BBC ने 2023 सालातील जगभरातील सर्वांत प्रभावी आणि प्रेरणादायी 100 स्त्रियांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये मानव अधिकार चळवळीतील वकील अमल क्लूनी, हॉलिवूड कलाकार अमेरिका फेरेरा, स्त्रीवादाच्या प्रणेत्या ग्लोरिया स्टायनेम, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, सौंदर्यप्रसाधन व्यावसायिक हुदा कत्तान आणि बॅलॉन डो-र विजेत्या फूटबॉलपटू ऐताना बॉनमाटी, AI तज्ज्ञ तिमनित गेब्रू यांचा समावेश आहे.
प्रचंड उष्णता, वणवे, पूर आणि अशा इतर नैसर्गिक आपत्तींनीही थैमान घातल्याच्या बातम्या या वर्षभरात दिसत राहिल्या. त्यामुळे हवामान बदलाविषयी आपापल्या समाजात कार्यरत असणाऱ्या आणि त्याचे दाहक परिणाम सुसह्यकरण्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांनाही यावर्षीच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाविषयीच्या अधिवेशनाच्या (COP28) पार्श्वभूमीवर BBC 100 Women च्या या यादीत 28 महिला हवामानविषयक काम करणाऱ्या आहेत.
यादीतील नावे कुठल्याही क्रमवारीनुसार नाहीत
टीव्ही प्रेझेंटर
ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर टीव्ही अँकरिंग सुरू ठेवणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रियांपैकी एक आहेत होसाइ अहमदझइ.
नव्या राजवटीत महिलांनी माध्यमांमध्ये करण्याला सामाजिक विरोध आहे आणि त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. तरीही होसाइ यांनी शमशाद टीव्हीवर आपलं काम सुरू ठेवलं आहे.
त्यानंतर त्यांनी अनेक तालिबान नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण त्या या नेत्यांना काय विचरू शकतात यावर निर्बंध आहेत. त्यांच्या वर्तनावर त्या आक्षेप घेऊ शकत नाहीत.
अहमझै यांना कायदा आणि राजकारण यांच्या अभ्यासाची पार्श्वभूमी आहे. गेल्या सात वर्षांपासून त्या मीडियात काम करत आहेत. त्यांचा भार मुलींचं शिक्षण हादेखील आहे. तालिबान राजवटीत त्यावर निर्बंध आले आहेत.
ग्रीन एनर्जी कन्सल्टंट
ताजिकिस्तानच्या ग्रामीण भागातील महिलांना सामान्यतः वीज किंवा जळणासाठी लाकूड मिळवण्यात अडचणी येतात. पर्यावरणवादी स्वयंसेवी प्रकल्पाच्या संयोजक नतालिया इद्रिसोवा या वीज आणि इंधन टंचाईवर पर्यावरणाला हानी न पोहोचवता प्रत्यक्षात येऊ शकतील असे उपाय सुचवतात. उर्जाबचतीचे तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधनसामद्रीचा वापर यावर त्या स्थानिक महिलांना मार्गदर्शन करतात.
महिलांच्या प्रशिक्षणाखेरीज त्यांची संस्था उर्जाबचत करणारे सौरकुकर, सौरचुलीसारखी सामग्रीही पुरवते. यातून महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेचीही बचत होते आणि लैंगिक समानतेच्या दृष्टिकोनातून अशा पर्यावरणस्नेही पद्धतीने त्यांना स्वतःसाठी वेळ मिळतो.
हवामान बदलाचा परिणाम विशेषतः अपंग व्यक्तींवर कसा होतो याविषयी आता इद्रिसोवा गावाखेड्यातून प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे आवाज वरपर्यंत पोहोचवून राजकीय चर्चेमध्ये याचा समावेष व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जगभरात घडणाऱ्या टोकाच्या पर्यावरणीय घडामोडींमधून माणूस निसर्गापासून वेगळा राहू शकत नाही, हाच शेवटचा इशारा आपल्याला मिळत आहे. आपण निसर्गाचे निष्काळजीपणाने लचके तोडू शकत नाही, त्याचे गंभीर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.
नतालिया इद्रिसोवा
शाश्वत पर्यटन तज्ज्ञ
पर्यटन व्यवसायातील एकमेव हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या सुझॅन एट्टी पर्यटन उद्योगाचं भविष्य अधिक शाश्वत असावं यासाठी झटतात.
इंट्रेपिड ट्रॅव्हल या साहसी पर्यटनाच्या छोट्या उद्योगासाठी जागतिक पर्यावरण प्रभाव व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली विज्ञानाधारित कार्बन रिडक्शन टारगेट्स ठेवणारे पहिली टूर कंपनी म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
एट्टी यांनी पर्यटन उद्योगाबाबत एक मुक्तस्रोत मार्गदर्शक लिहिलं आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने लिहिलेलं हे मार्गदर्शक 'टूरिझम डिक्लेअर्स' नावाने स्थापन झालेल्या स्वयंसेवी गटाचा मुख्य आधारस्तंभ राहिलं आहे. या गटात 400 पर्यटन कंपन्या, संस्था आणि पर्यटन व्यावसायिक सहभागी झालेले आहेत. क्लायमेट इमर्जन्सी असल्याचं जाहीर करत हे व्यावसायिक एकत्र आले आहेत.
आज आपल्याला अधिकाधिक उद्योग पर्यावरण बचावासाठी कृती करण्याचं महत्त्व ओळखताना दिसत आहेत. पर्यावरणावरचा परिणाम कमी करण्यासाठी शाश्वत उर्जास्रोतांवर खर्च करून कार्बन उत्सर्जनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ते कटिबद्ध होताना दिसतात.
सुझान एट्टी
शालेय शिक्षिका
9/11 नंतरच्या अमेरिकेत फ्लोरिडा राज्यात वाढताना आता माध्यमिक शाळेत शिक्षिका असणाऱ्या सारा ओट चुकीच्या माहितीची शिकार झाल्या होत्या.
स्वतः विज्ञानात शिक्षण घेऊनही हवामान बदल ही खरोखर घडत असलेली घटना आहे का याविषयी त्यांच्या मनात शंका होती.
आपण चुकीचा विचार करत होतो याची समज आणि ते मान्य करणं ही त्यांच्या सत्यशोधनाच्या प्रवासातली पहिली पायरी होती. हा प्रवास त्यांना नॅशनल सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या क्लायमेट चेंज अम्बॅसेडर पदापर्यंत घेऊन गेला.
आता त्या अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात स्थायिक असून हवामान बदल याच विषयाला धरून त्या भौतिक शास्त्रातील संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि पर्यावरणाच्या प्रश्नांबद्दल जनजागृती करतात.
हवामान बदल ही सर्वांनी तातडीने दखल घेत कृती करण्यासारखी परिस्थिती आहे. पण आपण सगळंच एकहाती करू शकत नाही. चळवळ ही एखाद्या बागेसारखी असते. तिला हंगामी बहर येतो. काही वेळा ती विश्रांती घेते. तुम्ही ज्या हंगामात आहात त्याचा आदर करा.
सारा ओट
सौंदर्यप्रसाधन उद्योग संस्थापक
अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मूळच्या इराकी पालकांच्या पोटी जन्माला आलेल्या हुडा कत्तान या ओक्लाहोमा राज्यात वाढल्या. आपलं सौंदर्य उद्योगाविषयीचं प्रेम जपण्याकरता लौकिकार्थाने यशस्वी असं कॉर्पोरेट करिअर त्यांनी सोडलं.
लॉस एंजेलिसमधील एका नामवंत मेकअप प्रशिक्षण क्रेंदात नाव नोंदवून त्यांनी सुरुवात केली आणि ए-लिस्ट सेलेब्रिटी म्हणवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचं काम मिळवलं. मध्यपूर्वेतील राजघराण्यातील काही व्यक्तींचा समावेशही त्यांच्या क्लाएंट लिस्टमध्ये आहे.
त्यानंतर त्यांचं नाव सर्वाधिक लोकप्रिय ब्युटी ब्रँड म्हणून घेतलं जाऊ लागलं. इन्स्टाग्रामवर त्यांचे 5 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
कत्तान यांनी 2013 मध्ये हुडा ब्युटी नावाने आपला सौंदर्यप्रसाधनांचा ब्रँड निर्माण केला. सुरुवातीला कृत्रिम पापण्या – आयलॅशेसची निर्मिती त्यांनी केली. आज त्यांचा बिलिअन डॉलर बिझनेस असून त्यांची 140 पेक्षा अधिक उत्पादनं जगभरातील 1500 हून अधिक दुकानांममधून विकली जातात.
कण्टेण्ट क्रिएटर आणि यूट्यूबर
आपल्या अभ्यासातून वेळ काढत मॅकडॉनल्ड्समध्ये अर्ध वेळ काम करता करता वी (Varaidzo)कातिव्हू यांनी तरुणपणी ऑक्सफर्ड आणि हावर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण कसं पूर्ण केलं तो प्रवास जगभरातील सर्वसामान्य घरातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे.
विद्यापीठात शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एक YouTube चॅनेल सुरू केलं आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास भागातून आलेल्या विद्यार्थिनी म्हणून आपले अनुभव त्या व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करू लागल्या. त्यातून आपल्यासारख्याच अनेकांना आवश्यक टिप्स आणि माहिती त्या पुरवत होत्या.
त्यानंतर लवकरच त्यांनी एम्पॉवर्ड बाय वी नावाने एक मंच सुरू केला. जगभरातील गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळावी, पाठिंबा मिळावा आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू आहे.
कातिव्हू यांनी तरुण लोकांसाठी एक प्रॅक्टिकल सेल्फ हेल्प बुक लिहिलं आहे. त्या सध्या शैक्षणिक नेतृत्व या विषयात PhD करीत आहेत.
विद्यार्थिनी आणि सामाजिक उद्योजक
इराणमधील आपल्या नातेवाईकांशी बोलत असताना सामाजिक उद्योजिका सोफिया किआन्नी यांना जाणवलं की, हवामान बदलाविषयी त्यांच्या भाषेत फारच कमी प्रमाणात खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. मग त्यांनी याविषयातील माहितीचं फारसी भाषेत भाषांतर करायचं काम सुरू केलं.
हे काम लवकरच मोठ्या प्रकल्पात विस्तारलं आणि क्लायमेट कार्डिनल्स नावाचा एक आंतरराष्ट्रीय युवा मंच ना नफा तत्त्वावर स्थापन झाला. इंग्रजी कळत नाही अशा सर्वांपर्यंत त्यांच्या त्यांच्या भाषेतून हवामानविषयी माहिती पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे.
