षांना केले आहे.
राजकीय निर्णयाशी संधंबित कागदपत्रांमध्ये अपंगांना सोयीच्या भाषेचा वापर आणि राजकीय पक्ष आणि मतदान कार्यक्रमांमध्ये समावेश यावर त्या काम करत आहेत. कॅस्ट्रो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये मेक्सिकोचे प्रतिनिधीत्व केले आहे. तेथे त्यांनी अपंगांच्या हक्कांबद्दल अहवाल सादर केला. इन्क्लुजन इंटरनॅशनल या जागतिक नेटवर्कच्या त्या प्रतिनिधी आहेत.
राजकारणी
आयमारा कुळातील माजी विद्यार्थी नेता असलेल्या इव्हा कोपा यांनी बोलिव्हियातील राजकारणात खळबळ माजवली आहे. एल अल्टो या देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहराच्या महापौर पदासाठी पक्षाचे तिकिट न मिळाल्याने त्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात उभ्या ठाकल्या आणि 69 टक्के मतांनी जिंकूनही आल्या. त्यांनी नुकतेच महिलांसाठी शहराचे धोरण जाहीर केले आहे. धोरणे आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून महिला हक्कांना बळकटी देण्याचा उद्देश यामागे आहे.
कोपा यांच्यासाठी राजकारण काही नवे नाही. 2015 ते 2020 या काळात त्या सिनेटर होत्या. सत्ताधारी पक्षातून त्यांचे बाहेर पडणे म्हणजे अनेकांच्या मते बोलिव्हियामधील राजकारणाला अधिक बहूआयामी स्वरूप मिळण्याची चाहूल आहे.
आपल्याला अधिक प्रमाणात महिला नेतृत्वाची गरज आहे. महिला नेहमी पायांवर ठाम उभ्या असतात… गुडघे टेकून नाही.
इव्हा कोपा
धर्मादाय कार्यकर्त्या
"एखाद्याने जे कृत्य केलेच नाही त्यासाठी कुणालाही त्या व्यक्तीला ओलीस किंवा कैदेत ठेवता येणार नाही, यासाठी जगाने एकत्र आले पाहिजे" असे वक्तव्य ब्रिटीश-इराणी नाझनिन झागारी-रॅक्टक्लिफ यांनी मार्च महिन्यामध्ये इराणी अधिकाऱ्यांनी मुक्तता केल्यानंतर केले. त्यांचे पती रीचर्ड यांनी ब्रिटीश सरकारला आपल्या पत्नीची खात्रीने सुटका करणे आणि इराणसोबतचा ऐतिहासिक कर्जवाद सोडवण्यासाठी सातत्याने सांगणे यासाठी दीर्घकाळ कॅंपेन चालवली.
2016 साली आपल्या मुलीसोबत सुट्टीवर असताना नाझनिन यांना अहेतूने ताब्यात घेण्यात आले. तसेच ब्रिटीश सरकारवर दबाव आणण्यासाठी राजकीय प्यादे म्हणून नाझनिन यांना इराणी अधिकाऱ्यांनी ओलीस ठेवले. तब्बल सहा वर्षे त्या कैदेत होत्या. सुरुवातीला इराणची राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना क्रांतिकारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. 2021 मध्ये जेव्हा त्यांची पहिली शिक्षा संपली तेव्हा त्यांना दुसरी शिक्षा देण्यात आली आणि राजनैतिक तोडगा निघेपर्यंत त्यांना इराणमध्ये ठेवण्यात आले. झागारी-रॅक्टक्लिफ यांनी सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले आहे आणि त्या आपल्या पतीसोबत या अनुभवांवर आधारित आठवणी लिहीत आहे.
फर्स्ट लेडी / राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी
पडद्यामागे काम करणाऱ्या एक यशस्वी टीव्ही पटकथालेखक ओलेना झेलेन्स्का जगभरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या २०१९ मध्ये जेव्हा त्यांचे पती वॉल्दिमीर झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झाले. फर्स्ट लेडी म्हणून त्यांनी महिलांचे हक्क विकसित करण्यात आणि युक्रेन संस्कृतीला चालना देण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
रशियन आक्रमणानंतर त्यांनी आपल्या व्यासपीठावरून युक्रेनमधील नागरिकांच्या हालअपेष्टा जगासमोर आणल्या. त्या यूएस काँग्रेसमध्ये भाषण करणाऱ्या पहिल्याच परदेशी राष्ट्राध्यक्षांची पत्नी ठरल्या. युद्धामुळे मानसिक धक्का बसलेल्या, बिथरलेल्या मुलांना आणि कुटुंबांना मानसिक आरोग्यात साह्य करण्यावर आता त्या भर देत आहेत.
शांततेच्या काळाच्या तुलनेत महिलांनी आता अधिकच जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. हा (युद्धाचा) अनुभव घेतलेली कोणतीही स्त्री आता मागे हटणार नाही. आणि मला खात्री आहे की आमच्यातला आत्मविश्वास अधिकच बळकट होईल.
ओलेना झेलेन्स्का
शैक्षणिक उद्योजिका
बेलेस बुबु या यूट्यूब चॅनलवर इरिट्रियातील लहान मुलांना त्यांची भाषा आणि संस्कृती यांची माहिती दिली जाते. कंटेंट क्रिएटर आणि उद्योजिका किसनेट टेड्रोस यांनी हे चॅनल सुरू केले. मूळ इथिओपिया येथील किसनेट यांनी अगदी लहान वयापासूनच, आपल्या मुळांशी जोडले जाण्यासाठी भाषा समजणे महत्त्वाचे आहे, हे ओळखले होते.
एरिट्रिया, युगांडा आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील स्वयंशिक्षण घेतलेल्या व्हॉईस आणि डिजिटल आर्टिस्टना त्यांची टीम डिजिटल कंटेंट बनवण्यासाठी एकत्र आणते. एरिट्रिया आणि इथिओपियामधील टिग्रीन्या भाषा बोलणारे पालक आणि त्यांची मुले हे व्हिडिओ पाहतात. टेड्रोस यांनी युगांडामधील कंपाला येथे पहिले बेलेस बुबु किड्स फेस्टिव्हलही आयोजित केले होते.
ब्राझीलियन फेडरल सीनेटच्या सदस्या
देशात सर्वत्र दिसून येणाऱ्या ध्रुवीकरणाला आळा घालू शकतील या आशेने ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या मध्यममार्गी ब्राझीलियन सीनेटर सिमोन टेबेट यंदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर होत्या. २००२ मध्ये त्या राज्य प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या तर २००४ आणि २००८ मध्ये ट्रेस लागोस या त्यांच्या मूळ शहराच्या महापौरही होत्या. २०१४ साली ५२ टक्के अधिकृत मतांसह त्या सीनेटमध्ये निवडून आल्या.
अत्यंत महत्त्वाचे मंडळ समजल्या जाणाऱ्या सीनेटच्या कन्स्टिट्यूशन अॅण्ड जस्टिस कमिटीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला होत्या. दशकभराहून अधिक काळ कायद्याच्या प्राध्यापक असलेल्या टेबेट यांनी जॉईंट कमिटी टू कॉम्बॅट व्हायोलन्स अगेंस्ट विमन म्हणजेच महिलांविरोधातील अत्याचारांचा सामना करण्यासाठीच्या संयुक्त समितीचे अध्यक्षपदही भुषवले आहे.
प्रत्येकाने हे जाणून घ्यायला हवे की येणारा काळ स्त्रियांचा आहे आणि स्त्री तिला हवे तेथे स्वत:चे स्थान निर्माण करू शकते.
सिमोन टेबेट
संस्थापक, इलेक्टहर
इलेक्ट हर या संस्थेद्वारे इबिजोके फॅबरोडी या नायजेरियातल्या राजकारणात बदल घडवत आहेत. राजकारणातील पुरुष आणि महिला प्रतिनिधींच्या संख्येत असणारी तफावत कमी करण्यासाठी ही संस्छा काम करते आणि त्यांनी आतापर्यंत आफ्रिका खंडात 2000 महिलांना सोबत जोडलं आहे. #Agender35 या मोहीमेद्वारे त्यांची संस्था 2023 सालच्या स्थानिक वा केंद्रीय निवडणुका लढवणाऱ्या 35 महिलांना थेट मदत करत असून त्यांना अर्थ आणि मनुष्यबळ पुरवते.
इलेक्शनच्या माहितीचं विश्लेषण करणारं आफ्रिकेतलं पहिलं फेमिनिस्ट मोबाईल अॅपही त्यांनी सुरू केलंय. लीडरशिप काऊन्सिल ऑफ द डेमोक्रसी अँड कल्चर फाऊंडेशनमध्ये सध्या फॅबरोडी काम करतात. लोकशाहीतल्या प्रक्रिया सुधारण्यासाठी हा गट प्रयत्न करतो.
पत्रकार
युक्रेनमधील युद्धादरम्यान, पुरस्कार विजेत्या पत्रकार ख्रिस्तिना बर्दिंस्की यांनी रशियन गोळीबार होत असलेल्या प्रदेशांमधून रिपोर्टिंग करत संपूर्ण देशभर प्रवास केला. संघर्ष सुरू असलेल्या शहरांतील दैनंदिन जीवनाच्या तपशीलांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
खेरसन येथे जन्मलेल्या बर्दिंस्की यांनी NV मासिक आणि विविध टीव्ही आणि रेडिओ प्रकल्पांसह कीवमध्ये 14 वर्षे राजकीय पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांनी ई-पीपल, युक्रेनच्या युरोमैदान क्रांतीमध्ये सहभागी झालेल्यांबद्दल एक सोशल मीडिया प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाचे नंतर पुस्तक झाले.
नन
पोप फ्रान्सिसने त्यांची सिनेड ऑफ बिशप म्हणजेच धर्मसभेच्या अंडरसेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली. या पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. कॅथलिक चर्चसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर पोपना सल्ला देणाऱ्या इतर नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. शिवाय, मताधिकार असलेल्या त्या एकमेव महिला आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे स्त्रियांसाठी 'कवाडे खुली झाली आहेत' असे मत २०२१ मध्ये सेक्रेटरी-जनरलच्या मंडळाने व्यक्त केले.
या आधी, काँग्रेगेशन ऑफ झेविअर्सच्या या फ्रेंच ननने फ्रान्समध्ये नॅशनल सर्विस फॉर द इव्हेंगलायझेशन ऑफ यंग पीपल अॅण्ड व्होकेशनच्या पहिल्या महिला संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
पोप फ्रान्सिस यांनी म्हटल्याप्रमाणे, "सर्व प्रकारचे भेदाभेद आणि स्त्रियांसंदर्भातील हिसेंविरोधात लढणे हेच न्यायाचे कर्तव्य आहे. आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या अधिकाधिक महिलांना सर्व पातळ्यांवर नेतृत्वस्थानी आणण्यासाठी पाठबळ द्यायला हवे.
नॅथली बीका
न्यायाधीश
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून या वर्षी न्यायाधीश आएशा ए. मलिक यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्त्रीहक्कांचे संरक्षण देणारे अनेक निकाल दिले आहे. बलात्कारित पिडीतेची दोन बोटांनी करण्यात येणारी चाचणी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णयही त्यांनी दिला. 2021 मध्ये या चाचणीवर बंदी येईपर्यंत लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये ही 'कौमार्य चाचणी' केली जात होती.
सर्वोच्च न्यायालयातील जबाबदाऱ्यांसोबतच मलिक यांनी जगभरातील न्यायाधीशांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत तसेच पाकिस्तानातील महिला न्यायाधीशांसाठी परिषदेचा शुभारंभ करत न्यायप्रणालीतील लिंग दृष्टिकोनासंदर्भात चर्चेला चालना दिली आहे.
महिलांनी एक नवी कथा रचायला हवी… ज्यात त्यांचा दृष्टिकोन असेल, त्यांचे अनुभव मांडले जातील आणि ज्यात त्यांची कथाही असेल.
आएशा मलिक
पंतप्रधान
मिया मॉटली बार्बेडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि जानेवारी महिन्यात त्यांनी प्रचंड मोठा विजय मिळवत दुसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवलं. 2008 पासून त्या बार्बेडोस लेबर पार्टीचं नेतृत्त्वं करत आहेत. जेव्हा कॅरिबियन बेटांनी ब्रिटीश शाही घराण्यासोबतचे आपले संबंध संपुष्टात आणत प्रजासत्ताक होण्याचं ठरवलं, तेव्हा मिया मॉटली यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हवामान बदलाबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी मॉटली प्रसिद्ध आहेत. श्रीमंत देश हवामान बदल रोखण्यासाठी पुरेशी पावलं उचलत नसल्याची टीका त्यांनी COP27 परिषदेमध्ये केली होती. जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर 2050 सालापर्यंत हवामान बदलामुळे विस्थापित होणाऱ्यांची संख्या अब्जांमध्ये जाईल. असा इशाराही मिया मॉटली यांनी दिला आहे.
शिक्षणतज्ज्ञ
झारा मोहम्मदी या नोजिन सोशो-कल्चरल असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असून इराणमधील तिसरे महत्त्वाचे शहर असलेल्या सनंदज या त्यांच्या मूळ गावी कुर्दिश भाषा शिकवण्यासाठी त्यांनी एक दशकाहून अधिक काळ समर्पित केला आहे.
इराणची घटना सांगते की, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये स्थानिक व वांशिक भाषा मुक्तपणे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात असे होत नाही, असे वकील व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुले त्यांची मातृभाषा शाळेत शिकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचविण्याच्या उद्दिष्टाने मोहम्मदी यांनी गट व संस्था स्थापन केल्याचा आरोप इराण सरकारने त्यांच्यावर केला आणि त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जानेवारी 2022 पासून त्या तुरुंगात आहेत.
राजकीय सुधारक
विद्यापीठातील विद्यार्थीनी म्हणून पार्क जी यान यांनी अज्ञातपणे दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन लैंगिक-गुन्हेगारी कडीतील एकाचा भंडाफोड करण्यात मदत केली. ज्याला Nth रूम्स म्हणून ओळखले जाते. या वर्षी त्यांनी आपला अनुभव सार्वजनिकरीत्या मांडला आणि तरुण महिला मतदारांपर्यंत पोहोचून राजकारणात प्रवेश केला.