सध्या या प्रकल्पाशी 80 देशांतील 10,000 विद्यार्थी कार्यकर्ते जोडलेले आहेत. हवामानविषयी 10 लाख शब्दांचा मजकूर 100 हून अधिक भाषांमध्ये त्यांनी अनुवादित केला आहे.
शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारामध्ये भाषेचा अडसर ठरू नये या उद्देशाने या भिंती तोडण्याचा कियान्नी यांचा उद्देश आहे.
तरुण कार्यकर्त्यांनी जागतिक हवामान कृती गट तयार केले आणि ते वाढवले. या माध्यमातून पर्यावरणविरोधी गोष्टींचा निषेध करण्यासाठी लाखो लोक एकत्र केले, अनिर्बंध तेल उपशाविरोधात हजारो याचिका दाखल केल्या आणि हवामान उपक्रमांना निधी देण्यासाठी लाखो डॉलर्स उभे केले. आमचं वय किंवा अनुभवाचा विचार करता आमच्यापुढ्यातली जगाची आव्हानं खूपच मोठी आहेत.
सोफिया कियान्नी
फोटोग्राफर
मुक्त छायाचित्रकार, लेखिका आणि नॅशनल जिओग्राफिक एक्स्प्लोरर म्हणून संपूर्ण दक्षिण आशिया फिरून हवामान बदलामुळे बदलत चाललेले भूभाग टिपण्याचं काम आरती कुमार-राव करत आहेत.
भूजलात किती झपाट्याने घट होते आहे, नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहेत, उद्योगांसाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे जैववैविध्य नष्ट होत आहे आणि सार्वजनिक जमिनी संपत चालल्याने लाखो विस्थापित होत आहेत, अनेक प्रजाती कशा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याची नोंद आरती ठेवत आहेत.
दशकाहून अधिक काळ आदिती कुमार राव यांनी भारतीय उपखंड आडवा तिडवा पालथा घातला आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे उपजीविका आणि जैववैविध्यावर कसा परिणाम होत आहे हे त्यांच्या थेट भिडणाऱ्या रोखठोक स्टोरीजमधून समोर येतं.
Marginlands: India's Landscapes on the Brink या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी भारतातील अतिप्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्यांचे अनुभव मांडले आहेत.
हवामान संकटाच्या मुळाशी जमीन, पाणी आणि हवा यांच्याशी आपली तुटलेली नाळ हे कारण आहे. आपण हे नातं पुन्हा जोडणं अत्यावश्यक आहे.
आरती कुमार-राव
लेखिका
काल्पनिक कथा, कादंबऱ्या, नॉन फिक्शन, कविता असे अनेक साहित्यप्रकार हाताळणाऱ्या लेखिका ओकसाना झाबुझ्खो यांनी आतापर्यंत 20 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. युक्रेनच्या प्रमुख साहित्यक आणि विचारवंतांमध्ये त्यांचा समावेश होतो.
फील्ड वर्क इन युक्रेनियन सेक्स' आणि 'म्युझिअम ऑफ अॅबंडण्ड सिक्रेट्स' या त्यांच्या लेखनामुळे त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखलं जाऊ लागलं.
कीव इथल्या शेव्हचेंको युनिव्हर्सिटीमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी घेतली आहे आणि पुढे पीएचडीसुद्धा मिळवली आहे.
त्यांच्या पुस्तकांचा 20 हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांच्या पुस्तकांनी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये अँजिलस सेंट्रल युरोपीयन लिटररी प्राइझ, युक्रेनचा शेव्हचेंको राष्ट्रीय पुरस्कार आणि फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यांचा समावेश आहे.
मेंढपाळ
अफरोज नुमा या पाकिस्तानातील वाखी मेंढपाळ समाजातील शेवटच्या उरलेल्या काही महिला मेंढपाळांपैकी एक आहेत. गेली तीन दशकं त्या शेळ्या-मेंढ्या आणि याक पाळून देखभाल करीत आहेत.
आपल्या आई आणि आजीकडून त्यांना या व्यवसायाची शिकवण मिळाली. पाकिस्तानातील शिमशाल खोऱ्यात शेकडो वर्षांची परंपरा असलेला त्यांचा हा व्यवसाय आता लयात जाऊ लागला आहे.
दरवर्षी या मेंढपाळ स्त्रिया समुद्रसपाटीपासून 4800 मीटर उंचीवरच्या पर्वतीय गवताळ प्रदेशात त्यांच्या जनावरांना चरायला घेऊन जातात. तिथे त्या दूध-दुभत्याच्या मोबदल्यात आपल्यापुरता शिधा आणि आवश्यक गरजा भागवतात.
त्यांच्या या उत्पन्नातूनच त्यांच्या गावांमध्ये समृद्धी आली आहे आणि त्यामुळेच त्यांची मुलं आता शिक्षणही घेऊ शकत आहेत. अफरोज नुमा आजही जुन्या आठवणीत रमतात. त्यांच्या गावात स्वतःसाठी शूज घेऊन येणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या.
बौद्ध भिक्षुणी
जेत्सुन्मा तेन्झीन पाल्मो यांचा जन्म 1940 च्या दशकात इंग्लंडमध्ये झाला. किशोरवयातच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
विसाव्या वर्षी त्या भारतात आल्या आणि तिबेटीयन बौद्ध भिक्खूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या पाश्चिमात्य ठरल्या.
महिला बौद्ध अनुयायांचे म्हणजे भिक्षुणींची परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी भारतात हिमाचल प्रदेशात डोंग्यू गात्साल लिंग ननरी सुरू केली. इथे आता 120 पेक्षा अधिक नन किंवा भिक्षुणी राहतात.
सलग 12 वर्षं हिमालयातील एका दुर्गम गुहेत राहून ध्यानधारणा केल्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. यातली तीन वर्षं तर उग्र ध्यानावस्थेत त्यांनी घालवली. 2008 मध्ये त्यांना दुर्लभ असलेलं जेत्सुन्मा पद किंवा दुर्मीळ उपाधी मिळाली. जेत्सुन्माचा अर्थ परम आदरणीय गुरू.
कलाकार
मुखपृष्ठावर नसलेल्या स्त्रिया (Women Who Were Not On a Cover) हा लाला पास्क्विनेली यांनी 2015 ला सुरू केलेला उपक्रम. सौंदर्याबद्दलचे ढोबळ ठोकताळे आणि माध्यमांमधून आणि लोकप्रिय संस्कृतीत स्त्रियांचं त्याच दृष्टीने मांडलेलं प्रदर्शन याविरोधात प्रश्न विचारायला त्या या मंचाचा वापर करतात.
वाढतं वय, डाएटिंग याबद्दलच्या गैरसमजुतीच्या आहारी न जाता आपल्या शरीरिक सौंदर्याच्या व्याख्या तपासून पाहा असं स्त्रियांना आवाहन करणाऱ्या व्हायरल कँपनेनंतर त्यांच्या उपक्रमाला सुरुवात झाली. नुकत्याच सुरू झालेल्या #HermanaSoltaLaPanza (अर्थ - बहिणींनो, तुमच्या पोटाचं शोषण बंद करा)या मोहिमेतून त्यांनी सगळ्या देहयष्टीच्या आणि आकारांच्या व्यक्तींच्या खऱ्या गोष्टी सांगितल्या.
वकील, कवयित्री, समलिंगी आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या असलेल्या लाला पास्क्विनेली या स्त्रीसौंदर्याच्या साचेबद्ध कल्पना तोडण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या मते, या कल्पना 'वर्गवादी, वर्णवादी आणि लिंगवादी' मानसिकतेतून तयार झाल्या आहेत आणि त्यातून लैंगिक विषमता वाढीस लागते.
पत्रकार
वयाची विशी सरताना कॅरोलिना डियाझ पिमेंटेल यांना ऑटिझम असल्याचं (आत्मकेंद्रीपणा)निदान झालं. किमान आपण विशेष (न्यूरोडायव्हर्जंट) असल्याचं तथ्य तरी समजलं याच्या आनंदात त्यांनी त्या वेळी चक्क स्वतःसाठी केक बनवला.
आता वयाच्या तिशीत असलेल्या कॅरोलिना पत्रकार म्हणून काम करतात आणि विशेष मुलं किंवा न्यूरोडायव्हर्जंन्स आणि मानसिक आरोग्य हे विषय कव्हर करतात. स्वतःला त्या आता 'प्राउडली ऑटिस्टिक' म्हणवून घेतात.
मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना बरेचदा लांछनास्पद वागणूक दिली जाते. तो कलंक पुसून टाकाण्याचं काम त्या करतात. न्यूरोडायव्हर्सिटीबद्दल जागरुकता आणणाऱ्या Mas Que Bipolar (बायपोलरपेक्षा अधिक), पेरुविअन न्यूरोडायव्हर्जंट कोअॅलिशन आणि प्रोजेक्ट अटिपिकल अशा काही संस्था आणि अनेक प्रकल्पांच्या त्या संस्थापक आहेत.
पुलित्झर सेंटर ग्रँट आणि रोझालिन सेंटर स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे.
क्लायमेट कॅफेचे संस्थापक
हवामान बदलाविषयी संवाद साधायला, प्रत्यक्ष कृती करायला आणि एकत्र बसून खात-पीत चर्चा करण्याची सार्वजनिक जागा म्हणजे क्लायमेट कॅफे. जेस पेपर यांनी 2015 मध्ये स्कॉटलंडच्या एका छोट्या शहरात पहिलं क्लायमेट कॅफे उघडलं.
आता आपापल्या प्रांतात हवामानविषयी चर्चा करण्यासाठी अशा जागा निर्माण करणाऱ्यांना त्या मदत करतात. या सगळ्यांना एकत्र जोडत त्यांनी एक जागतिक नेटवर्क निर्माण केलं आहे.
हवामान बदलाच्या संकटाविषयी आपली भीती, काळजी बिनदिक्कत व्यक्त करू शकू अशा या सुरक्षित जागा असल्याचं उपस्थित सांगतात.
हवामान क्षेत्रात पेपर यांनी अनेक ठिकाणी नेतृत्त्व निभावलं आहे. त्या रॉयल स्कॉटिश जिओग्राफिक सोसायटीच्या मानत सदस्य आहेत आणि रॉयल सोसायटी ऑफ आर्टसच्यादेखील फेलो आहेत.
ज्या समाजात स्त्रिया आणि मुलं नेतृत्व करतात तिथे हमखास हवामानविषयक कृती आणि सकारात्मक बदल झालेले दिसतात. एकमेकांशी जोडले गेल्याने माहिती मिळते, त्यातून प्रेरणा मिळते आणि बदल घडतो, नव्या संधी निर्माण करताना लवचिकता येते आणि पुढच्या बदलांसाठी राजकीय अवकाशही लाभतं हे पाहून मला आशा वाटते.
जेस पेपर
मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर
इन्स्टाग्रामवर 2 लाख35 हजारांवर फॉलोअर्स असलेल्या 93 वर्षांच्या किती व्यक्ती जगात असतील? पण इटलीच्या या आजी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून शरीराकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवतात आणि म्हणतात, ही तर फक्त सुरुवात आहे.
लीशिया फर्टझ यांनी दुसरं महायुद्ध पाहिलं आहे. त्यांच्या 28 वर्षांच्या मुलीचा मृत्यू पचवला आहे आणि नंतर पतीच्या निधनाचं दुःखही सोसलं आहे.
पण त्यांचा नातवाने त्यांना थोडं बरं वाटावं म्हणून त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट उघडून दिलं. लीशिया यांचे रंगीबेरंगी कपडे, दिलखुलास हास्य, मोहक अदा यामुळे त्या अल्पावधीतच इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झाल्या. स्टार झाल्या.
त्यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी रोलिंग स्टोन मॅगझिनसाठी त्यांनी नग्न फोटोशूट केलं होतं.
स्त्रीवादी आणि LGBTQ+ चळवळीतील त्या कार्यकर्त्या आहेत, तशा वाढत्या वयातील नागरिकांच्या हक्कांविषयी बोलणाऱ्या एजीझम किंवा वार्धक्यवादी कार्यकर्त्यादेखील आहेत. वार्धक्यात तुमच्या शरीराकडे सकारात्मकतेनेच पाहिलं पाहिजे, वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा यासाठी त्या प्रयत्न करतात.
जळितग्रस्त
जन्नतुल फिरदौस एका दुर्घटनेत 60 टक्के भाजल्या होत्या. पण त्या जखमांतून बाहेर पडून त्या फिल्ममेकर, लेखिका आणि अपंदहक्क कार्यकर्ती झाल्या.
व्हॉइस अँड व्ह्यूज या मानवाधिकार संस्थेच्या त्या संस्थापिका असून जळितग्रस्त महिलांच्या हक्कांसाठी त्या लढतात.
आपल्या मित्रमंडळींमध्ये आयव्ही नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिरदौस यांनी पाच लघुपट केलेत आणि तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आपल्या गोष्ट सांगण्याचय्या कौशल्याचा वापर करून त्या अपंग लोकांच्या जगण्याबद्दल इतरांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
फिरदौस यांची चांगलं शिक्षणही घेतलं आहे. इंग्रजी साहित्यात MA केल्यानंतर त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीज विषयाचीही पदवी घेतली.
स्थानिक आणि LGBTQ+ अधिकार कार्यकर्ती
म्यानमारच्या सीमेलगत असणाऱ्या थायलंडच्या शहरात राहणाऱ्या मॅता फोर्न-इन यांना हवामान बदलाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. शिवाय या भागातील अशांततेचाही फटका बसला आहे. या भागातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी त्या काम करतात.
त्यांनी संगसान अनाकोट यावचोन विकास प्रकल्प सुरू केला असून त्याद्वारे हजारो बेघर, निर्वासित, भूमिहीन स्त्रियांना, मुलींना आणि LGBTQ कम्युनिटीतले तरुणांना शिक्षण देऊन सबलीकरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
अल्पसंख्य समाजातील स्थानिक समलिंगी स्त्रीवादी म्हणून मॅचा फोर्न-इन यांनी लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आणि त्यासाठीच्या चळवळीचं नेतृत्व केलं. याबरोबर निर्वासित आणि हक्क नाकारलेल्या लोकांना त्यांच्या हक्काची भूमी आणि पर्यावरण मिळवून देण्यासाठी त्या लढा देत आहेत.
हवामान संकटावर कायमचा उपाय निघू शकत नाही जोपर्यंत आपण स्थानिक समाज, LGBTQIA+ , महिला आणि मुलींचा या प्रक्रियेतला अर्थपूर्ण सहभाग मिळवत नाही.
मॅचा फोर्न-इन
कलाकार
चित्रकला, रेखाचित्रे, इन्स्टॉलेशन्स, प्रिंटमेकिंग आणि चित्रपट असे वेगवेगळे कलाप्रकार हाताळणाऱ्या कलाकार चिला कुमारी बर्म या त्यांच्या कलेतून सांस्कृतिक ओळख आणि लैंगिक ओळख आणि प्रतिनिधित्वाविषयी चर्चा करतात.
1879 पासून ब्रिटनमध्ये सुरू असलेला दिव्यांचा उत्सव - ब्लॅकपूल इल्युमिनेशन्समध्ये यंदाच्या वर्षी चिला कुमारी यांचं प्रदर्शन लागलं. Lollies in Love With Light हे एक तिरंगी इन्स्टॉलेशन त्यांनी मांडलं आहे. त्याच्या मध्यावर एक आइसक्रीम व्हॅन दिसते. त्यांच्या पालकांचा आइसक्रीम विक्रीचा व्यवसाय होता. त्यावरून प्रेरणा घेऊन ते साकारलं आहे.
2020 मध्ये बर्मन यांनी रिमेंबरिंग ब्रेव्ह न्यू वर्ल्ड नावाचं इन्स्टॉलेशन साकारलं. त्यामध्ये प्रसिद्ध टेट ब्रिटनचा फसाद किंवा दर्शनी भागाचं दर्शन भारतीय पुराण, पॉप्युलर कल्चर आणि महिला सबलीकरणाच्या संदर्भातून त्यांनी घडवलं.
गेल्या वर्षी त्यांना MBE अर्थात 'ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर'ने गौरवण्यात आलं.
मासेविक्रेती
घानामधील फुवेमे या समुद्रकिनारी गावाची रहिवासी असलेली एसी बुओबासा ही हवामान बदलाचा थेट जीवघेणा परिणाम सोसलेली स्त्री आहे. फुवेमे हे गाव वाढत्या समुद्रपातळीमुळे जवळपास बुडायला लागलं.
आपला नवरा आणि पाच मुलांसह एसी बुओबासा यांना आपलं घर, गाव सोडून जावं लागलं कारण पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचं गावच समुद्राने गिळलं.
बुओबासा या त्यांच्या गावातील प्रमुख मासेविक्रेत्या. किनारी भागाची धूप होऊ लागल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसायच अडचणीत आला. मग त्यांनी आसपासच्या भागातील मच्छीविक्रेत्या महिलांना एकत्र करत एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने एक संघटना स्थापन केली.
त्यांच्या संघटनेत आता 100 सदस्य आहेत. त्या महिला आठवड्यातून एकदा भेटतात आणि आपल्या व्यवसायाच्या अडचणींसंदर्भात चर्चा करून गरजू कुटुंबांना आर्थिक मदत गोळा करून देतात.
स्त्री म्हणून आपलं धरणीमातेशी असलेलं नातं ओळखू अशी आशा आहे. आम्ही काटक आहोत, कणखर आहोत, सांभाळ करण्यासाठीच बनल्या आहोत; आम्ही काम करतो आणि आम्ही काळजीही घेतो.
एसी बुओबासा
अपंगहक्क कार्यकर्ती
मारियेता मोयासेविक या हायस्कूलमध्ये असतानाच त्यांना दोनवेळा अर्धांगवायूचे झटके आले आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं.
या आजारपणाचे शारीरिक आणि मानसिकही दूरगामी परिणाम झाले. ते अद्यापही त्या भोगत आहेत. पण त्यातून त्या अपंगहक्क कार्यकर्ती म्हणून काम करत आहेत. त्या युवा सल्लागारही आहेत.
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दलच्या असलेल्या समजुती आणि त्यांना दिली जाणारी वागणूक याविरोधात त्या आवाज उठवतात.
लाइफ अँड डिसेबिलिटी नावाने एक कार्यशाळा त्या घेतात. त्यात स्वतःला आलेले अनुभव सांगत त्या अपंगविषयी असलेले पूर्वग्रह खोडून काढतात.
OneNeurology नावाच्या उपक्रमाच्या त्या अँबेडसेडर आहेत. न्यूरॉलॉलिकल आजार हे जागतिक सार्वजनिक आरोग्यसेवेत प्राधान्यक्रमावर असावेत असा या उपक्रमाचा हेतू आहे.
ट्रकचालक
आपल्या आयुष्यातली 17 वर्षं क्लॅरा एलिझाबेथ फ्रॅगोसो युगार्ते या महिलेने केवळ पुरुषी वर्चस्व असलेल्या ट्रकचालकाचा व्यवसाय करण्यात घालवली आहेत. ट्रक चालक म्हणून प्रचंड धोकादायक असलेल्या काही रस्त्यांवरूनही प्रवास करत मेक्सिको हा देश त्यांनी उभा-आडवा पालथा घातला आहे.
मूळच्या दुरान्गो शहरातल्या फ्रॅगोसो युगार्ते यांचं वयाच्या 17 व्या वर्षीच लग्न झालं आणि लवकरच त्या 4 मुलांच्या माता झाल्या. त्यांना आता 7 नातवंडंदेखील आहेत.
महिला ट्रक चालकाला तिथे 'ट्रेलेरा' असं म्हटलं जातं. ट्रेलेरा म्हणून आजही त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ मेक्सिको आणि अमेरिकेतल्या रस्त्यांवर जातो.
त्या तरुण चालकांना मार्गदर्शनही करतात. इतर स्त्रियांनीदेखील या अवजड वाहन उद्योगात उतरावं असा आग्रह त्या धरतात. इथलं पुरुषी वर्चस्व मोडून लैंगिक समानता साधावी यासाठी इतर महिलांनी आपल्याकडून प्रेरणा घ्यावी असं त्यांनावाटतं.
स्थानिकांचे हक्क आणि विकलांगांच्या न्यायासाठी कार्य
काइ ताहू समाजाच्या पर्यावरण तज्ज्ञ केरा शेरवूड-ओ रेगन स्वतः विकलांग आहेत. त्या न्यूझीलंडच्या दक्षिणेच्या 'ते वैपोउनामू' नावाच्या बेटावरल्या रहिवासी.
पर्यावरणीय न्याय आणि सामाजिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या अॅक्टिव्हेट नावाच्या सामाजिक संस्थेच्या त्या सहसंस्थापक.