जेव्हा डेमोक्रॅटिक पक्ष अध्यक्षपदाच्या शर्यतीत हरला तेव्हा त्यांनी यान यांना तात्पुरता नेता केले. डिजिटल लैंगिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणार्या महिला समितीमध्येही त्यांचा समावेश होता. जूनमध्ये पक्षाचे आणखी नुकसान झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. सध्या त्या अधिकृत भूमिकेत नसल्या तरी त्या अजूनही राजकारणात लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
जागतिक स्तरावर डिजिटल लैंगिक गुन्ह्यांमुळे महिलांच्या अधिकारांना धोका पोचत आहे आणि आपण एकजुटीने ही समस्या सोडवण्याची गरज आहे.
पार्क जी यान
बौद्ध दानशूर, परोपकारी व्यक्ती
आधुनिक तैवानमधील बौद्ध धर्माच्या विकासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून धर्म गुरु चंग येनंग यांचा उल्लेख होतो. मानवतावादी त्झू ची फाउंडेशनच्या संस्थापक असलेल्या चंग येनंग यांना बरेचदा 'आशियातील मदर तेरेसा' म्हणून संबोधले जाते.
त्यांनी 1966 साली संस्था स्थापन केली. सुरुवातीला केवळ 30 गृहिणींनी गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी पैसे वाचवले. यानंतर त्यांचे लाखो अनुयायी जगभर पसरले आहेत. यांच्याद्वारे संस्थेला आंतरराष्ट्रीय मदत आणि वैद्यकीय मदत प्रदान केली जाते आणि शाळा आणि रुग्णालये चालवली जातात. हे अनुयायी, 80 च्या दशकाच्या उत्तरार्धातही लोकपरोपकारी मोहिमा चालवतात. अलीकडेच त्यांनी युद्धग्रस्त युक्रेनमधील निर्वासितांना आर्थिक आणि आवश्यक सामानाची मदत दिली आहे.
राजकारणी
माजी न्यायमंत्री असलेल्या नाओमी लाँग यांनी उत्तर आयर्लंडमधील वाढत्या लैंगिक छळाच्या समस्यांशी सामना करण्यासाठी यंदा नवा कायदा आणला. यात डाऊन-ब्लाऊजिंग, सायबर फ्लॅशिंग आणि 'रफ सेक्स' युक्तिवाद रद्दबातल ठरवण्याचा समावेश आहे. त्यांना ठार करण्याच्या धमक्याही देण्यात आले. लाँग महिला राजकारण्यांच्या छळासंदर्भात जनजागृती करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.
व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या लाँग यांनी 1995 मध्ये अलायन्स पक्षात प्रवेश केला. बेलफास्टच्या लॉर्ड मेअर म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर 2010 मध्ये वेस्टमिन्सटमध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या अलायन्स खासदार ठरल्या. 30 वर्षांहून अधिक काळ वेस्टमिन्टरचे खासदार असलेले पहिले मंत्री पीटर रॉबिनसन यांचा पराभव करून त्या निवडून आल्या.
छळाला जिथे सर्वमान्यता असते असे वातावरण निर्माण करणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. याचाच अर्थ आपण थेट आणि सातत्याने पुरुषी वर्चस्व, लैंगिक असमानता आणि स्त्रियांना कमी लेखणाऱ्या संस्कृतीला आव्हान दिले पाहिजे.
नाओमी लाँग
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा
युरोपियन कमिशनच्या पहिल्या अध्यक्षा असलेल्या ऊर्सला वॉन डेर लेयन हा जर्मन राजकारणी आहेत. त्यांनी अँजेला मार्केल यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे आणि त्या जर्मनीतील आजवरच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या.
त्यांचा जन्म ब्रसेल्समध्ये झाला. राजकारणात येण्याआधी त्यांनी अर्थशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे. 2019 मध्ये त्यांनी ईयूमधील सर्वोच्च पदाची धुरा हाती घेतली आणि त्यानंतर ब्रेक्झिट, कोविड 19 ची जागतिक महामारी आणि युक्रेनमधील युद्ध अशा अनेक प्रसंगांचा सामना केला. कंपनीच्या संचालक मंडळात लिंग समतोल असावा असा ईयू कायदा या वर्षी करण्यात आला. हा कायदा आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
2020 च्या विजेत्या फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी त्यांचे नाव सुचवले आहे.
“युरोपात एकामागून एक संकटे येत गेली. या सर्व संकटामधून मार्ग काढण्यात युरोपियन युनियनला ऊर्सला वोन डेर लेयन यांनी अतुलनीय साह्य केले आहे. त्यांचे नेतृत्व ठाम आणि न डगमगणारे आहे. काळ कठीण आहे, पण त्या त्याहून बळकट आहेत.”
पत्रकार
प्रसिद्ध रशियन पत्रकार, तैसिया विकबुवातवा यांनी 2019 मध्ये होलोड या स्वतंत्र मीडिया आउटलेटची स्थापना केली. संस्थेने युक्रेनमधील युद्ध तसेच असमानता, हिंसाचार आणि महिलांच्या हक्कांबद्दलच्या कथा प्रकाशित केल्या आहेत. स्वतंत्र माध्यमांवरील कारवाईदरम्यान एप्रिलमध्ये रशियामध्ये अधिकाऱ्यांनी ही वेबसाइट ब्लॉक केली होती.
असे असूनही, विकबुवातवा आणि तिच्या टीमने त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे वाचकही वाढले आहेत. 2021 मध्ये 'परदेशी एजंट' असे लेबल लावले गेल्यावर, रशिया सोडलेल्या विकबुवातवा यांनी स्वतः युक्रेनमध्ये जाऊन युद्धाचा आघाडी अहवाल दिला आहे.
माझा अपरिहार्य प्रगतीवर विश्वास नाही. आधुनिक सभ्यता नेहमीच नाजूक राहिली आहे आणि ती सहजपणे नष्ट करता येते. यातही महिलांचे हक्क सर्वात प्रथम नष्ट केले जातात.
तैसिया विकबुवातवा
राजकारणी
मे 2022 मध्ये रोझा सालिह या ग्लास्गो सिटी कौन्सिलमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या निर्वासित ठरल्या. इराकमधून पलायन कराव्या लागलेल्या त्यांच्या कुटुंबियांसह त्या स्कॉटलंडमध्ये आल्या तेव्हा त्या तरूण होत्या. आता त्या ग्रेटर पोलॉक वॉर्डाच्या एसएनपी कौन्सिलर आहेत. त्या किशोरवयापासूनच निर्वासितांच्या हक्कांसाठी काम करत होत्या आणि मित्राच्या अटकेवरून त्यांनी व त्यांच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींनी आंदोलन केले होते.
ग्लासगो गर्ल्स या त्यांच्या अभियानामुळे आश्रय मिळण्यास इच्छुक असलेल्यांना मिळालेल्या वागणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. सालिह कुर्दिस्तानमध्ये स्कॉटिश सॉलिडॅरिटी स्थापन केली, मानवी हक्क कार्यकर्ती म्हणून त्या तुर्कीमधील कुर्दिश भागात जातात.
राजकारणी
ब्राझीलच्या नॅशनल काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय तृतीयपंथी महिला. वंशवाद तसेच एलजीबीटीक्यू+ आणि मानवी हक्क्यांसाठी एरिका हिल्टन लढत आहेत.
त्यांच्या पुराणमतवादी कुटुंबाने त्यांना किशोरवयात घराबाहेर काढल्यानंतर त्या रस्त्यावर राहिल्या. मात्र, त्यांनतर त्या विद्यापीठात शिकल्या. विद्यार्थी राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या हिल्टन त्यानंतर साओ पावलोला गेल्या आणि त्यांनी डाव्या विचारसरणीच्या पीएसओल पक्षात प्रवेश केला. 2020 मध्ये त्या नगर कौन्सिलमध्ये निवडून आल्या आणि त्यांनी ब्राझीलमधील या सर्वात मोठ्या शहरातील उपासमारीच्या समस्येसंदर्भात पालिका निधी देऊ करणारा कायदा तयार केला.
समान हक्क, समान वेतन मिळवणे आणि लिंगाधारित हिसेंचा अंत करणे यासाठीचा आमचा लढा आहे… मग आपण कृष्णवर्णीय असू, लॅटिन, गोरे, गरीब, श्रीमंत, सीआयएस किंवा तृतीयपंथी कोणीही असू.
एरिका हिल्टन
पत्रकार
तालिबानच्या राजवटीत तब्बल सहा वर्षे झारा होया ‘मोहम्मद’ बनून राहिल्या. शाळेत जाण्यासाठी त्या मुलाचा पोशाख करत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सैन्याने 2001 साली तालिबानचा पाडाव केला. त्यानंतर त्या झारा म्हणून शाळेत जाऊ लागल्या. त्यांनी 2011 साली पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अनेकदा न्यूजरूममध्ये त्या एकमेव महिला रिपोर्टर होत्या.
त्या रुखसाना मीडिया या अफगाणिस्तानातील पहिल्या स्त्रीवादी वृत्तसंस्थेच्या संस्थापक आहेत. तालिबानने दगडाने ठेचून मारलेल्या 19 वर्षीय तरुणीच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आले आहे. होया यांना 2021 साली अफगाणिस्तानातून हद्दपार करण्यात आले. त्या आता यूकेमध्ये राहून रुखसाना मीडिया चालवतात. त्यांना गेट्स फाउंडेशनचा 2022 सालचा चेंजमेकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
माझा हिंसेपेक्षा शब्दांवर विश्वास आहे आणि आपण महिलांच्या न्यायासाठी बोलले पाहिजे.
झारा होया
धावपटू
2012 मध्ये सीरियामधील दिमा अक्ताच्या घरावर बॉम्बहल्ला झाला. तिने आपला पाय गमावला आणि परिणामी आयुष्यातली सगळ्यात आवडती गोष्ट - धावणं गमावलं. सीरियातील सुमारे 28 टक्के नागरिक अपंग आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार ही संख्या जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. 10 वर्षांनंतर आक्ता युकेमध्ये आहे आणि ती 2024च्या पॅरालिम्पिकसाठी सराव करत आहे.
जागतिक साथीदरम्यान निर्वासितांसाठी निधी संकलन केल्यावर इंग्लंडच्या लायनहार्ट्स या अल्टरनेटिव्ह फुटबॉल संघाची एक सदस्य म्हणून तिला ओळख प्राप्त झाली. तिची कथा अलिकडेच ॲने मेरीच्या ब्युटिफुल या म्युझिक व्हिडियोमध्ये दिसली आणि अपंगांच्या क्षमतांबद्दल ती अजूनही जागरुकता निर्माण करत आहे.
अभिनेत्री
या वर्षी कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळविणारी झर अमिर-इब्राहिमी ही पहिली इराणी अभिनेत्री ठरली. ती चित्रपटकर्तीसुद्धा आहे. होली स्पायडर या देहविक्री करणाऱ्यांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरच्या सत्यघटनेवर आधारित चित्रपटातील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
एक खासगी व्हीडिओ लीक झाल्यानंतर त्यांच्या जुन्या प्रेमसंबंधांना लक्ष्य करत बदनामीची मोहीम सुरू झाली. छळ व खटला टाळण्यासाठी अमिर-इब्राहिमी यांना इराण सोडावे लागले होते. 2008 मध्ये त्या पॅरिसला गेल्या आणि अलंबिक प्रोडक्शन ही निर्मिती कंपनी सुरू केली आणि कॅमेऱ्यामागे आणि कॅमेऱ्यासमोर त्यांनी चांगली कारकीर्द घडवली आहे.
गायक - गीतकार
ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या सुपरस्टार बिली आयलिश या त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या - आशयाच्या संगीतासाठी ओळखल्या जातात. त्यांचं 'युअर पॉवर' हे गाणं अल्पवयीन मुलींचं शोषण करणाऱ्यांवर टीका करतं तर 'द गुड गर्ल्स गो टू हेल' हे गाणं हवामान बदलावर आहे.
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने महिलांना असणारा गर्भपाताचा घटनात्मक हक्क संपुष्टात आणण्याचा निर्णय दिला याचा बिली आयलिश यांनी यावर्षीच्या ग्लॅडस्टोनबरी फेस्टिव्हलमध्ये जाहीर निषेध करत इतिहास घडवला. बॉडी इमेज, डिप्रेशन, टुरेट्स सिंड्रोम या सगळ्याबद्दलही त्या मोकळेपणाने बोलतात.
आपण आता ज्या काळात आहोत तो चकित करणार आहे. महिला आघाडीवर आहेत. एक असा विशिष्ट काळ होता जेव्हा मी पूर्णपणे निराश झाले होते आणि तेव्हा माझ्यासारख्या मुलींकडे गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं.
बिली आयलिश
स्विमर
ओना कार्बोनेल या स्पॅनिश आर्टिस्टिक स्विमर आहेत. आई असणं आणि आघाडीची अॅथलीट असणं कसं शक्य आहे, याबाबत त्या आग्रही आहेत. 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ओना यांनी 30 पेक्षा जास्त प्रतिष्ठित स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिम्पिकमध्येही त्यांनी रजत आणि कांस्य पदक पटकावलं आहे.
2020मध्ये त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. त्यांनतर त्यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठीची तयारी सुरू केली. पण स्पर्धेच्या नियमांनुसार त्यांना इव्हेंटच्या ठिकाणी बाळाला स्तनपान देण्यास परवानगी नव्हती. त्यांनी याविषयीची नाराजीबोलून दाखवली. यावर्षी त्यांना दुसरं बाळ झालं. आई होणं आणि अॅथलीट म्हणून स्पर्धा खेळणं या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे इतर महिला अॅथलीट्सना दाखवून देणारी त्यांची कहाणी त्यांनी डॉक्युमेंटरीमधून मांडली आहे.
फॅशन डिझायनर
ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी सुंदर पेहेराव डिझाइन करणे हे तिचे पॅशन आहे. 2018 मध्ये आईसोबत म्हणजेच ओफेलिया केउंग यांच्यासोबत तिने आरएचवायएस हा ॲडॅप्टिव्ह फॅशन ब्रँड सुरू केला. काद्रीच्या आजीची शुश्रुषा करताना तिच्या लक्षात आले की, ज्येष्ठांसाठी असलेल्या कपड्यांमध्ये स्टाइल व उपयुक्ततेचा अभाव असतो. यातूनच आरएचवायएस हा ब्रँड घडविण्याची प्रेरणा मिळाली.
क्लोदिंग डिझाइनच्या पदवीधर असलेल्या केउंग यांनी आपले ज्ञान व ग्राहकांची गरज यांची सांगड घातली, मग ते वेलक्रो फास्टनिंग असो वा कॅथेटर धरून ठेवण्यासाठीची पिशवी असो. तिच्या ब्रँडने 90 वंचित महिलांना रोजगार दिला. यापैकी काही जण दिव्यांग आहेत. 2022 मध्ये केउंग यांनी बाउंडलेस हा सर्वसमावेशक ब्रँड सुरू करून या माध्यमातून तिने फॅशनेबल उपयुक्त वस्तूंचा प्रचार केला.
एनबीए स्काउटर
माजी व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू सारा चॅन आता लहान मुलांना मार्गदर्शन करतात. त्या संपूर्ण आफ्रिका खंडात क्रीडा मार्गदर्शन करतात. NBA च्या टोरोंटो रॅप्टर्स बास्केटबॉल संघासाठी आफ्रिकेतील स्काउटिंगच्या त्या पहिल्या महिला व्यवस्थापक आहेत.
सुदानमधील खार्तूम येथील युद्धातून निसटून त्या आणि त्यांचे कुटुंबीय केनियाला गेले. येथे चॅन यांची बास्केटबॉल कारकीर्द सुरू झाली. त्यांनी जॅक्सन, टेनेसी येथील युनियन युनिव्हर्सिटीमध्ये बास्केटबॉल शिष्यवृत्ती मिळविली. तसेच आफ्रिका आणि युरोपमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळल्या. चॅनने होम ॲट होम / एपीडिएट फाऊंडेशन या एनजीओची स्थापना केली. ही संस्था बालविवाहासंदर्भात लढा देते, शिक्षणाला प्रोत्साहन देते. तसेच तरुणांना शिक्षित करण्यासाठी क्रीडा प्रकाराचा वापर करते.
तुम्हाला तुमच्याबद्दल जे विश्वासाने वाटतं तेच तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या तुमच्या पात्रतेवर विश्वास ठेवा.
सारा चॅन
अभिनेत्री
६० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या प्रियंका चोप्रा जोनास या बॉलिवुडमधील एक सर्वात लोकप्रिय फिल्म स्टार आहेत. या माजी मिस वर्ल्डने २००२ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांचे हॉलिवुडमधील पदार्पण महत्त्वाचे ठरले. कारण, अमेरिकन नेटवर्क ड्रामा सीरिज (क्वाँटिको, २०१५) मध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई अभिनेत्री आहेत.
इजंट इट रोमँटिक आणि द मॅट्रिक्स रेझरेक्शन्स या हॉलिवुडपटांत त्यांनी काम केले आहे. त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली आणि त्यातून भारतात सिनेमांची निर्मिती केली जाते. चोप्रा युनिसेफनच्या गुडविल अॅम्बेसेडर आहेत. मुलांचे हक्क आणि मुलींचे शिक्षण यासंदर्भात त्या युनिसेफसोबत काम करतात.
मीटू मोहीम आणि त्यानंतर महिलांना एकत्रित येत उठवलेला आवाज, एकमेकींना संरक्षण देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि एकमेकींच्या मदतीला उभे ठाकणे… एकीमध्ये काहीतरी प्रचंड शक्ती आहे.
प्रियंका चोप्रा जोनस
टेनिसपटू
2022 च्या विंबल्डन स्पर्धेत ऐतिहासिक खेळीमुळे, ट्युनिशिअन टेनिसपटू ऑन्स जब्युअर ही ओपन गेममध्ये ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली अरब किंवा आफ्रिकन महिला ठरली. काही महिन्यांनंतर लगेचच ती यूएस ओपनच्याही अंतिम फेरीत पोहोचली.
28 वर्षांच्या या टेनिसपटूने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली. विमन टेनिस असोसिएशन (WTA) मध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजवर कोणीही आफ्रिकन किंवा अरब, स्त्री-पुरुष या स्थानापर्यंत पोहोचू शकले नव्हते. जेब्युअरने आजवरच्या कारकिर्दीत तीन सिंगल्स स्पर्धा जिंकल्या आहेत. खेळाडूंच्या नव्या पिढीची आदर्श म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
सामाजिक कार्यकर्त्या
स्नेहाचे पालक आणखी हुंडा देऊ शकले नाहीत तेव्हा डिसेंबर २००० मध्ये स्नेहा जावळेच्या पतीने तिला केरोसिन टाकून पेटवून दिले. या कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली नाही. पती मुलासोबत निघून गेल्यानंतर त्यांनी स्वत:चे आयुष्य नव्याने उभारण्याचा निर्धार केला. टॅरट कार्ड रीडर आणि स्क्रिप्टरायटर म्हणून त्यांनी काम सुरू केले... असे काम ज्यात इतरांना त्यांचा चेहरा दिसणार नव्हता.
आता सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय असलेल्या जावळे यांना छळाच्या त्यांच्या अनुभवांच्या आधारे निर्भया या २०१२ मधील दिल्ली गँगरेप प्रकरणावर आधारित नाटकात भूमिका करण्यासाठी विचारणा झाली. जगभरातील प्रेक्षकांपुढे आपली कला सादर करताना त्यांनी भीतीवरही मात केली.
जाळणे आणि अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांप्रति समाजाचा दृष्टिकोन मागील दशकभरापासून बदलला आहे. मी स्वत:ला कोणत्याही मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्सपेक्षा कमी समजत नाही. मी सुंदर आहे असं मी म्हणते, त्यामुळे मी आहेच.
स्नेहा जावळे
रेसिंग ड्रायव्हर
2018 मध्ये सौदी अरेबियातील पहिली महिला व्यावसायिक रेसिंग ड्रायव्हर बनून रीमा जुफली यांनी नवा इतिहास रचला. इंटरनॅशनल जीटी ओपनमध्ये भाग घेण्यासाठी तसेच मोटर रेसिंगमध्ये सौदी अरेबियाचा सहभाग वाढवण्यासाठी यंदा त्यांनी थीबा मोटरस्पोर्ट ही आपली स्वत:ची टीमही बनवली. आपल्या या टीमच्या माध्यमातून या व्यावसायिक रेसिंग ड्रायव्हर या खेळातील बहूविधता विकसित करण्यासाठी आणि विविध शैक्षणिक संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जगभरातील इतर महिला रेसिंग ड्रायव्हर्सना प्रेरणा देणाऱ्या जुफली यांना आणखी एक अभूतपूर्व यश मिळवण्याची आशा वाटते. त्या थीबा मोटरस्पोर्टच्या माध्यमातून मानाच्या ले लॅन्स 24 तासांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आजही समाजात महिलांसाठी अनेक स्टीरिओटाईप्स आहेत. अर्थपूर्ण आणि शाश्वत बदल घडायचे असतील तर स्त्रियांना घरातून आणि समाजातूनही पाठिंबा मिळायला हवा.
रीमा जुफली
संगीतकार
परफॉर्मर आणि संगीतकार अला पुगाचेवा यांच्या २५० दशलक्षांहून अधिक रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आहेत. ५०० हून अधिक गाणी आणि १०० अल्बम्स त्यांच्या नावावर आहेत. सुस्पष्ट मेझो-सोप्रोनो आवाजासाठी प्रसिद्ध अला आता निवृत्त झाल्या आहेत मात्र आजही त्यांना रशियन पॉपची त्सारिना म्हटले जाते.
रशियामध्ये त्यांच्या संगीतासाठी वारंवार त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. मात्र तरीही पुगाचेवा यांनी अनेकदा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. युक्रेन युद्धाची निंदा करणारा एक संदेश त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांच्या ३.६ दशलक्ष फॉलोअर्सना उद्देशून लिहिला. यासाठी त्यांचे कौतुकही झाले आणि त्यांच्यावर देशद्रोही असल्याची टिकाही झाली.
महिलांना शिक्षण मिळावे आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असाव्यात यासंदर्भातील लढ्यात जगाने लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र, अनेक देशांमध्ये घरगुती हिंसा ही आजही फार मोठी समस्या आहे.
अला पुगाचेवा
अभिनेत्री
क्रूएल इंटेंशन्स, लीगली ब्लाँड आणि हेलबॉय फ्रँचाईझी अशा पॉप कल्चर क्लासिक्समधील भूमिकांसाठी प्रसिद्धा सेल्मा ब्लेअर या अमेरिकेतील फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत.
२०१८ मध्ये त्यांना मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर या आजाराबद्दल जनजागृती करणे, त्यांचे आरोग्य, त्यातील आव्हाने याबद्दल मनमोकळेपणाने बोलणे याबद्दल त्यांचे बरेच कौतुक झाले. यंदा त्यांनी 'मीन बेबी' हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे अपंगत्वाला सामावून घेणाऱ्या मेकअप ब्रँडसोबत त्यांनी सहकार्य केले आहे. प्रत्येकाला सहज वापरता येतील, लावता येतील अशी अर्गोनॉमिक कॉस्मेटिक उत्पादने बनवणे हा यामागील उद्देश आहे.
मी अशी एक स्त्री आहे जिचा भूतकाळ खडतर होता. त्याबद्दल अनेक बाबतीत पूर्वग्रह असू शकतात. कदाचित त्यावेळी अगदी सहज मी दुर्बल होऊ शकले असते. मात्र, इतर अनेक स्त्रियांचा पाठिंबा असल्यानेच मी आज या ठिकाणी आहे.
सेल्मा ब्लेअर
रॅप आर्टिस्ट
गीतकार - आर्टिस्ट दानुफा खनथीरकुल यांना त्यांच्या मिली या स्टेजवरच्या नावाने ओळखलं जातं. सौंदर्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना, लैंगिक संबंधांदरम्यानची सहमती असे महत्त्वाचे विषय त्या त्यांच्या गाण्यांमधून वेगळ्या धाटणीने मांडतात. त्या विविध भाषा आणि बोलींमधून रॅप संगती सादर करतात. यामध्ये थायलंडमधल्या ट्रान्सजेंडर समुदायामध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांचाही समावेश असतो. नुकताच त्यांनी बॅब बम् बम् हा त्यांचा पहिला अल्बम येणार असल्याचं जाहीर केलंय.
गेल्यावर्षीच्या कोचेला फेस्टिव्हलदरम्यान त्यांनी थाई सरकार आणि थायलंडमधली परंपरागत विचार यांना आव्हान देणारे विचार परफॉर्मन्समधून मांडल्याने, थायलंडमधला प्रसिद्ध मँगो स्टिकी राईस स्टेजवर खाल्ल्याने त्या व्हायरल झाल्या होत्या. थायलंड सरकारने कोव्हिड 19 बाबत केलेल्या उपाययोजनांवर टीका केल्याने गेल्या वर्षी त्यांच्यावर मानहानीचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर #SaveMili ट्रेंड झाला होता.
रेफरी
कतारमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये फिफाने 3 महिलांची पुरुषांच्या सामन्यांसाठी रेफरी म्हणून निवड केली. सलीमा त्यापैकीच एक. हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण गेल्या 92 वर्षांच्या स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांच मॅच रेफरी म्हणून महिला काम पाहत आहेत.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या पुरुषांच्या आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धांमध्येही मॅचदरम्यान रेफरी असणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. टोकियोमधल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही त्यांनी रेफरी म्हणून काम केलं होतं. महिलांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या फुटबॉल सामन्यांमध्येही त्यांनी कामगिरी बजावली आहे. क्रीडा क्षेत्रात काम करण्याआधी त्या सुईण म्हणून काम करत होत्या.
प्राध्यापक आणि माजी फुटबॉलपटू
लॉरा मॅकॅलिस्टर या वेल्स महिला फुटबॉल टीमच्या माजी कप्तान आहेत. त्यांनी क्रीडा प्रशासनामध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्या सध्या यूईएफएच्या महिला फुटबॉल समितीच्या उपाध्यक्षा आहेत आणि फिफा काउन्सिलमध्ये एप्रिल 20221 मध्ये यूएएफएच्या प्रतनिधी म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. फुटबॉल असोसिएशन ऑफ वेल्स ट्रस्टच्या मंडळात त्या संचालक आहेत.
मॅकॅलिस्टर या सध्या कार्टिफ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या वेल्श राजकारण या विषयातील तज्ज्ञ आहेत. या वर्षी कतारमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी एलजीबीटी स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जेव्हा त्या स्टेडियममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी एलजीबीटीक्यू+ समुदायाला पाठिंबा देणारी 'रेनबो वॉल' बकेट हॅट काढून टाकण्यास सांगण्यात आले.
अभिनेत्री
एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी अॅवॉर्ड असे मानाचे, ख्यातनाम पुरस्कार जिंकणाऱ्यांना ईजीओटी दर्जा मिळतो. फारच तुरळक परफॉर्मर्स तिथवर पोहोचू शकले आहेत आणि रिटा मोरिनो या त्यापैकी एक आहेत. पोर्तो रिकोमधील ही अभिनेत्री गायक आणि नर्तकही आहे आणि वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ब्रॉडवेवर पदापर्ण केले. मागील सात दशकांतील त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास प्रख्यात आहेच.
सिंगिंग इन द रेन आणि द किंग अॅण्ड आयमध्ये त्यांनी काम केले. मात्र, मूळ वेस्ट साइड स्टोरीमध्ये त्यांनी रंगवलेल्या अनिता या व्यक्तिरेखेमुळे पहिल्यांदाच एका लॅटीन कलाकाराला ऑस्कर पुरस्कार मिळाला. मोरिनो सध्या वयाच्या नव्वदीत आहेत. त्यावेळी स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी त्यांच्या प्रसिद्ध रिमेकमध्ये मोरिनो यांच्यासाठी खास संपूर्णपणे नवी व्यक्तिरेखा लिहिली.
क्लाइंबर
ऑक्टोबर महिन्यात दक्षिण कोरियामध्ये आयोजित एशियन चॅम्पियनशिपमध्ये इराणी क्लाइंबर एल्नाझ रेकाबी हिने डोक्यावर स्कार्फ न घेता स्पर्धेत सहभाग घेतला. त्या वेळी इराणमध्ये हिजाबवरून आंदोलने सुरू होती. ती त्या स्पर्धेत चौथी आली, पण इराणी आंदोलकांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय झाली. जेव्हा तरी मायदेशात परतली तेव्हा तेहरान विमानतळावर तिचे मोठे स्वागत झाले आणि सोशल मीडियावर तिची खूप प्रशंसा झाली.
तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नंतर असे नमूद करण्यात आले की, अनवधानाने तिचा हिजाब पडला आणि त्यावरून झालेला 'गदारोळ व काळजी' याबद्दल तिने टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत इराणी जनतेची माफी मागितली. पण, एका सूत्राने बीबीसी पर्शियनला सांगितले की, तिची मुलाखत हा बळजबरीने घेतलेला कबुलीनामा होता.