मुख्य प्रवाहातील हवामान संवर्धनातून दुर्लक्षित राहिलेला पूर्वजांच्या जमिनीबाबतचा माओरी दृष्टिकोन बाळगून त्या काम करतात.
शेरवूड-ओरेगान यांनी त्यांच्या समाजावर होत असलेले हवामान बदलाचे दूरगामी परिणाम स्थानिक मंत्री, अधिकारी आणि नागरी समाजाला दाखवून दिले. स्थानिक लोकांच्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि अपंग लोकांचाही हवामान बदलासंदर्भातल्या चर्चांमध्ये सहभाग असावा यासाठी त्या प्रयत्न करतात.
आम्ही अर्कवादी मानसिकता नाकारतो. आ म्हाला आमचं अवकाश हवं. आमच्या समाजाला धरून जगलं तरच ते पर्यावरणाशी सुसंगत ठरेल. मला वाटतं, आता लोकांना स्थानिक समाजाच्या एकसंधपणातच हवामान संकटाचा उपाय असल्याचं लक्षात आलं आहे.
केरा शेरवूड-ओ रेगन
प्रशिक्षक आणि हवामान सल्लागार
हवामानविषयक शिक्षण शाळेत बंधनकारक असावं यासाठी किशोरवयीन सागरिका श्रीराम लढा देत आहे.
तिच्या कोडिंगच्या ज्ञानाचा वापर करत तिने Kids4abetterworld नावाचा ऑनलाइन मंच निर्माण केला. आपापल्या भागातील शाश्वत प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी आणि जगभरातील मुलांना शिक्षण देण्यासाठी हा मंच डिझाइन करण्यात आला.
या मंचाला बळ म्हणून ती ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपाच्या पर्यावरणीय कार्यशाळा घेते. त्यातून मुलांना ते हवामान बदलाचा परिणाम कसा सकारात्मक करू शकतात याविषयी शिकवते.
दुबईत स्वतःच्या ए लेव्हल शाळेच्या अभ्यासाबरोबरच सागरिका राष्ट्रसंघाच्या बालहक्क समितीच्या बाल सल्लागार मंडळाची सदस्य म्हणूनही काम करते. पर्यावरणीय अधिकाराचा ती तेथूनही पुरस्कार करते.
ही वेळ धोक्याची घंटा नाही तर कृती करण्याची आहे, म्हणून प्रत्येक मुलाला शाश्वत जगण्यासाठी आणि आपल्या जगण्यात पद्धतशीरपणे बदल करण्यास चालना देण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. तरह हे जग आपल्याला हवे तसे सुंदर होईल.
सागरिका श्रीराम
शेतकरी आणि उद्योजक
2016 मध्ये नॉक-टेन टायफूनने कॅमरिन्स सूर, फिलिपिन्स इथे थैमान घातलं. या चक्रीवादळाने तिथली 80 टक्के शेतजमीन गिळली.
लुइस माबुलो यांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी Cacao Project सुरू केलं. शाश्वत कृषीवनीकरणाद्वारे स्थानिक अन्नसाखळीत क्रांती आणण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
माबुलो यांनी शेतकऱ्यांना बळ देत पारंपरिक विनाशकारी अन्न प्रणाली मोडीत काढली. त्याऐवजी ग्रामीण भागातून हरित अर्थक्रांती उदयाला आणली ज्यामध्ये अन्न पिकवणाऱ्या हातांकडेच प्रणालीची सगळी सूत्रं आली.
आंतरराष्ट्रीय हवामान धोरणाच्या त्या सल्लागार आहेत, जिथे ग्रामीण भागातील अनुभव आणि ज्ञान यांचा त्या पुरस्कार करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमात 'यंग चँपियन ऑफ द अर्थ' म्हणून त्यांच सन्मान करण्यात आला होता.
माझ्यासारख्या लोकांकडून जगभरातल्या चळवळी आकार घेत आहेत हे पाहून आशा पल्लवित होते. हिरव्या निसर्गातलं भविष्य सुकर वाटतं, ज्यातून समाज एकत्रित बांधला जाईल, जिथे आपलं अन्न शाश्वतपणे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल, जिथे आपल्या अर्थव्यवस्थेची चक्र फिरती राहतील आणि ती समन्यायी तत्त्वांवर आधारलेली असतील.
लुइस माबुलो
लेखिका
Ballad of Love in the Wind या 90 च्या दशकात लिहिलेल्या कादंबरीने पॉलिना शिझाआन या मोझाम्बिकमध्ये कादंबरी प्रकाशित करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
मोझाम्बिकची राजधानी मापुटो शहराच्या बाहेर वाढलेल्या पॉलिना यांनी एका कॅथलिक शाळेत पोर्तुगीज भाषा शिकली. एज्युआर्डो मोंडलेन युनिव्हर्सिटीत त्यांनी भाषा विषय शिकले पण त्या ग्रॅज्युएट झाल्या नाहीत.
त्यांचं लिखाण इंग्रजी, जर्मन, स्पॅनिशसहीत अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. 'द फर्स्ट वाइफ: अ टेल ऑफ पॉलिगमी' या त्यांच्या पुस्तकाला स्थानिक प्रतिष्ठेचा जोस क्रॅव्हेरिअन्हा पुरस्कार मिळाला.
पोर्तुगीज लिखाणासाठी दिला जाणारा आणि सर्वांत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कॅमोइस पुरस्कारही त्यांना नुकताच मिळाला.
फॉर द लाइफ सुविंग शॉप'च्या सहसंस्थापक
चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं कळल्यावर त्यावरचे तीव्र उपचार झेलून शैरबू सग्यंबाइवा आता बऱ्या होत आहेत. औषधोपचारांचा खर्च जुळवतानाही त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
आपल्यासारख्याच इतर चार बऱ्या होणाऱ्या कॅन्सर पेशंटना घेऊन त्यांनी 'फॉर द लाइफ सुविंग शॉप' उपक्रम सुरू केला. राष्ट्रीय प्रतिकं, दागिने वापरून त्या पिशव्या तयार करतात आणि विकतात. त्यातून मिळणारा नफा कॅन्सरग्रस्तांच्या उपचारांसाठी दान केला जातो.
आतापर्यंत त्यांनी 33000 डॉलर एवढा निधी उभा केला आहे. त्यातून 34 गरजू स्त्रियांच्या उपचारांचा खर्च भागायला मदत होईल.
रुग्णालयापासून दूर गावी राहणाऱ्यांना उपचारादरम्यान राहण्याची सोय करणं अधिक दुरापास्त असतं, हे जाणवून शैरबू सग्यंबाइवा यांनी रुग्णालयाजवळ ना नफा तत्त्वावर त्यांच्यासाठी हॉस्टेल उभारणीलाही मदत केली.
कवयित्री
दारिया सेरेन्को या लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या असून 'फेमिनिस्ट अँटी वॉर रेझिस्टन्स' ही रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा विरोध करणारी चळवळ उभारणाऱ्या संयोजकांपैकी एक आहेत.
रशियातील लैंगिक हिंसाचाराविषयी त्या गेली 9 वर्षं लिहित आहेत. स्त्रीवादी आणि युद्धविरोी विचारांना वाहिलेली दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
सेरेन्को यांनी क्वाएट पिकेट आर्ट इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे. वेगवेगळे संदेश लिहिलेल्या पाट्या अंगावर घालून त्या विषयी बोलायला व्यक्त व्हायला त्या लोकांना उद्युक्त करतात.
रशियाने युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने केलेल्या हल्ल्यापूर्वी दोन आठवडे सेरेन्को यांना तिथल्या प्रशासनाने स्थानबद्ध केलं. अतिरेकी संदेश पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या जॉर्जियाला स्थलांतरित झाल्या आणि नंतर लगेच रशियन प्रशासनाने त्यांना 'फॉरेन एजंट' म्हणून जाहीर केलं
फ्रीडायव्हिंग इन्ट्रक्टर
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कृष्णवर्णीय फ्रीडायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणाऱ्या झांदिल एंधलोवु यांना महासागरात बुडी मारणाऱ्यांमध्येही वैविध्य असावं असं वाटतं.
त्यांनी ब्लॅक मर्मेड फाउंडेशन स्थापन केलं ज्यामधून त्या स्थानिक समाज आणि तरुण लोकांना समुद्राची ओळख करून देतात. या वंचित व्यक्तीदेखील महासागराचा वापर मनोरंजनासाठी, व्यवसायासाठी आणि क्रीडाप्रकार म्हणून करू शकतील या आशेने त्यांनी हे काम सुरू केलं.
एंधलोवु या खोल समुद्रतळाचा शोध घेणाऱ्या कुशल दर्यावर्दी आहेत, स्टोरीटेलर आहेत आणि चित्रपटकर्त्याही. सागर रक्षकांची एक नवी पिढी तयार व्हावी या दृष्टीने त्यांच्यातील या कलांचा वापर करतात. समुद्रातलं प्रदूषण, वाढती समुद्रपातळी हे समजून घेऊन पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम त्या करतात.
पर्यावरणीय धोक्याचा विचार करताना समाजात बदल घडवून आणण्यासाठी पुढे सरसावणारी तरुणाई मला आशा दाखवते.
झांदिल एंधलोवु
पटकथाकार
हार्टस्टॉपर नावाचं सज्ञान तरुणांसाठीचं बेस्टसेलिंग ग्राफिक नॉव्हेलमागची कर्तीकरविती आहे पुरस्कारप्राप्त लेखिका, चित्रकार आणि पटकथाककार अॅलिस ओसेमान. LGBTQ+ च्या वयात येण्याची आणि स्वतःबद्दलच्या जाणीवेची कथा त्यांनी नेटफ्लिक्ससाठीच्या सीरिजमध्ये रुपांतरित केली. या मालिकेला एमी अवॉर्ड मिळाला.
ओसेमान यांनी या मालिकेतील प्रत्येक भाग लिहिला. तसंच मालिकेच्या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात अगदी संगीतापासून मेकअपपर्यंत त्यांचा हात होता.
वयात येणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी अनेक कांदबऱ्या लिहिल्या आहेत. रेडिओ सायलेन्स, लव्हलेस आणि सोलिएटर या त्यापैकी गाजलेल्या काही. यातली शेवटची कादंबरी तर त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी लिहिली होती.
त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार आणि मानांकनं मिळाली. YA बुक प्राइझ, इंकी अवॉर्ड्स, कार्नेजी मेडल आणि गुडरीड्स चॉइज अवॉर्ड ही त्यापैकी काही नावं.