ॲथलीट
ऑलिम्पिक पदक विजेती (सुवर्ण आणि रौप्य) आणि तीन वेळा विश्वविजेती ठरलेल्या युलिमार रोहास या मार्चमधील जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये महिला तिहेरी उडीमध्ये 15.74 मीटरची नोंद करून जागतिक विक्रम धारक बनल्या आहेत. त्यांनी आता 16 मीटर उडी - या आणखी मोठ्या यशावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
व्हेनेझुएलाच्या कॅराकसमध्ये जन्मलेल्या आणि कॅरिबियन किनार्यावरील एका गरीब भागात वाढलेल्या त्यांनी आपल्या गरिबीतून झालेल्या सुरुवातीला आपल्या पुढील यशाचे श्रेय दिले आहे. सध्या बार्सिलोना FC ॲथलेटिक्स संघाचा भाग असलेल्या रोहास, त्यांच्या देशाच्या हिरो आहेत. त्या समलैंगिक असून, त्यांनी ते जाहीर केले आहे. तसेच त्या वेळोवेळी LGBTQ+ च्या समस्या मांडत असतात.
आपण महिलांनी घाबरून राहू नये. आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्याला कमी लेखले जाऊ शकते, हे निश्चित आहे. परंतु आपण सक्षम आहोत तेही आपण यापूर्वीच दाखवून दिले आहे.
युलिमार रोहास
प्रोड्युसर
कोरियन कल्चर जगभरात पोहोचवण्यामध्ये मिकी ली यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे के पॉप संगीताला जागतिक प्रसिद्धी मिळाली. केकॉन (KCON) म्युझिक फेस्टिव्हलही त्यांचीच कल्पना. परदेशी भाषांसाठीचा ऑस्कर मिळवणाऱ्या पॅरासाईट या सिनेमाच्या त्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होत्या.
ली या CJ ENM या दक्षिण कोरियन सिनेक्षेत्रातल्या एका मोठ्या फिल्म आणि टीव्ही स्टुडियोच्या उपाध्यक्ष आहेत. ही कंपनी केबल ऑपरेटरही असून संगीत निर्मितीही करते.
2021 ची विजेती अभिनेत्री रेबेल विल्सनकडून नामांकन
"ती नारी शक्तीचं द्योतक आहे आणि माझी आदर्श. तिने अत्यंत उत्तमपणे तिच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्वं केलं असून ती जगासमोर आणली आहे."
नृत्यांगना
अल्जेरियातील इस्रायली समुदायात जन्म झलेल्या इसरा वर्डा या एक सांस्कृतिक योद्धा आहेत. घरगुती स्तरावर केल्या जाणाऱ्या पारंपरिक अल्जेरियन नृत्याला त्यांनी प्रशिक्षण वर्गात नेते. उत्तर आफ्रिकेतील महिलांच्या नृत्य परंपरेचे जतन, संवर्धन करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. राय (raï) या सामाजिक निषेधाशी संबंधित ऐतिहासिक आणि तळागाळात रुजलेल्या नृत्य प्रकारावर त्यांचा विशेष भर आहे.
या समुदायातील पारंपरिक रायमधील काही तुरळक महिला तज्ज्ञांपैकी एक चेइखा राबिया यांच्या त्या शिष्य आहेत. वर्डा या टुरिंग आर्टिस्ट, शिक्षक आहेत. त्यांचे परफॉर्मन्स आणि कार्यशाळा वॉशिंग्टन डीसी ते लंडन अशा जगभरात सर्वत्र गाजल्या आहेत.
लेखिका
वेलिडा या कथाकार आहेत आणि कोलंबियाच्या अल चोको भागातील संस्कृतीच्या प्रसारक आहेत. वेलिया विडाल या शेअर्ड रिडिंगच्याही चाहत्या आहेत यामध्ये एखादा गट मिळून वाचन करतो. वाचन आणि साक्षरतेवर तसेच चोकोसमधील अनोख्या संस्कृतीवर भर देणाऱ्या मोटेटे या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. कोलंबियाच्या एका अत्यंत दुर्गम आणि दुर्लक्षित भागात असमानता आणि वंशवादाशी लढा देण्यासाठी साक्षरता हे एक महत्त्वाचे साधन आहे हे लक्षात घेऊन त्या चोको वाचन आणि लेखन महोत्सवाचेही आयोजन करतात.
अगॉस डे इस्टुरिओ हे त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोलंबियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अफ्रो-कोलंबियन लेखकांसाठीच्या प्रकाशन अनुदानास पात्र ठरले आहे. ब्रिटिश म्युझिअमसोबत सुरू असलेल्या अफ्लुएंट्स प्रोजेक्टमध्ये त्या संशोधक आहेत.
भूतकाळात स्त्रियांना कसा दडपशाहीचा सामना करावा लागला, हे आता आपल्याला नीट कळले आहे आणि आपण त्यात सुधारणा करायला हवी. मात्र अफ्रो आणि मूळ स्थानिक समुदायावर वंशवादामुळे किती खोलवर दडपशाही असते हे आपल्या अद्याप लक्षात आलेले नाही.
वेलिया विडाल
लेखिका
कादंबरीकार आणि लेखिका गीतांजली श्री यांनी यंदग एक नवा इतिहास रचला. त्यांच्या रेत समाधी या कादंबरीच्या टॉम्ब ऑफ द सँड या इंग्रजी भाषांतरासाठी त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या हिंदी लेखक आहेत. या पुस्तकाचे फ्रेंच भाषांतरही एमिली गुइमेट प्राइज पुरस्कार नामांकनाच्या यादीत होते.
श्री हिंदीमध्ये फिक्शन आणि हिंदी आणि इंग्रजीत नॉन-फिक्शन लेखन करतात. भाषा आणि लेखनाची बांधणी यांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करण्यावर त्यांचा भर असतो. त्यांचे लिखाण अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्या विवादी या नाट्य समुहाच्या संस्थापक सदस्य आहेत. या समुहाच्या साथीने त्या नाट्यलेखनही करतात.
महिलांनी आपल्या अस्तित्वासंदर्भात नेहमीच तडजोड केली आहे. मात्र, आमच्या काळात, आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर यात प्रगती झालेली दिसून येते. विविध संस्कृती आणि वर्गांमध्ये ती असमान असली तरी प्रगती आहे.
गीतांजली श्री
लेखिका
पब्लिशर्स वीकलीच्या सुस्पष्ट पुनरावलोकनात त्यांच्या द सेक्स लाइव्हज ऑफ आफ्रिकन वुमन या पुस्तकाचे वर्णन "लैंगिक मुक्तीच्या शोधावर एक आश्चर्यकारक रिपोर्ट" असे करण्यात आले आहे. या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक म्हणून द इकॉनॉमिस्टने हे पुस्तक यादीत समाविष्ट केले होते. या पुस्तकात संपूर्ण खंड आणि जागतिक स्तरावरील विविध समस्या मांडते.
लेखक आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या नाना दारकोआ सेकियामा या देखील एक वेबसाइट, पॉडकास्ट आणि उत्सव जे आफ्रिकन स्त्रियांच्या लैंगिक, लैंगिकता आणि आनंदाविषयीचे अनुभव सांगण्यासाठी सामग्री तयार करतात अशा ॲडव्हेंचरस फ्रॉम बेडरूम्स ऑफ आफ्रिकन वुमेन्सच्या सह-संस्थापक आहेत.
सर्व स्त्रियांसाठी स्वतःची अशी जागा निर्माण करण्यात स्त्रीवादी यशस्वी झाले आहेत. परंतु आम्हाला प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो, आपण जे मिळवलंय त्याचा हा परिणाम आहे. आणि प्रतिक्रिया विशेषत: लैंगिकतेतील विविधता आणि ज्यांचे लिंग निश्चित नाही अशा लोकांवर परिणाम करते.
नाना दारकोआ सेकियामा
कलाकार
कला सल्लागार सॅली स्केल यांची 2022 मध्ये ‘व्हॉईस टू पार्लिमेंट’ या नावाने ओळखल्या जाणार्या सार्वमताच्या आधी ऑस्ट्रेलियन सरकारसोबत काम करणार्या गटासाठी नियुक्ती करण्यात आली - ही एक ऐतिहासिक सल्लामसलत असेल. जर ही यशस्वी ठरली, तर संसदीय प्रक्रियेत स्थानिक लोकांचे कायमचे प्रतिनिधित्व केले जाईल.
एक माननीय सांस्कृतिक नेत्या आणि कलाकार अशी ओळख असलेल्या स्केल्स या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागातील अनगू पितिंतरा यानकुंतरा (APY) लँड्सपासून दूरवरच्या पश्चिमेकडील पिपलयातिंतरा येथील पितिंतरा महिला होत. APY चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत आणि APY आर्ट सेंटर कलेक्टिव्ह या स्वदेशी-मालकीच्या सांस्कृतिक उपक्रमांच्या समूहाच्या प्रवक्त्या आहेत.
2018 च्या 100 विमेन यादीतील माजी राजकारणी ज्युलिया गिलार्ड यांनी नामांकन केलं आहे.
“सॅली या अद्भुत कला आणि मानवी समज अशा दोन्हीची निर्माती आहे. त्या इतरांचे प्रबोधन करतात आणि त्यांना प्रेरित करतात, याद्वारे त्या वर्णद्वेष आणि लिंगभेद असा घातक संयोग संपवण्यासाठी आवश्यक असलेले अनेक बदल उत्प्रेरित करते.”
कलाकार
सेंट पीटर्सबर्गच्या कलाकार अलेक्झांड्रा स्कोचेलिंको यांना सुपरमार्केटमधील किमतींचे टॅग बदलून त्यावर युद्धविषयक मजकूर लिहिल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. या मजकुरात मारियुपोल थिएटर एअर स्ट्राइकमधील संभाव्य मृत्यूची माहिती होती. अन्य दुकानदाराने माहिती दिल्यानंतर, त्यांच्यावर रशियाच्या सशस्त्र दलांबद्दल 'अपप्रचारा' वर बंदी घालणार्या कायद्यानुसार आरोप ठेवण्यात आला.
सध्या शिक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्री-ट्रायल डिटेन्शन सेंटरमध्ये, त्या स्वतःला कर्तव्याची जाणीव असलेली कैदी समजते आणि त्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
स्कोचेलिंको यांनी मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारी कॉमिक पुस्तके लिहिली आहेत, यात नैराश्य आणि मॅनिया म्हणजे काय यांचाही समावेश आहे. त्यांच्या मैत्रिणीने अटकेत असलेल्या स्कोचेलिंको यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मानवाधिकार प्रचारक
पॅलेस्टिनी-आर्मेनियन मानवाधिकार अधिवक्ता लीना अबु आकली या पॅलेस्टिनी-अमेरिकन पत्रकार शिरीन अबु आकली यांच्या भाची आहेत. शिरीन अबु अल जझीराचे प्रतिनिधी होते आणि ते इस्त्रायलव्याप्त वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ला कव्हर करताना मे महिन्यात मारले गेले. इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांच्या सैनिकांपैकी एकाने तिला "चुकून" ठार मारण्याची "भरपूर शक्यता" आहे.
लीना आता आपल्या मावशीच्या हत्येसाठी न्याय आणि जबाबदारीच्या मोहिमेची ओळख बनल्या आहेत. त्यांनी मानवाधिकारांवर लक्ष केंद्रित करणार्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या समर्थनार्थ, 2022 च्या TIME100 नेक्स्टच्या उदयोन्मुख नेत्यांपैकी एक म्हणून त्यांचे नाव देण्यात आले आहे.
माझी मावशी शिरीन अबु आकली यांचे कार्य जेथे थांबले तेथून आम्ही ते सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच आम्ही गोळा करत असलेल्या गोष्टी, माहिती ही न्याय्य, अचूक आणि पूर्ण आहे, हे खात्रीपूर्वक मांडण्यासाठी महिलांचा दृष्टीकोन विकसित करत राहाणे गरजेचे आहे - महिलांशिवाय हे शक्य नाही.
लीना अबु आकली
प्रचारक
सप्टेंबर 2021मध्ये लंडन पार्क येथे हत्या झालेल्या शालेय शिक्षिका सबिना नेस्सा यांच्या भगिनी असलेल्या जेबिना यास्मिन इस्लाम यांनी यूकेमधील रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा त्यांनी सर्वांसमोर आणला आणि त्याला वाचा फोडली. त्यांनी कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी अभियान राबवले, त्यामुळे प्रतिवादीला शिक्षेसाठी न्यायालयात हजर राहावे लागते.
त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर इस्लाम यांनी पुरुषांकडून होणाऱ्या हिंसेकडे किती दुर्लक्ष केले जाते याचे हे द्योतक आहे, असे म्हणत ब्रिटिश सरकारने केलेल्या असहकाराबद्दल टीका केली. त्यांनी वांशिक भेदभावाबद्दलही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्यांचे कुटुंब सामान्य ब्रिटिश श्वेतवर्णीय कुटुंब असते तर त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक मिळाली असती, असे त्या म्हणाल्या. आपली बहीण 'एक आदर्श व्यक्तिमत्व' होती, जी 'सामर्थ्यशाली, निर्भय आणि तेजस्वी' होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
या जगातील दुसऱ्या कुणाऐवजी स्वतःवर प्रेम करा
सबिना नेस्सा
सबिना नेस्साच्या जर्नलमधील संदेश तिची बहीण जेबिनाने शेअर केला
मानवी हक्क कार्यकर्त्या
श्रीलंकेतल्या यादवी युद्धामध्ये मुलगा किंवा नवरा गमावलेल्या अनेक माता आणि बहिणींना संध्या एकनलीगोडा या एक मानवी हक्क कार्यकर्त्या म्हणून मदत करत आहेत. त्यांचे पती प्रगीत एकनलीगोडा हे प्रतिथयश शोध पत्रकार आणि कार्टूनिस्ट होते. जानेवारी 2010मध्ये ते बेपत्ता झाले. ते सरकारवर सडकून टीका करायचे आणि तामिळ टायगर फुटीरतावांद्यांवर होणाऱ्या तथाकथित अन्यायाविषयीची माहिती त्यांनी काढली होती.
ते बेपत्ता झाल्यापासून संध्या न्यायासाठी धडपडत आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. आपल्या नवऱ्याच्या अपहरणामागे श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षेंच्या समर्थकांचा हात असल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणातले आरोपी निश्चित करण्यात आले पण त्या सगळ्यांना सोडून देण्यात आलं आहे.
मला संधी मिळेल तेव्हा मी इतरांच्या वतीने न्यायासाठी लढते, अपमान आणि अडथळे ओलांडून सातत्याने पुढे जात, त्याग करत लढा सुरू ठेवते.
संध्या एकनलीगोडा
नागरी कार्यकर्त्या
गोहर एश्गी इराणमध्ये सहनशीलता आणि चिकाटीचे प्रतीक बनल्या आहेत. त्यांचे पुत्र सत्तार बेहेश्ती एक ब्लॉगर होते आणि एका दशकापूर्वी त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसाठी एश्गी इराणी अधिकाऱ्यांवर अत्याचार आणि हत्येचा आरोप केला आहे आणि तेव्हापासून न्यायाची मागणी करत आहेत.
मुलांच्या हत्येसाठी न्याय मागणाऱ्या एका गटातील त्या इराणी तक्रारदार मातांपैकी एक आहेत. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून, 2019 मध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी त्या एक होत्या. महसा अमिनीच्या मृत्यूनंतरच्या या वर्षीच्या निषेधादरम्यान, एश्गी यांनी आंदोलकांशी असलेले दृढ ऐक्य म्हणून आपला डोक्याचा स्कार्फ काढून टाकला.
डाऊन सिंड्रोम जागरूकता कार्यकर्त्या
हेयडी क्रोटर या डाऊन सिंड्रोम या आजाराविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा आजार असणारा गर्भ जन्मापर्यंत पाडून टाकण्यास परवानगी देणाऱ्या कायद्याविरोधात त्यांनी इंग्लंड सरकारला न्यायालयात खेचले. हा कायदा भेदभाव करणारा आहे, असे मत त्यांनी मांडले. मात्र, जन्माला न आलेला गर्भ आणि स्त्री यांच्या अधिकारात समतोल साधण्याचा प्रयत्न या कायद्यातून केला जात असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळी. नोव्हेंबरमध्ये त्या ही केस हरल्या मात्र त्या आणि त्यांची टीम हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धात करत आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
त्या 'पॉझिटिव्ह अबाऊट डाऊन'च्या कार्यकर्त्या आहेत आणि नॅशनल डाऊन सिंड्रोम पॉलिसी ग्रुपच्या संस्थापक अधिकारी आहेत. आय अॅम जस्ट हायदी हे त्यांचे पुस्तक ऑस्टमध्ये प्रसिद्ध झाले.
गरोदर महिलांना डाऊन सिंड्रोमविषयी योग्य माहिती मिळावी, असे मला वाटते. लोकांनी काळाप्रमाणे पुढे जावे आणि आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला पहावे, स्वीकारावे असेही मला वाटते.
हेयडी क्रोटर
स्त्रीहत्या विरोधी कार्यकर्त्या
जेराल्डिना गुरेर्रा गार्सेस या इक्वेडोरमध्ये महिला हक्कांसाठी आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या संरक्षणासाठी गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. स्त्री आहे म्हणून केल्या जाणाऱ्या हत्यांविषयीची माहिती गोळा करून जगाचं लक्ष त्याकडे वेधण्याचा त्या प्रयत्न करतात.
कार्टोग्राफीज ऑफ मेमरी इनिशिएटिव्ह'ची सुरुवात केली. महिला असल्याने हत्या करण्यात आलेल्या महिलांच्या आयुष्याबद्दल सांगत त्यांच्या आठवणी जाग्या ठेवत समाजात बदल घडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. फेमिनिस्ट अलायन्स आणि लॅटिन अमेरिकन नेटवर्क अगेन्स्ट जेंडर व्हायोलन्स या दोन संस्थांसाठी गुरेर्रा अशा हत्या प्रकरणांची माहिती काढून त्यावर काम करतात. अल्डिओ फाऊंडेशन आणि इक्वेडोरमधल्या महिलांसाठीच्या निवारा संस्थांशीही त्या संलग्न आहेत.
महिला असल्याने केल्या जाणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कडक पावलं उचलली नाहीत तर कोणाचीच प्रगती होणार नाही. नवीन कायदा येऊनही महिलांच्या हत्या होत आहेत. हे बदलायला हवं.
जेराल्डिना गुरेर्रा गार्सेस
LGBTQ+ कार्यकर्त्या
माउड गोबा या निर्वासित असून सुमारे दोन दशके त्या निर्वासितांच्या इंटिग्रेशन प्रोसेससाठी(समावेशीकरण प्रक्रिया)चालना देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत होत्या. त्या सध्या मायक्रो रेन्बो या संस्थेच्या नॅशनल मॅनेजर आहेत. ही संस्था एलजीबीटीक्यूआय+ समुदायातील आश्रितांना व निर्वासितांना सुरक्षित निवारा प्रदान करते. या संस्थेच्या हाउसिंग प्रकल्पाचे नेतृत्व त्या करतात. या प्रकल्पांतर्गत बेघर लोकांना दर वर्षी 25,000 बेड-नाइट्स (रात्री झोपण्यासाठी जागा) उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यांच्या रोजगारक्षमता प्रकल्पामध्येही त्या सक्रिय आहेत.
अलिकडेच अफगाणिस्तानातून यूकेमध्ये आलेल्या एलजीबीटीक्यूआय+ व्यक्तींच्या इंटिग्रेशन प्रोसेसचे व्यवस्थापन गोबा यांनी केले. त्या यूके ब्लॅक प्राइडच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत आणि त्यांच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष आहेत.
विद्यार्थिनी
जगभरातील बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण बांग्लादेशमध्ये आहे. संजिदा इस्लाम चोया ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आईचा विवाहही अशाच प्रकारे अतिशय लहान वयात झाला होता. परंतु बालविवाहाच्या परिणामांबद्दल शालेय सादरीकरणाने प्रेरित होऊन चोया यांनी अभिनयक्षेत्र निवडले.
त्या आणि त्यांच्या मैत्रिणी, शिक्षक व सहयोगी स्वतःला नाकतोडे (टोळ) म्हणवतात. बालविवाहाच्या घटना त्या पोलिसांकडे नोंदवतात. विद्यापीठातही चोया यांचे टोळधाडीचे सत्र थांबलेले नाही. त्या गटातील नवीन सदस्यांनाही मार्गदर्शन करतात. आतापर्यंत त्यांनी 50 बालविवाह रोखले आहेत.
स्वयंसेविका
पहिल्या ट्रान्सजेंडर स्वयंसेविका म्हणून कार्यकर्त्या इफरत तिलमा इस्राइल पोलिसदलात आलेले आणीबाणीचे कॉल घेतात आणि पोलीस दल आणि LGBTQ+ समुदाय यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी कार्य करतात. तिलमा यांना त्यांच्या कुटुंबाने नाकारले, त्यानंतर पोलिसी छळाचा अनुभव त्यांना आला. यामुळे किशोरवयात त्या इस्राइलमधून पळून गेल्या. लिंग पुनर्नियुक्तीच्या शस्त्रक्रियेला युरोपात मोठ्या प्रमाणावर बंदी असताना, त्यांनी 1969 साली त्यांनी कॅसाब्लांका येथे ही शस्रक्रिया केली.
त्या बर्लिनमध्ये फ्लाइट अटेंडट म्हणून काम करत होत्या आणि तिथे त्यांनी लग्न केले. घटस्फोटानंतर त्या 2005 साली इस्रायलला परतल्या. यावेळी त्यांना येथे लैंगिक अल्पसंख्याकांसाठी स्वागतार्ह वातावरण आढळले. यामुळेच त्यांना पोलिसांसोबत स्वयंसेवक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
स्वदेशी कार्यकर्ता
हवामानासंदर्भात काम करणाऱ्या प्रचारक, पत्रकार आणि इन्फ्लुएन्सर असलेल्या अॅलिस पॅटॅक्सो या, ब्राझील सरकारच्या सध्याच्या पर्यावरण आणि कृषी धोरणांमुळे मूळ भूहक्कांना कसा धोका निर्माण झाला आहे, याबद्दल जनजागृती करत आहेत. पॅटॅक्सोमधील जनतेचा आवाज बनून त्या मूळ समुदायांबद्दल असलेला वसाहतवादी दृष्टिकोन बदलण्याचा आणि पर्यावरण कार्यकर्त्यांच्या हत्येवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्या कोलाबोराच्या पत्रकार आहेत आणि न्युहे या यूट्यूब चॅनलसाठी त्या कंटेंट तयार करतात. ब्राझीलमधील मूळ लोकांच्या संबोधनासाठी न्युहे हे संबोधन वापरले जाते.
२०२१ च्या विजेत्या, शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ता मलाला युसुफजाई यांनी हे नाव सुचवले होते.
"यंदाच्या बीबीसी १०० विमन यादीत अॅलिस पॅटॅक्सो यांचे नाव सुचवताना मला फार अभिमान वाटतोय. हवामान बदल, लिंग समानता आणि स्थानिकांचे हक्क यासाठी लढा देताना अॅलिस यांनी जपलेली अतूट वचनबद्धता म्हणजे माझ्यासाठी, शाश्वत आणि अधिक समानता जपणारे जग आपण निर्माण करू शकू असा आशेचा किरण आहे."
कार्यकर्त्या
जानेवारी महिन्यात झालेल्या रॅलीत शिक्षण आणि काम करण्याच्या अधिकारासाठी आवाहन केल्याने थोड्याच दिवसांत तमाना झरयाब परयानी आणि त्यांच्या बहिणींना सशस्त्र पुरुषांनी त्यांच्या घरातून जबरदस्ती नेले. आंतरराष्ट्रीय निंदा आणि त्यांच्या सुटकेसाठी आलेले अनेक कॉल यामध्ये तालिबानने सहभाग नाकारला.
अटकेनंतर त्या कशा आहेत याचे त्यांनी कसेबसे चित्रीकरण केले आणि ऑनलाइन पोस्ट केले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे बेपत्ता होणाऱ्या महिला कार्यकर्त्यांकडे लक्ष वेधले गेले. तीन आठवडे कैदेत घालवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली . त्या सध्या जर्मनीमध्ये राहात आहेत. अफगाणिस्तानातील महिलांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनीही त्यांच्या डोक्यावरचा स्कार्फ जाळला. अनेक अफगाणी महिलांसाठी ही कृती वादग्रस्त ठरली.
जगातील महिलांची प्रगती होत असताना अफगाणिस्तानातील महिला 20 वर्षे मागे गेल्या आहेत. महिलांचे वीस वर्षांमधले कर्तृत्व त्यांच्याकडून हिरावून घेतले आहे.
तमाना झरयाब परयानी
कार्यकर्ती
सप्टेंबर महिन्यात रोया पिराइचा फोटो व्हायरल झाला. तिची 62 वर्षीय आई, मिनू माजिदी इराणमधील कुर्दिश-बहुल करमनशाह या भागात आंदोलन करत होत्या, तेव्हा त्यांची तेथील सुरक्षा बलाकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. पिराई यांनी मुंडन केले आणि ती आपल्या आईच्या कबरीच्या बाजूला उभी होती आणि तिने केले हातात घेतले होते आणि ती कॅमेऱ्याकडे त्वेषाने पाहत असतानाचा हा फोटो आहे.
महसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दिश महिलेच्या मृत्यूनंतर इराणमधील कुर्दिश भागात सरकारविरोधी आंदोलन फोफावले. त्यानंतर, या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळावा यासाठी पिराईने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली.
कार्यकर्त्या
2015 मध्ये ससी फ्लो यांच्या 21 वर्षांच्या मुलाला, ॲलेहाँद्रोला सशस्त्र लोक घेऊन गेले. चार वर्षांनंतर त्यांच्या 31 वर्षांच्या आणखी एका मुलाचे, मार्को आंतोनियोचे गुन्हेगारी गटाने अपहरण केले. फ्लो म्हणतात, मेक्सिकोमध्ये अपहरण झालेल्या आपल्या मुलांबद्दल आणि अन्य लोकांबद्दल काहीही कळण्याच्या आधी मरण येईल, या भीतीमुळे त्यांची चळवळ सुरू आहे.
या वर्षात देशाने एक अतिशय गंभीर टप्पा गाठला आहे. तब्बल 100,000 बेपत्ता लोकांची सूची म्हणजे एक "अतिशय भयंकर शोकांतिका" असल्याचे UN ने म्हटले आहे. फ्लो यांच्या नेतृत्वाखाली, माद्रेस बुस्कादोडास दे सोनोरा (सोनोरा शोधणार्या माता) समुदायाने गूढ कबरींमधून 1,000 पेक्षा जास्त बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात मदत केली आहे.
कार्यकर्ता
इंडोनेशियाच्या दुर्गम भागात काम करणाऱ्या वेलमरीरी बँबरी या मध्ये सुलावेसीमधील लैंगिक छळ पीडितांसाठी लढा देत आहेत. लैंगिक छळातून वाचलेल्यांना दंड न आकारता हा पारंपरिक कायदा मोडीत काढावा यासाठी त्या स्थानिक कौन्सिल सदस्यांकडे मागणी करत आहेत.
या पारंपरिक कायद्यानुसार, 'गाव स्वच्छ करणे' कलमानुसार, गुन्हेगाराने पारंपरिक मूल्यांना धक्का लावल्याने दंड भरायचा असतो. मात्र, हा दंड पीडितांनाही लागू होतो. मात्र, बँबरी यांच्या मोहिमेमुळे आता कोणतीही लैंगिक छळाची तक्रार आल्यास पोलिसही सर्वात आधी त्यांच्याशीच संपर्क साधतात. या वर्षी त्यांना अशी अनेक प्रकरणे हाताळली.
शारीरिकदृष्ट्या मी अपंग असले तरी माझ्या आसपासच्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी मी माझी ताकद, ऊर्जा देऊ इच्छिते. त्यांना आर्थिक स्वातंत्र देऊ करतील अशा संधी मला निर्माण करायच्या आहेत.
वेलमरीरी बँबरी
कार्यकर्त्या
#MeToo हॅशटॅग पाच वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. याअंतर्गत जगभरातील लाखो लोकांनी त्यांचे लैंगिक छळाचे अनुभव शेअर केले. 2006 साली अशाच प्रसंगातील सर्व्हायव्हर आणि कार्यकर्त्या तराना बर्क यांनी ही चळवळ सुरू केली. महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा शब्द तयार केला.
अभिनेत्री अॅलिसा मिलानोच्या 2017 च्या ट्विटने #MeToo ची चळवळ आणखी विस्तारली. त्यांनी महिलांना कसे वागवले जाते याबद्दल जागतिक स्तरावर संभाषण सुरू केले आणि यातून बचावलेल्यांना एक ठोस पाठबळ दिले. सांस्कृतिक आणि संरचनात्मक बदलासाठी लढा देत असताना, शोषणातून वाचलेल्यांसाठी वकिली करण्याबाबत बर्क वचनबद्ध आहेत.