क्रिकेटपटू
विस्टेन्स फाइव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर या यादीत यंदा पहिली भारतीय महिला नोंदली गेली. तिचं नाव - हरमनप्रीत कौर.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असणाऱ्या हरमनप्रीतने देशात आणि देशाबाहेरच्या स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तिच्या संघाने भारताला रजत पदकापर्यंत पोहोचवलं.
मार्चमध्ये झालेल्या पहिल्या महिला क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये ती मुंबई इंडिया संघाकडून खेळते. तिच्या नेतृत्वाखाली या संघाने ही लीग जिंकली.
2017 मध्ये तिच्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ओलांडला. महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हरमनप्रीतने 115 चेंडूंत 171 धावा ठोकल्या. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली.
क्युरेटर आणि सांस्कतिक व्यवस्थापक
साओ पावलोच्या गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना कॉमिक बुक संवादाचा कार्यक्रम अनुभवायला करता यावेत या उद्देशाने आंद्रेझा देलगाडो यांनी पेरिफाकॉन उपक्रम सुरू करायला मदत केली.
झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रमिकांचा विचार क्रिएटर किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रेक्षक म्हणून नेहमी दुर्लक्षित राहतो अशांसाठी कॉमिक्स किंवा विनोदी लेखक, कलाकार आणि ब्राझीलच्या गरीब वस्त्यांमधल्या इतरांच्या मदतीने त्यांनी मोफत कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली.
2023 मध्ये अशी तिसरी पेरीफाकॉन 15000 लोकांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये कॉमिक्स, व्हिडीओ गेम्स, मैफली, कॉन्सर्ट्स आणि इतर गीक कल्चरमधल्या लोकप्रिय व्यक्तिरेखा यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या.
ब्राझीलमधील संस्कृतीचं सार्वत्रिकीकरण व्हावं यासाठी त्यांनी यूट्यूबर आणि पॉडकास्टर म्हणून भूमिका घेतली. विशेषतः कृष्णवर्णीय कलाकारांच्या कामाची दखल घेण्याबाबत त्या आग्रही असतात.
स्पीड क्लायंबर (वेगवान आरोहण)
बाली येथे प्राथमिक शाळेत असतानाच कुसुमा देवीला भिंत चढण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला मिळाला आणि ती या वेगवान आरोहणाच्या प्रेमातच पडली.
क्वीन ऑफ इंडोनेशियन रॉक क्लायंबिंग अशी ओळख मिळवलेल्या देवीने अनेक स्पर्धांमधून यशाची चव चाखली. पण यंदाच्या वर्षी महिलांच्या वेगवान स्पर्धेत तिने कमाल केली. IFSC Climbing World Championships 2023 मध्ये तिने 6.49 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक कमावलं.
या यशामुळे पॅरिस ऑलिंपिक 2024 ची कवाडं तिच्यासाठी खुली झाली आहेत. या ऑलिम्पिकमध्ये क्लायंबिंग हा खेळ पहिल्यांदाच स्वतंत्रपणे खेळवला जाणार आहे.
इंडोनेशियाची ही तरुण प्रस्तरारोहक ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवू शकते. या देशाला आतापर्यंत केवळ बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि तिरंदाजी याच क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवता आलं आहे.
डीजे आणि संगीतकार
गेल्या वर्षी इराणमध्ये झालेल्या आंदोलनाच्या बराच काळ आधीपासूनच डीजे परमिदा इराणी वंशाच्या स्त्रियांवर लादल्या गेलेल्या सांस्कृतिक बंधनांविरोधात आवाज उठवत आहेत.
किशोरवयीन वयात फँकफर्ट आणि तेहरान शहरांमध्ये वास्तव्य असतानाच परमिदा यांना संगीत आणि नृत्याविषयी आपल्याला असलेल्या कमालीच्या ओढीची प्रचिती आली. सध्या त्या बर्लिनमध्ये राहतात.
वैशिष्ट्यपूर्ण नृत्य-संगीत इतिहासातहासातून प्रेरित त्यांची रेकॉर्ड 'लव्ह ऑन द रॉक्स' आनंददायी, उत्साहवर्धक अशा आजच्या नृत्यसंस्कृतीला प्रोत्साहन देते.
बर्लिनच्या बेर्घेन्स पॅनोरमा बारची रहिवासी असलेल्या परमिदा या आता जगभरातील नावाजलेल्या डीजे आणि नामवंत म्युझिक प्रोड्युसर म्हणून ओळखल्या जातात. या सांगितिक माध्यमातून त्या पुरुषप्रधान संगीत आणि नाइट लाइफच्या क्षेत्रातील लैंगिक विषमतेला कायम आव्हान देत आल्या आहेत.
ऑलिम्पिकपटू
हेप्टाथलॉन या क्रीडाप्रकारात कॅमिला पिरेल्ली तरबेज आहे. पण 100 मीटर अडथळ्यांची शर्यत तिला टोकयो ऑलिम्पिकपर्यंत घेऊन गेली.
कॅमिला ग्वारानी पँथर या टोपण नावाने ओळखली जाते. धावण्याचे अनेक राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहेत. ती फील्ड अॅथलीटही आहे. सध्या क्रीडा प्रशिक्षक आणि इंग्रजी शिक्षिका म्हणून ती काम करते.
पराग्वेमधील छोट्या शहरात पिरेल्ली वाढली. तिच्या कुटुंबीयांना पर्यावरणाच्या प्रश्नाची जाण होती. कारण त्यांच्यापर्यंत हवामान बदलाच्या झळा पोहोचल्या होत्या.
पिरेल्ली इको अॅथलीट चँपियन आहे. याचा अर्थ तिच्या क्रीडाक्षेत्रातील नावलौकिकाचा उपयोग ती पर्यावरणाविषयी जाणीव जागृतीसाठी करते. हवामान संकटाविषयी लोकांशी संवाद साधून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कृती करण्यास ती प्रेरणा देते.
मी अशा गावात वाढले जिथे वन्यप्राण्यांचं दर्शन नित्याचं असे. आता या प्राण्यांना असलेल्या धोक्याबद्दल जाणून आणि त्यांना होणाऱ्या त्रासाविषयी समजल्यानंतर मी अस्वस्थ होते. त्यांच्यासाठी काही करण्यास मी उद्युक्त होते.
कॅमिला पिरेल्ली
अभिनेत्री
मनोरंजनाच्या जगात सहज ओळखू येणारा चेहरा, पुरस्कारप्राप्त अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अमेरिका फरेरा यांनी अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. त्यामध्ये नुकतीच प्रदर्शित झालेली विक्रमी यश मिळालेली फिल्म बार्बी, रिअल वुमेन हॅव कर्व्हज आणि अग्ली बेट्टी ही सीरिज यांचा समावेश होतो.
अग्ली बेट्टीसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला. मुख्य भूमिकेतील नायिकेसाठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वांत तरुण अभिनेत्री ठरल्या आहेत. फरेरा या खूप आधापासून चळवळीत आहेत. महिला हक्कांबद्दल थेट रोखठोक बोलणाऱ्या वक्त्या आहेत आणि स्क्रीनवर त्यांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं असंही त्यांचं मत त्या थेटपणे नोंदवतात.
होंडुरासहून स्थलांतरित झालेल्या पालकांची मुलगी म्हणून त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या लॅटिनाजचं जीवन सुधारालं यासाठीदेखील चळवळ उभारली. त्यासाठी त्यांनी 'पोदेरिस्तास' नावाची संस्था त्यांनी सुरू केली.
फूटबॉलपटू
स्पेनच्या कॅटालोनिया प्रांतात जन्मलेल्या ऐताना बोनमाटी फूटबॉलपटू असून मिडफिल्डर म्हणून खेळत तिने बार्सिलोना क्लबकडून खेळताना यंदाच्या स्पॅनिश लीग आणि चँपियन्स लीगमध्ये यश मिळवलं.
पण ती खरी जागतिक सुपरस्टार झाली वर्ल्ड कपच्या वेळी. स्पेनच्या विजयात तिचा मोलाचा वाटा होता. तीन गोल्स मारत तिने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब जिंकला. 25 व्या वर्षी तिने बॅलन डोरचा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवला आणि Uefa player of the year म्हणूनही तिला मानाचा मुकुट मिळाला.
महिलांना फूटबॉलमध्ये खेळाडू म्हणून समानता मिळावी यासाठी बोनमाटी निर्भिडपणे बोलते. मैदानात आणि मैदानाबाहेरही ती ठामपणे आपल्या मतांसाठी उभी असते.
तिच्या देशासाठी जिंकलेला वर्ल्डकपचा विजय स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी जेनी हर्मोसो या खेळाडूचं चुंबन घेतल्याच्या वृत्तामुळे झाकोळला. पण युएफा सन्मान स्वीकारतानाच्या भाषणात बोनमाटीने या घटनेचा उल्लेख करत तिच्या सहयोगी खेळाडूला आणि अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागलेल्या तमाम महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शवला.
मूकभाषा (साइन लँग्वेज) कलाकार
Super Bowl LVII हा जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा क्रीडा कार्यक्रम गेल्या फेब्रुवारीत झाला. तो गाजला साइन लँग्वेज कलाकार जस्टिन माइल्स यांच्या अदाकारीने. त्यांनी तिथे इतिहास घडवला.
जस्टिन माइल्स यांना स्वतःला ऐकू येत नाही. पण प्रसिद्ध पॉप गायिका रिहानाच्या गाण्याचे शब्द त्यांनी ज्या उर्जेने हावभाव आणि सांकेतिक भाषेतून सादर केले त्याला तोड नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल झाला.
सुपर बोल्स हाफ टाइम शो हा अमेरिकेत प्रतिष्ठेचा मानला जातो. तिथे अमेरिकन साइन लँग्वेज (ASL) सादर करणाऱ्या जस्टिन या पहिल्या कर्णबधीर स्त्री ठरल्या. ब्लॅक नॅशनल अँथेम म्हणून प्रचलित असलेलं लिफ्ट एव्हरी व्हॉइस अँड सिंग हे गाणं त्यांनी या कार्यक्रमात पहिल्यांदाच सादर केलं.
माइल्स यांना कर्णबधीर लोकांचं खरखुरं प्रतिनिधित्व जगापुढे आणायचं आहे. अधिकाधिक कर्णबधीर नर्सेसना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू कऱण्याचा त्या विचार करत आहेत.