आंदोलक
या वर्षी इराणमध्ये अनेक ठिकाणी निषेध उफाळून आला. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर 13 सप्टेंबर रोजी तेहरानमध्ये नैतिकता पोलिसांनी 22 वर्षीय कुर्दिश महिलेला, हिजाब किंवा हेडस्कार्फने केस झाकणे या कठोर नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
यंदा आम्हाला महिलांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि सक्तीच्या हिजाब विरोधात लढताना निदर्शनांमध्ये बजावलेली भूमिका जाणून घ्यायची होती.
केस कापणे हे एका चळवळीचे प्रतीक बनले आहे, जे जगभरातील सेलिब्रिटी, राजकारणी आणि प्रचारकांपर्यंत पसरले आहे. मात्र इराणमधील काही समुदाय याकडे शोकाचे पारंपरिक चिन्ह म्हणून पाहतात.
मानवी हक्क वकील
15 वर्षांपासून ओलेक्झांड्रा मोटविचक सेंटर फॉर सिविल लिबर्टीज (सीसीएल)चे नेतृत्व करत आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया युद्धातील गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण करण्याच्या कामासाठी या संस्थेला 2022 चा नोबेल शांतता पुरस्कार विभागून देण्यात आला.
1960 मधील युक्रेनियन असंतुष्टांचा वारसा चालवणाऱ्या सीसीएलचा मानवी हक्कांवर भर आहे. 2014 मध्ये क्रायमिया, लुहान्स्क आणि दोनेतस्कमध्ये जाऊन युद्धातील गुन्ह्यांचे दस्तऐवजी करणारी ही पहिली मानवी हक्क संघटना आहे. चेचन्या, मोलडोवा, जॉर्जिया, सिरिया, माली आणि युक्रेन येथे मानवी हक्कांची पायमल्ली केल्याच्या आरोपासंदर्भात रशियाची चौकशी करण्यात यावी यासाठी आता त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायमंडळाला विनंती केली आहे.
धाडस लिंगाधारित नसते.
ओलेकझांड्रा माटविचक
गुलामगिरीविरोधी प्रचारक
पाचवी पत्नी' बनण्यासाठी 12 वर्षांच्या हदीजायो मानींची विक्री झाली आणि वहाया प्रथेअंतर्गत त्यांना गुलाम करण्यात आले. एका प्रभावशाली पुरुषाने आपल्या चार कायदेशीर पत्नींची सेवा करण्यासाठी एक अनधिकृत पत्नी आणली होती. 2005 साली कायदेशीररीत्या मुक्तता झाल्यानंतर मानी यांनी पुन्हा लग्न केले. परंतु त्यांच्या माजी मालकाने तिच्यावर दोन विवाहांचा आरोप केला आणि त्यांच्यावर खटलाही दाखल केला. या खटल्यात त्यांना दोषी ठरवले गेले आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
मानी यांनी या निर्णयाला आव्हान दिले आणि नायजरच्या सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये त्यांची शिक्षा रद्द केली. याचाच परिणाम म्हणून वहाया प्रथेवर बंदी घालण्यात आली. त्या आता गुलामगिरीविरोधात वकिली करतात आणि इतर महिलांच्या मुक्ततेसाठी कार्यरत आहेत.
मानवाधिकार प्रचारक
पत्रकार आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन असलेल्या नर्गिस मोहम्मदी या इराणमधील डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटरच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी अथक मोहीम चालवली आहे. अलीकडच्या निदर्शनांदरम्यान त्यांनी एवीन तुरुंगातून एक पत्र पाठवले आणि इराण सरकारला आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्यापासून यूएनने प्रवृत्त करण्यासंबंधी विचारणा केली आहे.
2010 मध्ये मोहम्मदीना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पुढे जामिनावर असताना त्यांनी एवीन येथील कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर टीका करत भाषण दिले, यावरून त्यांची शिक्षा वाढवून 16 वर्षे करण्यात आली. व्हाईट टॉर्चर या त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये, 16 माजी कैद्यांच्या मुलाखतींवर आधारित एकांतवासाचे परीक्षण करते. त्यांची दोन मुले, पती, राजकीय कार्यकर्ते तागी रहमानी यांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे.
आंदोलक
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये इराणमधील एका तरुणीचे छायाचित्र आयकॉनिक ठरले आहे. ती आपले केस पोनीटेलमध्ये बांधून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, असा तिचा मागील बाजूकडून फोटो काढला आहे. तिचा फोटो आंदोलकांसाठी धाडसाचे प्रतीक ठरला होता. पण या आंदोलनादरम्यान हत्या झालेल्या हादिस नजाफी या 22 वर्षीय मुलीचा तो फोटो आहे, असा अनेकांचा समज झाला होता.
बीबीसी पर्शियनशी बोलताना या फोटोत प्रत्यक्ष असलेली महिला म्हणाली की, हादिस नजाफी आणि महसा अमिनी यांच्याप्रमाणे ती लढा देईल. ती म्हणाली, “इराणी सरकार मृत्यूची भीती दाखवून आम्हाला धमकावू शकत नाही. इराणच्या स्वातंत्र्याची आम्हाला आशा आहे.”
स्त्रीवादी कार्यकर्त्या
चीनच्या MeToo चळवळीचा चेहरा म्हणून, चोव शाओवशिअन यांचे प्रकरण चीनमधील स्त्रीवादी आणि जागतिक स्तरावर प्रेक्षकांनी फॉलो केले. 2018 मध्ये त्यांनी सरकारी मालकीच्या CCTV ब्रॉडकास्टरमधील एक स्टार प्रेझेंटर निहू चॅन यांच्यावर खटला दाखल केला आणि त्याच्यावर आरोप ठेवला की, त्यांनी 2014 च्या इंटर्नशिपमध्ये बळजबरीने चुंबन घेतले. त्याने हे आरोप नाकारले आणि तिच्यावर मानहानीचा दावा केला.
त्यांची केस पुरेशा पुराव्यांअभावी फेटाळण्यात आली आणि यावर्षी तिचे अपील फेटाळण्यात आले, यानंतर काही परदेशी माध्यमांनी चीनच्या MeToo चळवळीला धक्का दिला. चोव कसिआवशिअन आता लैंगिक छळ झालेल्या आणि चीनमधील स्त्रीवादी समस्यांवर प्रकाश टाकण्यात गुंतलेल्या महिलांना पाठिंबा देतात.
अपंगत्व कार्यकर्त्या
युक्रेनमध्ये मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या युलिया सॅचक या अपंग महिलांसाठी काम करणाऱ्या फाइट फॉर राइट या संस्थेच्या प्रमुख आहेत. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपातकालीन साह्याला सुरुवात केली. युक्रेनमधील हजारो अपंग नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत दिवसरात्र काम करत होत्या.
अपंगत्व असलेल्या मुली आणि महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी सक्षम करण्याचा ध्यास सॅचक यांनी घेतला आहे. त्या ओबामा फाऊंडेशनच्या लीडर युरोप उपक्रमाचा भाग आहेत, त्यांना नॅशनल ह्युमन राईट्स अॅवॉर्ड २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांसाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या समितीवर युक्रेनच्या प्रतिनिधी आहेत.
शांततेच्या प्रचारक
युद्धामुळे बोस्निया आणि हर्जगोव्हिना उध्वस्त झाल्याला तीस वर्षें झाली आहेत. घराकडे परतलेल्या इतर विस्थापित महिलांच्या पुनर्बांधणीसाठी मदत करणाऱ्या सुवादा सेलिमोविच आता एका गावात राहतात. स्वतः एक विधवा आणि पदरात लहान लेकरं असलेल्या सेलिमोविच यांनी शांतता सक्रियता आणि महिला सशक्तीकरण यासाठी अनिमा ही संस्था स्थापन केली.
त्यांच्या पतीचे अवशेष 2008 साली सामूहिक कबरीत सापडले, यानंतर त्यांनी युद्ध गुन्ह्यांच्या न्यायालयात साक्ष दिली आणि इतर महिलांनाही यासाठी प्रोत्साहित केले. आजच्या घडीला अनिमातर्फे युद्धाच्या आघातांशी दोन हात करणाऱ्या महिलांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते आणि महिलांनी बनवलेली उत्पादने विकण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली जाते.
दंतवैद्य आणि मानवतावादी
दंतवैद्य असलेल्या जेहाद हम्दी या इजिप्शियन स्त्रीवादी उपक्रम, स्पीक अपचे संस्थापक आणि व्यवस्थापक आहेत, यामध्ये लिंगावर आधारित हिंसाचार आणि लैंगिक छळाच्या गुन्हेगारांवर प्रकाश टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. 2022 मध्ये संपूर्ण इजिप्तमध्ये महिलांविरुद्ध हिंसक गुन्ह्यांची मालिका घडली आहे, याद्वारे हा मुद्दा प्रकाशझोतात आणला आहे.
ही संस्था महिलांना गैरवर्तनाबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच कायदेशीर आणि भावनिक समर्थन देते. इतकेच नाही तर, अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणते. जागतिक न्याय मंच 2022 मधील समान हक्क आणि भेदभाव न करणारा पुरस्कार जिंकणे यासह हम्दी यांच्या मोहिमेला अनेक प्रसंगी मान्यता मिळाली आहे.
अजून बराच पल्ला गाठायचा आहे; शेवट अद्याप बराच लांब आगे आणि आम्ही आत्ताशी जेमतेम सुरुवात केली आहे.
जेहाद हम्दी
दिव्यांग अधिकार वकील
ज्युडिथ ह्यूमन यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी लढण्यासाठी वाहिलेले होते. त्यांना लहानपणी पोलिओचा संसर्ग झाला होता, त्यानंतर त्या न्यू यॉर्क शहरातील पहिल्या व्हीलचेअर वापरणाऱ्या शिक्षिका ठरल्या.
त्या दिव्यांग अधिकार चळवळीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध नेत्या आहेत आणि यूएस फेडरल बिल्डिंगच्या आतापर्यंतच्या सर्वात प्रदीर्घ सिट-इनमध्ये त्यांच्या सहभागासह - सक्रियतेने प्रमुख कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच ह्युमन यांनी क्लिंटन आणि ओबामा दोन्हींच्या प्रशासनात काम केले आहे आणि त्यांना 20 वर्षांचा ना-नफा क्षेत्रातील अनुभव आहे.
2020 च्या यादीतील अपंगांसाठीच्या कार्यकर्त्या शशी धांडा यांनी नामांकन केलं आहे.
“मला ज्युडिथ यांच्याकडून खरोखर प्रेरणा मिळाली आहे, त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ जागतिक स्तरावर दिव्यांग व्यक्तींच्या मानवी हक्कांना चालना देण्यासाठी काम केले आहे. त्या एक अथक कार्यरत असलेल्या वकील आणि दिव्यांग हक्क चळवळीतील निर्णायक क्षणांचा भाग ठरल्या आहेत.”
मेडिकल डॉक्टर
म्यानमारमधील संकटाच्या काळात आय नायेन थू या आघाडीवर काम करत होत्या. दुर्गद आणि गरीब चिन राज्यावर त्यांनी अधिक लक्ष दिले. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी छोटे ऑपरेटिंग थिएटर असलेले एक तात्पुरते हॉस्पिटल उभारले. तेव्हापासून त्या आजारी आणि जखमींवर उपचार करत आहेत.
मोकळ्या वेळेत त्या इतर भागांमध्ये, जिथे वैद्यकीय उपचारांची गरज आहे अशा ठिकाणी जातात आणि स्थानिक रुग्ण तसेच अंतर्गत स्थलांतरित लोकांना साह्य करतात. मात्र, त्यांच्या या कारकिर्दीत त्यांच्यावर म्यानमार सैन्यदलाने 'हिंसेला चालना दिल्याचा' आरोप ठेवला आहे. पीपल्स डिफेन्स फोर्सेस या सरकारविरोधी, सैनिक प्रशिक्षण घेतलेल्या स्थानिकांच्या गटाला मदत करत असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
सार्वजनिक धोरण आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ
इफोमा ओझोमा हिने तिची माजी रोजगारनियोक्ती कंपनी असलेल्या पिंटरेस्टसोबत केलेल्या नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंटचे उल्लंघन करत या कंपनीवर लिंगावर आधारित व वांशिक भेदभाव केल्याचा आरोप केला. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या गैरवर्तणुकीसंदर्भात मदत करण्याचा इफोमा ओझोमा यांचा निर्धार आहे. सायलेन्स्ड नो मोअर ॲक्टची ती प्रायोजक झाली. या द्वारे एनडीएवर स्वाक्षरी केली असली तरी कॅलिफोनर्नियामधील कोणताही/कोणतीही कामगार भेदभाव व छळाबदद्ल माहिती देऊ शकते. ओझोमाने आरोप केल्यानंतर पिंटरेस्टने कामाच्या ठिकाणाचा आढावा घेतला आणि या कायद्याला आपला पाठिंबा असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
ओझोमाने टेक वर्कर हँडबुक तयार केले. कर्मचाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी मदत करण्यास स्रोतांचे हे संकलन आहे आणि अर्थसीड या संस्थेची स्थापन केली जी ऑरगनायझेशन्सना तंत्रज्ञान क्षेत्रातील समानतेविषयी सल्ला देते.
प्रजननविषयक हक्कांसाठीची जनजागृती
तत्वज्ञानाच्या विद्यार्थी, लेखिका आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या असणाऱ्या सँडी कब्रेरा आर्टिआगा या महिलांच्या लैंगिक आणि प्रजननविषयक हक्कांसाठी लढतात. लैंगिक संबंधाच्या दुसऱ्या दिवशी घेता येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कसा करायचा याविषयीच्या कार्यशाळा त्या घेतात आणि Emergency Contraception म्हणजे तातडीने घ्यायच्या गर्भनिरोधकांविषयीची माहिती देणाऱ्या शैक्षणिक मोहिमेचा त्या एक भाग आहेत.
याशिवाय त्या यूथ अॅक्शन या गटातही आहेत. तरुणांच्या मानवी, लैंगिक आणि मूल जन्माला घालण्याच्या हक्कांसाठी हा गट कार्यरत आहे. होंडुरसच्या साईन लँग्वेजमध्ये त्या निष्णात आहेत. त्यांची आई कर्णबधीर आहे आणि आईने केलेल्या सर्वंकष जडणघडणीचा सँडी यांना अभिमान आहे.