अभिनेत्री
अभिनेत्री दिया मिर्झा यांनी भारतीय चित्रपटांतील अभिनयाबद्दल पुरस्कार मिळवले आहेचतच, पण त्याखेरीज त्या अनेक पर्यावरणविषयक आणि मानवतावादी उपक्रमांमध्ये सहभागी आहेत.
संयुक्तराष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयककार्यक्रमाची (UN Environmental Programme) सदिच्छा दूत म्हणून मिर्झा यांनी हवामान बदल, स्वच्छ हवा आणि वन्यजीव संरक्षणाविषयी जनजागृतीचं काम केलं आहे.
परिणामकारक कथा सांगणाऱ्या 'वन इंडिया स्टोरीज' या प्रॉडक्शन हाउसच्या त्या निर्मात्या आहेत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर 'ज्या गोष्टी तुम्हाला क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतात' अशा विषयांवर त्यांची निर्मितीसंस्था काम करते.
सेव्ह द चिल्ड्रेन', 'द इंटरनॅशनल फंड फॉर अॅनिमल वेल्फेअर' या संस्थांच्याही त्या सदिच्छादूत आहेत. शिवाय सँक्च्युरी नेचर फाउंडेशनच्या त्या नियामक मंडळावर आहेत.
Kpop4Planet चे संस्थापक
केपॉप फॉर प्लॅनेट याद्वारे डेयॉन ली हे जगभरातील के-पॉप चाहत्यांना हवामान संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची सादर घालत आहेत.
2021 मध्ये Kpop4Planet या चळवळीची स्थापना एका गटाच्या माध्यमातून झाली. दक्षिण कोरियाच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना, सर्वांत मोठ्या लेबलसाठी काम करणाऱ्यांना आणि सर्वांत मोठ्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेसना त्यांनी हवामानविषयक कृती करण्यासाठी आणि अक्षय उर्जेचा वापर करण्याविषयी सांगितलं.
अल्बमची फिजिकल आवृत्ती पर्यावरणासाठी किती धोकादायक ठरू शकते हे अधोरेखित करत या गटाने केपॉपमधील प्रसिद्ध कलाकारांना डिजिटल अल्बमसाठी प्रचार करायला लावला.
डेयॉन ली यांनी आता म्युझिक अल्बमच्या पलीकडे जात पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या लक्झरी फॅशन ब्रँड्सच्या हवामान जाहीरनाम्याला आव्हान देत आहेत. या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून बऱ्याचदा के-पॉपचे प्रसिद्ध कलाकार दिसत असतात.
सामाजिक न्यायासाठी उभं राहिल्यानंतर बदल घडून येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसत नाही. आम्ही हे सिद्ध केलं आहे आणि करत राहू. पर्यावरण संकटाशी सामना सुरूच राहील.
डेऑन ली
अॅथलिट
युरोपीयन टीम चॅपियन्सच्या 2023 च्या संघाची ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दन आयर्लंडची कॅप्टन असलेल्या बियान्का विलियम्स हिने 4X100 मीटर शर्यतीत सुवर्णपदत कमावलं.
जुलैमध्ये यूके अॅथलेटिक्स चँपियनशिप स्पर्धेत 200 मीटर मध्ये दुसरी येत तिने ब्रिटीश संघात स्थान मिळवलं आणि बुडापेस्टला होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी रवाना झाली.
जुलै 2020 मध्ये ती आणि तिचा पार्टनर असलेला अॅथलीट रिकार्डो दोस सँतोस यांना लंडनमध्ये अडवून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करत झडती घेतली होती.
विलियम्स आणि दोस सँतोस यांनी त्यानंतर पोलिसांवर वंशभेदाचे आरोप करत रीतसर तक्रार नोंदवली. यातून झालल्या चौकशीत दोन अधिकारी गैरव्यवहार केल्याबद्दल दोषी आढळले आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.
अभिनेत्री
म्यानमारमध्ये 25 वर्षांपूर्वी एक अभिनेत्री म्हणून खिन हनिन वै यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांची मुख्य भूमिका असलेला सान ये नावाचा चित्रपट आणि त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. बर्मीज सिनेमाच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
पण सध्या त्या त्यांच्या समाजोपयोगी कामांसाठी अधिक ओळखल्या जातात. 2014 मध्ये त्यांनी खिन हनिन वै फाउंडेशन नावाची एक चॅरिटी सुरू केली. अनाथ मुलांचे आणि टाकून दिलेल्या मुलांचे संगोपन आणि इतरही अनेक सामाजिक कामं त्यांच्या संस्थेतर्फे केली जातात.
ज्यांचे पालक काही कारणाने मुलांना सांभाळू शकत नाहीत अशा 100 मुलांची त्या सध्या त्यांच्या कामातून काळजी घेत आहेत.
मुलांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोहिमेच्या अँबेसीडर म्हणून हनिन वै काम करतात.
धावपटू
लेबनॉनच्या इतिहासातील सर्वांत वेगवान स्त्री' अशी ओळख मिळवलेल्या अजीझा सबैती हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतील विक्रम मोडून नाव कमावलं होतं. नुकतंच तिने यंदाच्या पश्चिम आशिया आणि अरब चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून पुन्हा बातम्यांमध्ये ठळक स्थान मिळवलं. कारण या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावणारी ती तिच्या देशातली पहिली कृष्णवर्णीय खेळाडू ठरली.
लिबेरियन आई आणि लेबनीज वडील यांच्या पोटी जन्माला आलेली अजीझा वयाच्या 11 व्या वर्षी लेबनॉनमध्ये स्थायिक झाली. तिथे तिला तिच्या रंगावरून भेदभाव सहन करावा लागला आणि वंशभेदाची शिकार झाली.
स्वतःला ओळखून सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी तिला या खेळाने संधी दिली.
तिच्या देशात पद्धतशीरपणे होणाऱ्या वंशभेदाविषयी बोलायला आता ती तिच्या प्रसिद्धीचा वापर करून घेते. समानता आणि सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करते. लेबननच्या तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी तिने तिथल्या शाळा आणि विद्यापीठांबरोबर काम सुरू केलं आहे.
इक्वेस्टेरिअन व्हॉल्टर(घोड्यावरचे जिम्नॅस्टिक)
अँटिनिस्का सेन्सी यांनी वयाच्या तिशीत इक्वेस्टेरिअन व्हॉल्टिंगला सुरुवात केली. धावत्या घोड्याच्या पाठीवर स्वार होत केलेल्या जिम्नॅस्टक्सचा हा प्रकार करता करता पुढच्या 10 वर्षांत आपण हा खेळ खेळणाऱ्या टीमबरोबर टूरवर असू याची अपेक्षा त्यांनाही सुरुवातीला नव्हती.
इटलीच्या उत्तरेतील ला फेनिस शहरातलं त्यांचं आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. आईच्या पोटात असल्यापासूनच संघर्ष सुरू होता. प्रेग्नन्सीत गुंतागुंत होती. जन्माला येणारं बाळ पहिल्या हिवाळ्यात तग धरू शकणार नाही, असं त्यांच्या आईला सांगण्यात आलं होतं.
ला फेनिस व्हॉल्टिंग टीम आणि इटलीच्या नॅशनल असोसिएशन फॉर फॅमिलीज अँड पीपल विथ डिसअॅबिलिटीज अर्थात AMFFAS च्या स्थानिक केंद्राच्या उपक्रमात सहभागी होताना सेन्सी यांनी व्हॉल्टिंगला सुरुवात केली.
अॅना कॅव्हाल्लारो या वर्ल्ड चँपियनबरोबर आणि ट्रेनर नेल्सन व्हिडोनी यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्या प्रशिक्षण घेतात.
टीव्ही सेलेब्रिटी
जॉर्जिया हॅरिसन या फोटोंचा वापर करून लैंगिक अत्याचाराचा बळी ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपलाच अनुभव वापरत महिलांविरोधातल्या हिंसाचाराविरोधात त्यांना मदत करायचं ठरवलं. ब्रिटनमध्ये कन्सेन्ट किंवा संमतीचा अर्थ ज्या पद्धतीने घेतला जातो ती पद्धतच त्यांनी बदलायला लावली.
लव्ह आयलंड आणि द ओन्ली वे इज इसेक्स या कार्यक्रमांमुळे ओळखीचा चेहरा असलेल्या त्या टीव्ही सेलेब्रिटी आहेत. यूकेच्या ऑनलाइन सेफ्टी विधेयकामध्ये सुधारणा व्हावी आणि व्यक्तिगत खासगी फोटोंचा दुरुपयोग गुन्हा ठरवावा म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. या प्रकाराला रिव्हेंज पॉर्न असं म्हटलं जातं. त्याविरोधात गुन्हा दाखल होणं सोपं होण्यासाठी त्यांनी कायद्यात बदल सुचवला होता.
संमतीशिवाय घेतलेले फोटो किंवा व्हिडीओ फूटेज कुणी वापरले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं त्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना आता बजावत आहेत.
वकील, लेखिका आणि कार्यकर्ती
युनायडेट स्टेट्स ऑफ अमेरिेकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची पत्नी अर्थात माजी फर्स्ट लेडी असणाऱ्या मिशेल ओबामा यांनी गर्ल्स अपॉर्च्युनिटी अलायन्सची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या जगभरातील लहान-मोठ्या संस्थांना त्या मदत करतात.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून कार्यरत असताना 'लेट गर्ल्स लर्न' नावाने मिशेल यांनी उपक्रम सुरू केला होता तेव्हाच या अलायन्सची पायाभरणी झाली. जगभरातील किशोरवयीन मुलींना दर्जेदार शिक्षणसंधी उपलब्ध करून देण्याचा त्यामागचा दृष्टिकोन होता.
फर्स्ट लेडी म्हणून काम करताना त्यांनी तीन इतर महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. लेट्स मूव्ह - पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी मदत करणे; जॉइनिंग फोर्सेस- अमेरिेकेच्या सैन्यदल आणि सुरक्षादलातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार; आणि रीच हायर - ज्या उपक्रमासाठी त्या आजही काम करतात तो तरुणांना उच्चशिक्षणासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न.
स्त्री जननेंद्रियाचे विच्छेदन विरोधक
स्त्री जननेंद्रिय विच्छेदनाच्या प्रथा (FGM)बंद करण्याच्या ध्येयाने शामसा अरावीलो यांनी त्यांच्या प्रभावी आणि थेट ऑनलाइन व्हिडीओच्या माध्यमातून त्याबद्दल शिक्षण देण्याचा आणि जागृती करण्याचा विडा उचलला.
अरावीलो यांचा जन्म सोमालियात झाला, पण सध्या त्या ब्रिटनमध्ये राहतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना सुंता किंवा जननेंद्रियाचा भाग कापून टाकायच्या प्रथेला सामोरं जावं लागलं. अवैद्यकीय कारणासाठी जननेंद्रियाच्या वरचा काही भाग किंवा संपूर्ण आवरण कापून टाकायच्या प्रथा काही ठिकाणी प्रचलित आहेत.
टिकटॉकवर त्यांच्या व्हिडीओला 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. कोणीह याविषयीच्या योग्य माहितीपासून वंचित राहता कामा नये, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सध्या त्या परदेशात अडकलेल्या आणि तथाकथित ऑनर व्हायोलन्सला सामोरे जाणाऱ्या ब्रिटीश नागरिकांना मदत करतात. FGM बद्दल लंडन मेट्रोपोलिटन पोलिसांना सल्ला द्यायचं कामही त्या करतात आणि गार्डन ऑफ पीस नावाची स्वयंसेवी संस्था त्यांनी स्थापन केली आहे.
वकील आणि मानवी अधिकार कार्यकर्ती
पूर्वीच्या युगोस्लाव्हियात लढाई सुरू झाली त्या वेळेपासून म्हणजे 1990 च्या सुरुवातीपासून नताशा कँडिक यांनी युद्धग्रस्त भागातील अत्याचारांची नोंद ठेवणं सुरू केलं. यामध्ये बलात्कार, अत्याचार, छळ, खून आणि सक्तीने बेपत्ता व्हायला लावणं यांचा समावेश आहे.
बेलग्रेडच्या युद्ध अपराध न्यायालयात त्यांनी वेगवेगळ्या वंशाच्या अनेक कुटुंबांची बाजू मांडली आहे. सर्बियाचे बलशाली नेते स्लोबोडन मिलोसेव्हिक यांच्या सरकारच्या कोसोवोविषयीच्या धोरणावर सडेतोड टीका करणाऱ्या गटाचा त्या भाग होत्या.
कँडिक यांनी ह्युमॅनिटॅरिअन लॉ सेंटरची स्थापना केली. युद्ध अपराधांचा निःपक्षपातीपणे तपास केल्याबद्दल या संस्थेचं नेहमी कौतुक होतं.
RECOM रिकन्सिलिएशन नेटवर्कचं आयोजन करण्यास त्यांनी मदत केली. 13 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या बाल्कन युद्धासंदर्भात तथ्य मांडण्यासाठी या नेटवर्कची सुरुवात झाली.
गृहनिर्माण चळवळ कार्यकर्ती
नेवा नेशन या मूलवासी नेपाळी समाजाची सदस्य असणाऱ्या रुकसाना तृतीयपंथी मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. लहान असताना आपल्या अस्तित्वाबद्दल, ओळखीबद्दल त्या कमालीच्या साशंक होत्या आणि अपुऱ्या माहितीमुळे त्यांचं बालपण संघर्षात गेलं.
स्वयंशिक्षणाचा मार्ग चोखाळत त्यांनी आपल्या वेगळ्या लैंगिकतेच्या आणि ओळखीच्या प्रश्नांवर मात केली. आपण ट्रान्सजेंडर असल्याचं जाहीर करून त्यांनी सोशल मीडियावरून तृतीयपंथीयांच्या हक्कांबद्दल नेहमी भूमिका घेत आवाज उठवला.
त्या सध्या कायद्याची पदवी घेत आहेत आणि तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. नेपाळमधील LGBTQ+ लोकांना कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार मिळावेत यासाठीच्या चळवळीत त्या आघाडीवर आहेत.
कपाली या नेवा वंशातील जुगी नावाच्या ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित जातीतून येतात. जुगी समाजाला त्यांच्या पारंपरिक घरातून जबरदस्तीने विस्थापित केलं जात आहे त्याविरोधातही त्यांनी लढा उभारला आहे.
आदिवासी हक्क कार्यकर्त्या
इक्वेडोरची अॅमेझॉन खोऱ्यातील वर्षावनांच्या संरक्षणासाठीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या अलिशिया काहुइया यांना यंदा मोठा विजय मिळाला.
यासुनी नॅशनल पार्कमध्ये आता कुठल्याही नव्या तेलविहिरींचं काम थांबवण्यात यावं असा कौल सार्वमताने मिळाला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. कारण पृथ्वीवरील सर्वाधिक जैववैविध्य असणाऱ्या आणि अनेक दुर्गम आदिवासी जमातींचा अधिवास असणाऱ्या प्रदेशातील सगळ्या सरकारी तेल कंपन्यांना त्यांचं काम आता थांबवावं लागेल.
काहुइया यांचा जन्म यासुनी इथे झाला आणि NAWE म्हणजे वाओरानी देशाच्या त्या नेत्या आहेत. गेलं दशकभर त्यांचा या सार्वमतासाठीचा लढा सुरू होता.
इक्वेडोर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिजीअस पीपलच्या महिला विभागाच्या त्या आता प्रमुख आहेत.
हवामान बदलामुळे आमच्यासाठी जगणं अवघड झालं आहे. कारण वारंवार येणाऱ्या पुरामुळे आमची पिकं नष्ट होतात. सूर्य प्रचंड आग ओकतो तेव्हा दुष्काळाच्या झळा बसतात. आमचं अन्न सगळं वाया जातं आणि आम्ही पुन्हा दुःखाच्या खाईत जातो कारण आमचे पिकं वाढवण्याचे सगळे कष्ट धुळीला मिळालेले असतात.
अलिशिया काहुइया
अग्निशमन सैनिक
सोफिया कोसाचेवा या मूळात ऑपेरा संगीताच्या शिक्षिका. पण 2010 काही अग्निशमन दलातील जवान त्यांना भेटले आणि त्यांच्या करिअरची दिशा बदलली.
त्या स्वतः अग्निशमन सैनिक झाल्या आणि रशितातील वणव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी एक गट तयार केला. यामुळे देशभरात 25 स्वयंसेवी गट तयार झाले.
रशियामद्ये काही शे आगी आटोक्यात आणण्यास त्यांनी मदत केली आणि ग्रीनपीसबरोबर त्यासाठी संधान बांधलं. त्यानंतर त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या रशियन शाखेवर 'आक्षेपार्ह संस्था' म्हणून बंदी घालण्यात आली.
कोसाचेवा यांनी स्वयंसेवी अग्निशमन सैनिकांसाठी एक वेबसाइटही सुरू केली आणि वणवा नियंत्रक आणि प्रतिबंधन माहितीचा रशियनमधील सर्वोत्तम डेटाबेस म्हणून तो ओळखला जातो.
हवामान संकट हे किती मोठं आहे याचा विचार करण्याऐवजी छोट्या छोट्या उपाययोजना करणं महत्त्वाचं कारण प्रत्येक यशाची सुरुवात छोट्यापासूनच होते. काहीतरी जागतिक बदल करण्याएवढे आपण मोठे नाही, असं आपल्याला वाटू शकतं पण आपल्या आसपास आपण छोट्या बदलांपासून सुरुवात केलीच पाहिजे.
सोफिया कोसाचेवा
मानवी हक्क कार्यकर्त्या वकील
अमाल क्लूनी या पुरस्कारविजेत्या मानवी हक्कांसाठीच्या - ह्युमन राइट्स लॉयर आहेत. अन्यायाला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या गेली दोन दशकं लढत आहेत.
अर्मेनिया आणि युक्रेनमधीलल मानवतेविरोधाातील गुन्हे आणि मालावी तसंच केनियातील स्त्रियांवरचा लैंगिक अत्याचार, याविरोधात त्यांनी महत्त्वाच्या केसेस लढवल्या.
अलिकडच्या काळातील त्यांच्या यशामध्ये आयएस फायटर आणि दारफूरच्या युद्धग्रस्तांच्या वतीने त्यांनी दिलेल्या लढ्याचा समावेश होतो. दडपशाही राजवटीत काम करणारे पत्रकार आणि राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
त्या कोलंबिया लॉ स्कूलमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत आणि क्लूनी फाउंडेशन फॉर जस्टिसच्या सह-संस्थापक आहेत. 40 हून अधिक देशांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोफत कायदेशीर समर्थन पुरवणारी त्यांचीसंस्था आहे.
मावनाधिकार कार्यकर्त्या
बाहरिन आणि आखाती देशांमध्ये राजकीय सुधारणा आवश्यक असल्याचा आवाज उठवणाऱ्यांमध्ये डॅनिश-बाहरिनी मानवाधिकार कार्यकर्त्या मरियम अल ख्वाजा यांचं नाव मोठं आहे.
आपले वडील अब्दुलहादी अल ख्वाजा यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी #FreeAlKhawaja ही मोहीम सुरू केली. या माध्यमातून या देशांमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अब्दुलहादी हे बाहरिनमध्ये लोकशाहीवादी सरकार यावं यासाठी आंदोलन करणाऱ्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. 2011 पासून त्यांना राजबंदी म्हणून जन्मठेपेच्या शिक्षेत ठेवण्यात आलं आहे.
मरियम या इंटरनॅशनल सर्व्हिस फॉर ह्युमन राइट्स आणि इतर अनेक मंडळांवर काम करत आहेत. FRIDA ही तरुण स्त्रीवादी संघटना आणि फिजिशियन्स फॉर ह्युमन राइट्स या संघटनेसाठीदेखील त्या काम करतात.
राजकीय कार्यकर्ती
बेला गाल्होस या ईस्ट तिमोर किंवा तिमोर लेस्टे देशात क्रांती घडवून आणण्यासाठी निर्भीडपणे लढत आहेत. 2002 मध्ये इंडोनेशियापासून स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांचा लढा कायम आहे.
त्यांना काही वर्षं अज्ञातवासात काढावी लागली. तो काळ जगभर फिरून त्यांनी आपल्या देशातल्या लोकांचा आत्मनिर्णयाचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ईस्ट तिमोरला त्या परतल्या आणि देशाच्या पुनर्उभारणीसाठी स्वतःला झोकून दिलं. अनेक दशकं चाललेल्या लढ्यामुळे त्या देशातील अर्ध्याहून अधिक जनता गरिबीच्या खाईत लोटली गेली होती.
2015 मध्ये त्यांनी लेउब्लोरा ग्रीन स्कूलची स्थापना केली. लहान मुलांचा बदलाचे माध्यम म्हणून विचार करताना त्यांनी शाश्वत विकासाचा दृष्टिकोन ठेवून ही संस्था उभी केली.