सांकेतिक भाषा दुभाषी
मातेचे मानसिक आरोग्य आणि नवजात बाळांच्या कर्णबधिर मातांचे आरोग्य याबद्दल जनजागृती करणाऱ्या ज्युडी कायहुंबा यांच्या लक्षात आले की केनियामधील काही रुग्णालयांमध्ये सांकेतिक भाषा दुभाषी उपलब्ध नाहीत. त्यानंतर त्यांनी सर्व मातांना आरोग्यविषयक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्या टॉकिंग हँड्स, लिसनिंग आइज ऑन पोस्टपार्टम डिप्रेशन (THLEP) च्या संस्थापक आहेत आणि कर्णबधिर मातांना मातृत्वाच्या काळात त्या साह्यही करतात. २०१९ मध्ये स्वत: बाळंतपणातील नैराश्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ही संस्था सुरू केली. या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच समुह डोहाळजेवणाचे आयोजन केले. त्यात ७८ कर्णबधिर माता तसेच हेल्थकेअर प्रॅक्टिशनर आणि कौन्सिलर्सचा समावेश होता.
बालरोगतज्ज्ञ
प्रचंड गोळीबारातही डॉ. इरीना कोंड्रादोवा आणि त्यांच्या टीमने खार्किव प्रादेशिक पेरिनेटल सेंटरमध्ये गर्भवती महिला, नवजात आणि मातांची अथक काळजी घेणे सुरू ठेवले. त्यांनी हॉस्पिटलच्या तळघरात एक लेबर वॉर्ड तयार केला. हवाई हल्ल्याचे सायरन वाजले तरीही अतिदक्षतेसाठी ठेवलेल्या बाळांसोबत राहून आपला जीव धोक्यात घातला.
आपल्यासमोरील आव्हाने मांडण्यासाठी केंद्रप्रमुख या नात्याने, डॉ कोंड्रादोवा यांनी मार्चमध्ये डेव्हिड बेकहॅमचे इंस्टाग्राम वापरायला घेतले. त्यांच्या टीमने 2014 पासून लुहान्स्क आणि डोनेत्सेक येथील 3,000 हून अधिक महिलांना वैद्यकीय आणि मानसिक मदत दिली आहे.
आमची घरे, रस्ते, वीज केंद्रे, रुग्णालये - आमचं जीवनच नष्ट झाले आहे. पण आपली स्वप्ने, आपल्या आशा आणि आपला विश्वास नेहमीपेक्षा अधिक जिवंत आणि मजबूत आहे.
इरीना कोंड्रादोवा
तंत्रज्ञान उद्योजिका
असोनेले कोटू यांना संततीनियमन काढून घ्यायचे होते, पण त्यांना ही सेवा उपलब्ध करून देणारी एकही व्यक्ती सापडत नव्हती. यातून त्यांच्या व्यवसायाची संकल्पनेचा जन्म झाला. त्यांनी त्यांनंतर फेमकनेक्ट ही संस्था सुरू केली. पिरियड पॉव्हर्टी (मासिक पाळीचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारी उत्पादने खरेदी करण्याचीही ऐपत नसणे) कमी करण्यासाठी आणि पौंगडावस्थेतील मुलींमधील गर्भधारणा कमी करण्यासाठी ही स्टार्ट अप संस्था तंत्रज्ञान उपाययोजना उपलब्ध करून देते.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युझर्सना कोणताही अवघडलेपणा न येता किंवा भेदभावाशिवाय लैंगिक व प्रजनन टेलिमेडिसीन, तसेच मासिक पाळी, योनी व योनिमार्गाशी संबंधित स्वच्छता करण्याची उत्पादने उपलब्ध होतात. तुम्ही ज्याप्रमाणे पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करता, अगदी त्यानुसार या सेवा उपलब्ध होतात. पिरियड पॉव्हर्टीचे उच्चाटन करण्याची आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्धतेत सुधारणा करण्याची, विशेषतः जोखीमगटात येणारे तरुण आणि वंचित व उपेक्षित समुदायांना या सेवा उपलब्ध करून देण्याची तळमळ कोटू यांना आहे.
आपल्या पालकांना ज्या हालअपेष्टा सोसल्या तो त्रास आपल्या पुढील पिढ्यांना भोगावा लागू नये यासाठी या समस्यांवरील उपाययोजना निर्माण करण्याचा तरुणांचा निर्धार पाहणे सुखदायक आहे.
असोनेले कोटू
पर्यावरण उद्योजक
COP 27 परिषदेमध्ये सहभागी झालेल्या मादागास्करच्या अधिकृत शिष्टमंडळामध्ये मेरी क्रिस्टीाना कोलो सहभागी होत्या. त्या एक पर्यावरणपूरक - सामाजिक बांधिलकी असणाऱ्या उद्योजक आणि इकोफेमिनिस्ट आहेत. वातावरण बदलाशीनिगडीत मानवी हक्क आणि लिंगभेदाशी संबंधित विषयांबद्दलची जागरूकता त्या निर्माण करतात. मादागास्करमध्ये सातत्याने दुष्काळ पडत असल्याने लाखोंना उपासमारीला सामोरं जावं लागतं. मादागास्करमधला दुष्काळ हा हवामान बदलामुळे झालेला पहिला दुष्काळ असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघांनी जाहीर केलं होतं.
कोलो या 'पीपल पॉवर इनक्लुजन' या बिगर सरकारी संस्थेच्या प्रादेशिक संचालक आहेत. ही संस्था पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था उभी करत गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करते. याशिवाय Green'N'Kool या सोशल मोहिमेद्वारे त्या वातावरण बदलाविषयीचे मुद्दे मांडतात. महिला असल्याने होणाऱ्या अत्याचारांना त्या देखील बळी पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बलात्कारांच्या विरोधात आवाज उठवणारी - ब्रेक द सायलेन्स मोहीम सुरू केली.
पुरुषप्रधान संस्कृती, हिंसाचार आणि हवामान बदलाच्या परिणामांना बळी पडलेली गरीब लोकं म्हणून आमच्याकडे पाहू नका. कितीही अडचणी आल्या तरी महिला चिवटपणे त्याचा सामना करू शकतात आणि म्हणूनच मला भविष्याबद्दल आशा आहे.
मेरी क्रिस्टीना कोलो
हृदय शल्यविशारद
तुर्कस्थानातील स्थलांतरित पालकांच्या पोटी जर्मनीत जन्माला आलेल्या डॉ. डिलेक गुरसोय या आघाडीच्या हार्ट सर्जनआणि कृत्रिम हृदय तज्ज्ञ आहेत. जर्मनीत फोर्ब्स मॅगझीनच्या मुखपृष्ठावर त्या झळकल्या आहेत. कृत्रिम हृदय बसवणाऱ्या युरोपातील पहिल्या महिला सर्जन म्हणून त्यांचे या अंकात कौतुक करण्यात आले आहे.
दशकभराहून अधिक काळा त्या कृत्रिम हृदयारोपण संशोधनात आघाडीवर आहेत. अवयवदानाचे कमी प्रमाण पाहत हृदय प्रत्यारोपणाला पर्याय निर्माण करण्यासाठी त्या काम करत आहेत. यात स्त्रीशरीरशास्त्रावर त्यांचा अधिक भर आहे. त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे आणि आता त्या स्वत:चे हार्ट क्लिनिक सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.
मानवतावादी कार्यकर्ते
एक मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करणारे कार्यकर्ते, वेगाता गॅब्रिओनास आबरा हे देखील हड्रिना या ना नफा संस्थेचे संस्थापक आहेत. युद्धामुळे टिग्रेमध्ये फैलावलेल्या कुपोषणाचे निर्मूलन करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हड्रिनाकडे युद्धग्रस्त महिला आणि मुलांना मदत करण्यासाठी अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये विस्थापित लोकांसाठी (IDP) च्या शिबिरात आपत्कालीन आहार कार्यक्रम आणि शहरी बागकाम प्रकल्प यांचा समावेश आहे.
संघर्ष असलेल्या ठिकाणच्या लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या आणि युद्धामुळे सर्वस्व गमावलेल्या महिला, ज्या पुढे व्यावसायिक शरीर विक्रेत्या बनल्या, अशा महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रकल्पही ही संस्था चालवते.
राजकारणी आणि आघाडीवरील वैद्यकीय स्वयंसेविका
हॉस्पिटलर्स ही युद्धात आघाडीवर कार्यरत असलेल्यांचा जीव वाचवणारी स्वयंसेवक पॅरामेडिक संस्था आहे. स्वयंसेवक याना झिंकेविच यांच्या नेतृत्वाखाली लोकांना युद्धभूमीतून बाहेर काढण्याचे काम करतात. शाळा सोडल्यानंतर झिंकेविच वैद्यकीय स्वयंसेवक बनल्या आणि युक्रेनमधील शत्रुत्वाला सुरुवात झाली, त्यावेळी म्हणजेच 2014 साली त्यांनी बटालियनची स्थापना केली.
त्यांनी स्वतः 200 जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. त्यांची टीम जखमी सैनिक आणि नागरिकांना प्रथमोपचार देते, त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण आयोजित करते. त्या सर्वांनी आतापर्यंत सुमारे 6,000 लोकांना बाहेर काढले आहे. त्या 27 वर्षांच्या असून, युक्रेनच्या संसदेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. तसेच त्या लष्करी औषध उपसमितीच्या प्रमुखही आहेत.
पॅरामेडिक
युलिया पाव्येस्का या शौर्यपदकविजेत्या युक्रेनिअन नागरी पॅरामेडिक आणि तैराज एंजल्स या संस्थेच्या संस्थापिका आहेत. या संस्थेने शेकडो जखमी नागरिक व लष्करातील व्यक्तींचा जीव वाचवला. युलिया पाव्येस्का यांना तैरा म्हणून ओळखले जाते. मारियोपोल येथील नागरिकांची सुटका करण्यास मदत करताना मार्च महिन्यात त्यांना रशियन सैन्याने ताब्यात घेतले.
शत्रूसैन्याचा वेढा असलेल्या शहरात त्यांची टीम करत असलेल्या कामाचे त्यांनी बॉडी कॅमेरा वापरून दस्तावेजीकरण केले आणि हे चित्रीकरण त्यांना माध्यमांना दिले. तीन महिन्यांनी त्यांची सुटका झाल्यावर पाव्येस्का यानी त्या रशियाच्या ताब्यात असताना असलेली भयानक परिस्थिती वर त्यांना मिळालेली क्रूर वागणूक याबद्दल वाचा फोडली आणि आपला तुरुंग 'नरक' असल्याचे वर्णन त्यांनी केले.
तंत्र उद्योजक
यांनी वयाच्या 17 वर्षांपर्यंत कधीही कॉम्प्युटर वापरला नाही. तरीही आजच्या घडीला प्रोग्रामर समरावित फिकरू या हायब्रीड डिझाइन्सच्या संस्थापक आहेत. तसेच त्यांची कंपनी इथिओपिआतील राइड या टॅक्सी ॲपला पाठिंबा देणारी एक महत्त्वाची कंपनी आहे.
काम संपवल्यावर टॅक्सीत बसून जाणे असुरक्षित वाटणे आणि अतिरिक्त शुल्क भांडून घेऊ पाहणाऱ्या ड्रायव्हरबरोबरचे अनुभव यांमुळे त्या हे ॲप तयार करण्यास प्रवृत्त झाल्या. या ॲपची सुरुवात त्यांनी 2,000 डॉलर्स (सुमारे 1,700 पौंड) पेक्षा कमी रकमेतून केली. त्यांच्या कंपनीत आता बहुसंख्य महिला कर्मचारी आहेत. इथिओपियाच्या तंत्रज्ञान उद्योगात काही महिला आहेत आणि फिकरूला तरुण महिला उद्योजकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा द्यायची आहे.
महिलांच्या मालकीच्या व्यवसायांची संख्या वाढते आहे; आता आम्हाला अधिक सर्जनशील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जास्तीत जास्त तरूणींनी आर्थिक क्षेत्रातही शिरण्याची गरज आहे असे वाटते.
समरावित फिकरू
एरोनॉटिकल इंजिनीअर
2021 मधल्या युनिटी 22 या ऐतिहासिक मिशनमध्ये श्रीषा सहभागी होत्या. व्हर्जिन गॅलाक्टिकच्या पहिल्या पूर्ण क्षमेतने क्रू असलेल्या सब-ऑर्बिटल स्पेसफ्लाइटमधून त्यांनी अवकाशवारी केली आणि अवकाशात गेलेल्या भारतात जन्मलेल्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या.
बंडला यांना अगदी लहानपणापासूनच अवकाशाबद्दल कुतूहल होते. त्यांनी अमेरिकेत जाऊन एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्या व्हर्जिन गॅलाक्टिकच्या गव्हर्न्मेंट अफेअर्स अॅण्ड रिसर्च ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष आहेत. व्हीजीच्या स्पेसशीपमधून संशोधन करणाऱ्या ग्राहकांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोग घेऊन जाणे, ही जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
2016 च्या 100 विमेन यादीतील अभिनेत्री सनी लिओनी यांनी त्यांचे नाव सुचवले आहे.
“पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात श्रीषा सर्व अडथळ्यांवर मात करत निव्वळ आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करत आहेत. त्यांच्यातील ही निष्ठा माझ्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे.”
पर्यावरणशास्त्रज्ञ
दुर्मिळ होत असलेल्या प्रजातींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा वापरल्याबद्दल इराणमध्ये 2018साली काही पर्यावरण शास्त्रज्ञांना ताब्यात घेण्यात आलं होतं. निलोफर बयानी या त्यांच्यापैकी एक. धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील भागांमधली गोपनीय माहिती गोळा केल्याच्या आरोपाखाली बयानींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
एशियाटिक चित्ता आणि इतर प्रजातींसाठी काम करणाऱ्या पर्शियन वाईल्डलाईफ हेरिटेज फाऊंडेशनच्या प्रोग्राम मॅनेजर होत्या. 'इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनी किमान 1200 तास आपला भीषण मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळ केला आणि लैंगिक अत्याचाराच्या धमक्या दिल्याचं' त्यांनी म्हटलं होतं. बीबीसी पर्शियनकडे याबाबतची कागदपत्रं आहेत. इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
नर्स आणि लस शिक्षक
व्हिक्टोरिया बाप्टिस्ट या अमेरिकेतील मेरीलँडमधील नर्स लोकांना लसीविषयी माहिती देतात. कृष्णवर्णीय समाजात वैद्यकीय हस्तक्षेपांबद्दल संशय का असेल, याची त्यांना जाणीव आहे. बाप्टिस्ट या हेनरिटा लॅक्स यांच्या वंशज आहेत. लॅक्स या कृष्णवर्णीय महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे 1951 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या परवानगीविना त्यांच्या पेशी काढून घेतल्या गेल्या आणि त्यांच्या अशा पहिल्या पेशी होत्या, ज्यांची संख्या प्रयोगशाळेत वाढत होती.
या पेशींचे नाव हेला सेल असे असून आतापर्यंत या पेशींचा उपयोग वैद्यकीय संशोधनासाठी करण्यात येतो. पण कुटुंबियांना या संदर्भात अनेक दशके माहिती नव्हती. बाप्टिस्ट या आता हेनरिका लॅब्स फाउंडेशनचा भाग आहेत. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निर्मूलनासाठी त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ॲम्बेसेडर आहेत.
नर्स
इराकी कुर्दीस्तानात भाजलेल्या रुग्णांच्या विभागात निगार मार्फ हेड नर्स म्हणून कार्यरत आहेत. स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांवर त्या उपचार करतात. आजही, निषेध व्यक्त करण्यासाठी या भागात तरुण महिलांमध्ये असे स्वत:ला जाळून घेणे सर्रास केले जाते.
मार्फ जवळपास 25 वर्षे हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत. लहान मुलांसाठीच्या भाजणे आणि अतिदक्षता अशा दोन्ही विभागात त्यांनी काम केले आहे. अपघाती भाजण्यातून वाचलेल्यांवरही त्या उपचार करतात. त्या ज्यांच्यावर उपचार करतात त्यातील अनेक स्त्रियांनी असे पाऊल उचलण्याआधी त्यांचा मानसिक किंवा शारीरिक छळ झालेला असतो. यातील काही तर अगदी 16 वर्षांच्या तरुणी असतात.
व्यावसायिक महिला
कॉर्पोरेट वकील-उद्योजक असलेल्या मोनिका मुसांडा जावा फूड्सच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. जावा फूड्स ही झांबियामधील एक अन्न प्रक्रिया करणारी कंपनी असून, दक्षिण आफ्रिकेतील ती इन्स्टंट नूडल उत्पादक कंपनीही आहे. झांबियातील भरघोस गहू उत्पादन तसेच जास्तीत जास्त सोपे खाद्यपदार्थ पुरवण्याची मागणी आणि बदलत्या वापर पद्धती या बाबींचा लभ घेत परवडणारी अन्न उत्पादने तयार करणे हा त्यांचा दृष्टीकोन आहे.
मुसांडा या सकस अन्न या क्षेत्रातील वकील आहेत. इतर अनेक महिला उद्योजकांना त्या मार्गदर्शन करतात आणि व्यवसायात महिलांवर परिणाम करणाऱ्या समस्यांवर बोलतात. त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तसेच आफ्रिकेतील कृषी आणि अन्न प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या कार्याबद्दल त्यांची ओळख आहे.
अंतराळवीर आणि खगोल भौतिकशास्त्रज्ञ
आकाशगंगेमध्ये काळानुसार कसे बदल होत गेले याचा अभ्यास नासाच्या खगोल भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. जेन रिग्बी करतात. जगातली सर्वात मोठी अवकाश दुर्बिण - जेम्स वेब टेलिस्कोप लाँच आणि कार्यरत करणार्या आंतरराष्ट्रीय टीममधल्या त्या एक महत्त्वाच्या वैज्ञानिक होत्या. या टेलिस्कोपने काढलेला फोटो जुलै महिन्यात जगभर गाजला होता.
रिग्बी यांचे 100 पेक्षा अधिक शोध निबंध आतापर्यंत प्रसिद्ध झाले असून या संशोधनांसाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि गणित क्षेत्रात महिलांना समान संधी मिळावी यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
मी विद्यार्थीदशेत असताना मला कोणीही LGBTQ आदर्श माहिती नव्हते. मी आशा करते की क्वीअर आदर्शांशिवाय मोठी झालेली माझी पिढी ही शेवटची असेल.
जेन रिग्बी
कोको उद्योजक
एरिका लिरियानो या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये कोको पुरवठा साखळीची पुनर्कल्पना करण्याच्या उद्देशाने नफा-सामायीकरण निर्यात स्टार्ट-अप चालवतात. कोकोचे उत्पादन आणि वितरण अधिक चांगले आणि अधिक टिकाऊ बनवण्याच्या उद्देशाने लिरियानो यांनी तिची बहीण जेनेट यांच्यासह INARU ची सह-स्थापना केली. यावर्षी त्यांच्या स्टार्टअपला सीड फंडिंग मिळाले.
ऐतिहासिकदृष्ट्या कोको उद्योग लहान शेतकऱ्यांचे शोषण करतो. परंतु त्यांची कंपनी डोमिनिकन उत्पादकांसाठी नैतिक स्रोत आणि वाजवी वेतन सुनिश्चित करते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या या बहिणी डॉमिनिकन रिपब्लिकमधील शेतकरी आणि उद्योजक कुटुंबातील आहेत. त्या आता देशभरातील महिला चालवत असणारी शेतं, सहकारी संस्था आणि पुरवठादारांसोबत भागीदारी करतात.
तुमचा स्वतःचा मार्ग ठरवण्याची शक्ती ही अशी गोष्ट आहे ज्याचा सर्व मानवांना अधिकार असला पाहिजे. तसेच स्त्रीला स्वतःसाठी कोणत्या प्रकारचे जीवन हवे आहे तेही ठरवता यायला हवे.
एरिका लिरियानो
मानसशास्त्रज्ञ
ट्रॉमा थेरपिस्ट नाजा लीबर्थ या जेमतेम 13 वर्षांच्या असताना त्यांच्या मर्जीच्या विरोधात त्यांच्या शरीरात गर्भरोधक उपकर (IUD - कॉपर टी) बसवण्यात आली. 1960 आणि 70 च्या दशकात ग्रीनलंडमधल्या मूल निवासी समाजावर (Inuit Greenlanders) डेनिश डॉक्टर्सनी जबरदस्तीने कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला होता. जवळपास 4500 महिला आणि मुलींवर या उपचार पद्धती करण्यात आल्या. या मोहीमेबद्दलचा तपास सुरू करण्याचं यावर्षी डेन्मार्क आणि ग्रीनलंडने अधिकृतरित्या जाहीर केलंय.
ज्या महिलांना अशाप्रकारच्या जबरदस्तीच्या कुटुंब नियोजनामुळे वंधत्वं आलं त्यांना लीबर्थ मदत करतात. या महिलांना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्यांनी एका फेसबुक ग्रुपची सुरुवात केली आहे.
या विदारक अनुभवातून उभ्या राहिलेल्या अधिकाधिक महिला आता इतरजणींसाठी आदर्श म्हणून समोर येत आहेत. खुलेपणाने बोललं की भीती निघून जाते, तुमच्या लक्षात येतं की इथे कोणीही तुम्हाला जोखत नाही. आपण भीतीखाली दबून राहू शकत नाही.
नाजा लीबर्थ
गणितज्ज्ञ
युक्रेनच्या गणितज्ज्ञ या वर्षीच्या सुरुवातीस, प्रतिष्ठित फील्ड मेडल जिंकणाऱ्या इतिहासातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. या बक्षिसाला गणिताचे नोबेल पारितोषिक म्हटले जाते. हे बक्षीस दर चार वर्षांनी दिले जाते. मरीना व्हिओझोस्का यांनी 400 वर्षं जुन्या कोड्यावर केलेल्या कामासाठी हा पुरस्कार मिळवला. त्यांनी या कोड्याद्वारे आठ मिती असलेल्या जागेत सर्वात कार्यक्षमतेने गोलाकार कसे बांधले जावेत, या समस्येचे निराकरण केले.
स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन लुसर्न (EPFL) येथील गणिताच्या संस्थेत व्हिओझोस्का संख्या सिद्धांताच्या प्राध्यापक आणि अध्यक्ष आहेत.
अभियंता
ऐनुरा साग्यन या संगणक अभियंता, इको-फेमिनिस्ट आणि स्टार्ट अपच्या सीईओ आहेत. पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सोल्यूशन्स उभारण्यासाठी त्या आपल्या कौशल्याचा वापर करतात. त्यांनी तझार ॲप तयार केले आहे. या माध्यमातून त्या कचरा निर्माण करणारे सर्व घटक म्हणजेच घरे व व्यक्ती, रेस्टॉरंट्स, कारखाने, बांधकामाच्या साइट्स यांना रिसायकल(पुनर्वापर) करणाऱ्यांशी जोडून देण्यात येते. लँडफिल्समध्ये दररोज येऊन पडणारा कचरा कमी करणे आणि मध्य आशियाई देशांमधील शाश्वततेची समस्या हाताळणे हे या ॲपचे उद्दिष्ट आहे.
त्यांनी किरगिझस्तानमधील विविध भागांमधील 2,000 शालेय विद्यार्थिनींसाठी कोडिंग व स्टेम (सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथमॅटिक्स) या विषयांमधील कार्यशाळांचे नेतृत्व केले.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महिलांचे नेतृत्व व सहभागाशिवाय शाश्वत ग्रह आणि लैंगिक-समान भविष्य प्रत्यक्षात आणणे कठीण आहे.
ऐनुरा साग्यन
पुनरुप्तादन न्याय कार्यकर्ता
दक्षिण अमेरिकेतील राज्यांमध्ये पुनरुत्पादन न्यायासाठी काम करणाऱ्या सिस्टरसाँग या सर्व वर्णीय महिलांच्या एकत्रित संघटनेच्या कार्यकारी संचालक असलेल्या मोनिका सिम्पसन या लैंगिक आणि प्रजनन स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. देशभरात कायदेशीर गर्भपाताला मान्यता देणाऱ्या रो विरुद्ध वेड खटल्यातील निकालाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या वर्षॅ रद्दबातल ठरवल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सिम्पसन या गायिका आणि स्पोकन वर्ड आर्टिस्ट आहेत. त्या आपल्या कलेला सामाजिक कार्याशी जोडतात. त्या प्रमाणित दाई आहेत आणि ब्लॅक ममाज मॅटर अलायन्स या संस्थेच्या संस्थापक सदस्य आहेत. कृष्णवर्णीयांच्या बाळंतपणातील आरोग्यासाठी त्या काम करतात.
संवर्धन कार्यकर्त्या
जैवविविधतेचे संवर्धन करण्याची बांधिलकी जपणाऱ्या बायोलॉजिस्ट सोफिया हायननेन यांनी दक्षिण अमेरिकेतील विविध प्रजाती लुप्त होण्याच्या संकटावर सर्वप्रथम उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले. जगातील एक सर्वात मोठी पाणथळ परिसंस्था मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनामधील एस्टेरोस डेल इबेरा येथे त्यांनी अनेक प्रजातींचे पुनर्वसन केले. संरक्षित जागा निर्माण करण्यासाठी त्या ३० वर्षांहून अधिक काळ प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली रिवाइल्डिंग अर्जेंटिना हा प्रकल्प पॅटागेनिअन स्टेपसह चार महत्त्वाच्या पर्यावरण क्षेत्रात सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत खासगी जागेला संरक्षित राष्ट्रीय उद्यानांमध्ये बदलले जाते आणि तेथे मूळ प्रजाती नव्याने वसवून पर्यावरण संस्था पुन्हा उभी करून शाश्वत पर्यावरण पर्यटनाला चालना दिली जाते.
पर्यावरणवादी
किमिको हिराता यांचा औष्णिक वीज निर्मितीला विरोध आहे. त्यांनी त्यांचं निम्म्यापेक्षा अधिक आयुष्य जपानचं कोळशावर ऊर्जानिर्मितीसाठी अवलंबून राहणं कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात घालवलं आहे. हवामान बदलांमागच्या मोठ्या कारणांपैकी हे एक कारण आहे. किमिको यांच्या प्रयत्नांमुळे कोळशापासून वीज निर्मिती करणारे 17 प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात आले. 'गोल्डमन इन्व्हायर्नमेंटल प्राईझ' मिळणाऱ्या त्या पहिल्या जपानी महिला आहेत.
1990च्या दशकात अल् गोअर यांचं 'अर्थ इन द बॅलन्स' हे पुस्तक वाचल्यानंतर हिराता यांनी प्रकाशन संस्थेतली नोकरी सोडत पूर्णवेळ पर्यावरण कार्य स्वीकारलं. आता त्या क्लायमेट इंटिग्रेट या जानेवारी 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यकारी संचालक आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ही संस्था काम करते.
बीबीसी 100 विमेन दर वर्षी जगभरातील 100 प्रभावी व प्रेरणादायी महिलांची नावे प्रसिद्ध करते. महिलांना केंद्रस्थानी ठेवत आम्ही त्यांच्या आयुष्यावरील माहितीपट, लेख आणि मुलाखती तयार करतो.
बीबीसी 100 विमेनला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा. #BBC100Women चा वापर करून या संभाषणात सहभागी व्हा.
बीबीसीने गोळा केलेली नावे आणि बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिस भाषा टीमच्या नेटवर्कने सुचविलेल्या नावांच्या आधारे बीबीसी 100 विमेन यादी तयार करण्यात येते. गेल्या 12 महिन्यांमध्ये ज्यांची माध्यमांनी दखल घेतली, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे सांगण्यासाठी प्रेरणादायी कथा आहेत किंवा काहीतरी महत्त्वाची ध्येयसिद्धी केली आहे किंवा त्यांच्या समाजावर प्रभाव टाकला आहे, पण ज्यांची फारशी दखल घेतली गेली नाही, अशा महिलांचा आम्ही शोध घेत होतो. गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती या यंदाच्या वर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या आधारे आमच्याकडे आलेल्या यादीतील महिलांचे मूल्यमापन करण्यात आले.
आम्ही असे विषय निवडले ज्यात मतमतांतरे असतात. उदा. प्रजनन हक्क. या बाबतीत एका महिलेसाठी ती प्रगती असू शकते तर दुसऱ्या महिलेसाठी तो प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो आणि अशा महिलांचे नामांकन करण्यात आले ज्यांनी स्वतः तो बदल घडवला आङे. अंतिम नावांची निवड करण्याआधी प्रांतीय प्रतिनिधीत्व आणि निःपक्षपातीपणा या निकषांवरही पडताळणी करून घेण्यात आली.
या यादीतील काही महिला अज्ञात राहून सहभागी झाल्या किंवा त्यांनी आडनाव दिलेले नाही. कारण त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा जपायची होती. बीबीसीने त्यांच्या परवानगीनेच आणि बीबीसीच्या संपादकीय धोरणाच्या व सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ही यादी जाहीर केली आहे.
...there we go.