महिलांचे आर्थिक सबलीकरण विषयात ईस्ट तिमोरच्या अध्यक्षांच्या सल्लागार म्हणून सध्या त्या काम करत आहेत. आणि LGBTQ+ लोकांचा आवाज बनून कार्यरत आहेत.
माजी सैन्य अधिकारी
2011च्या भयंकर भूकंप आणि त्सुनामीमध्ये अडकलेल्या 11 वर्षांच्या रिना गोनोईला महिला सैनिकांनी वाचवलं होतं. तेव्हापासून आपणही जपानच्या स्वयंसरक्षण दलात काम करण्याचं तिचं स्वप्न होतं.
रिना गोनोई सैन्य अधिकारी झाल्या, पण त्यांचं बालपणीचं स्वप्न भंगलं जेव्हा सैन्यदलात त्यांच्यावर दररोजच लैंगिक अत्याचार सहन करण्याची वेळ आली.
गोनोई यांनी 2022 ला लष्करी नोकरी सोडली आणि एक चळवळ सुरू केली. पुरुषप्रधान समाजात लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या मुली त्याबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्यावरच उलटतं. त्याची जबाबदारी घेणं सोपं नसतंच.
गोनोई यांच्या केसमुळे लष्कराला अंतर्गत तपास करणं भाग पडलं. त्यातून इतर 100 महिलांच्या अत्याचारांबद्दलच्या तक्रारी समोर आल्या. नंतर संरक्षण मंत्रालयाने गोनोई यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.
ब्राझीलच्या मंत्री
ब्राझीलमध्ये जोर धरणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काच्या लढ्यातील महत्त्वाचं नाव ठरलेल्या सोनिया ग्वाजाजारा 2023 मध्ये त्या देशातील मूळ रहिवाशांपैकी मंत्रिपदाला पोहोचलेल्या पहिल्याच नागरिक ठरल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष लुला डीसिव्हा यांनी सोनियांची मंत्रिपदी केलेली नेमणूक ऐतिहासिक ठरली.
पर्यावरणाविरोधी गुन्हेगारांविरुद्धचा लढा हा आपला प्राधान्यक्रम असल्याची शपथ त्यांनी घेतली.
ग्वाजाजारा यांचा जन्म अमेझॉनच्या खोऱ्यात अरारिबोइया भागात झाला. त्यांचे आईवडील निरक्षर होते. अमेझॉनच्या खोऱ्याने हवामान बदलामुळे झालेल्या विद्ध्वंसाची पहिली झलक पाहिली होती आणि त्यामुळे कशी परिसंस्था उलथून पडू शकते हे सोनियांनी जवळून अनुभवलं होतं.
त्यांनी साहित्याचा अभ्यास केला, नर्स म्हणून काम केलं आणि नंतर शिक्षिका झाल्या. त्यानंतर त्यांचं चळवळीतील कार्यकर्ती म्हणून करिअर सुरू झालं. 2022 मध्ये त्या साओ पावलो राज्याच्या पहिल्या स्थानिक आदिवासी प्रतिनिधी किंवा काँग्रेस वुमन झाल्या.
हवामानाचा न्याय्य विचार आणि पर्यावरणातील वंशवादाविरुद्धच्या लढ्याचा कसा प्रचार करायचा यावर आपल्याला विचार करायला हवा. पर्यावरणाची काळजी घेण्यात, संरक्षण करण्यात पुढाकार असणारी माणसंच पर्यावरणाच्या ऱ्हासाचे पहिले बळी ठरतात. आम्ही स्थानिक आदिवासी मंडळी जैववैविध्य आणि जीवन यांचे खरे संरक्षक असतो.
सोनिया ग्वाजाजारा
एग फ्रीजिंग कँपेनर
2018 मध्ये शू झाओझाओ यांनी त्यांची बीजांडं गोठवण्यासाठी बीजिंगमधल्या सार्वजनिक रुग्णालयाशी संपर्क साधला. पण आम्ही फक्त विवाहित स्त्रियांसाठीच ही सेवा देतो, असं त्यांना सांगण्यात आलं. झाओझाओ या सिंगल आहेत.
त्यांनी त्या रुग्णालयाविरोधात न्यायालयात दावा ठोकला आणि अविवाहित महिलांना त्यांची बीजांड गोठवण्याचा अधिकार नाकारण्याच्या नियमाविरुद्ध पहिल्यांदाच आवाज उठवला.
डिसेंबर 2019 मध्ये ही मूलभूत न्यायालयीन लढाई सुरू झाली. त्या देशातील घटलेल्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर या लढ्याच्या बातमीने देशभरात ठळक स्थान मिळवलं.
या न्यायालयीन लढ्याचा अंतिम निर्णय येणं अद्याप बाकी आहे. पण अनेक कायदातज्ज्ञ, अभ्यासक, वैद्यकीय आणि नीतीमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांनी हा विषय या निमित्ताने अभ्यासला. एकल स्त्रियांचा प्रजनन अधिकार आणि शारीरिक स्वायत्तता यासाठीच्या त्या मोठ्या पुरस्कर्त्या आहेत.
संसद सदस्य
2019 मध्ये बिशप ऑकलंडमधून निवडून आलेल्या पहिल्या कॉन्झर्वेटिव्ह खासदार म्हणन डेहेन्ना डेव्हिसन यांचं नाव झालं. 1885 पासून म्हणजे हा मतदारसंघ स्तापन झाल्यापासून हा चमत्कार झाला नव्हता. 2022 मध्ये सामाजिक गतिशीलता आणि पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित करून ती पातळी वाढवण्यासाठी मंत्री बनली.
सप्टेंबर 2023 मध्ये तीव्र डोकेदुखी (क्रोनिक मायग्रेन)झाल्याचं जाहीरपणे सांगत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
डेव्हिसन 13 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचा किरकोळ वादात एका ठोशामुळे (वन पंच डेथ) मृत्यू झाला. याच कारणाने त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. वन पंच असॉल्ट्सविरोधात कायदा करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय संसदीय गट स्थापन केला आणि One Punch UK for Justice नावाने मोहीम सुरू केली. या गुन्ह्याबद्द्ल शिक्षा व्हावी यासाठी कायदेसुधारणा करण्याची त्यांची मागणी होती.
क्रोनिक मायग्रेनसाठी उपचार सुधारण्यावर आणि इनव्हेजिव लोब्युलर कॅन्सरसाठी अधिक संशोधन निधीसाठी मोहीम राबवण्यावरही त्यांचा भर आहे.
निर्वासितांचे हक्क कार्यकर्ती
तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तनात राहणाऱ्या आणि देशाबाहेर आश्रय घेतलेल्या अफगाणांना महत्त्वाची सामुग्री आणि माहिती पुरवावी या उद्देशाने 2021 मध्ये दोस्ती नेटवर्क या संस्थेची स्थापना झाली.
संस्थापिका सुमिया तोरा या स्वतः अफगाण रेफ्युजी आहेत. त्यामुळे विस्थापितांपुढची आव्हानं त्यांना चांगली माहिती आहेत.
निर्वासितांचं पुनर्वसन आणि तिथल्या अशांततेमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था हे त्यांच्या कामाचे प्रमुख विषय आहेत.
शिक्षणाच्या ताकदीने क्रांती घडू शकते हे जाणून तोरा यंनी त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ, वर्ल्ड बँक, मलाला फंड आणि श्मिड्ट फ्युचर्ससारख्या संस्थांबरोबर काम केलं आहे. या भागिदारीमुळे गुणवंतांना शिक्षणाची चांगली संधी मिळते. त्यातही निर्वासित, आणिबाणीतल्या परिस्थितीतल्या महिला आणि मुली यांचा विचार प्राधान्याने होतो.
अपंगहक्क कार्यकर्ती
हिरो विमेन रायजिंग किंवा मामा शुजा नावाची नेटवर्क ही डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशातील मुलींची आणि महिलांची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सुरू झाली.
अपंगहक्क कार्यकर्त्या नीमा नामादामू यांनी ही तळागाळात काम करणारी संस्था सुरू केली. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे आवाज बुलंद करावेत आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचं शिक्षण द्यावं हा त्यांचा उद्देश.
पूर्व काँगोच्या ग्रामीण भागात नीमा यांचा जन्म झाला आणि दोन वर्षांच्या असतानाच त्यांना पोलिओची लागण झाली. त्यांच्या समाजातील पहिल्या अपंग व्यक्ती ठरल्या ज्यांनी युनिव्हर्सिटीत जाऊन पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.
त्या नंतर संसद सदस्या झाल्या आणि आता त्यांच्या देशाच्या कुटुंब आणि लैंगिक समानता मंत्र्यांच्या सल्लागार आहेत.
मुत्सद्दी आणि हवामान धोरण निगोशिएटर
2009 च्या कोपेनहेगन येथील राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत मतभेदांमुळे संवाद खुंटला त्यावेळी ख्रिस्तियाना फिग्युरेस यांना कोंडी सोडवण्यासाठी पाचारण करण्यात आलं.
राष्ट्रसंघाच्या Framework Convention on Climate Change च्या कार्यकारी सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर पुढची सहा वर्षं त्यांनी सगळे देश ठरवलेल्या हवामान धोरणांचा स्वीकार करतील यासाठी प्रयत्न केले.
2015 च्या ऐतिहासिक पॅरिस करारावर 200 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या, याचं बरंचसं श्रेय ख्रिस्तियाना यांना जातं. जागतिक तापमान वाढ सरासरी कमीत कमी ठेवण्यासाठी म्हणजे औद्योगिकीरणाअगोदरच्या तापमान वाढीच्या पातळीपेक्षा जास्तीत जास्त 2 अंशाने अधिक राहील याची काळजी घेण्यासाठी सर्व देश कटिबद्ध करण्याचं काम पॅरिस करार करतो.
ग्लोबल ऑप्टिमिझ या संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. हवामान संकटावर प्रत्यक्षात येऊ शकतील असे उपाय शोधण्याचं काम ही संस्था करते.
कधीकधी मी दुःखातिरेकाने दबून जाते आणि भावनांमुळे विकलांग होते, त्यामुळे काहीच करू शकत नाही. कधीकधी मला अनावर राग येतो आणि तो माझ्या इतर भावनांचा ताबा घेतो. तीव्र प्रतिक्रिया देण्यासाठी मला उद्युक्त करतो. पण जे चांगले दिवस असतात तेव्हा माझं दुःख आणि राग मला माझ्या भावनांच्या मुळाशी घेऊन जातात आणि त्यातून अधिक जोरकसपणे, प्रेमाने आणि आनंदाने काम करण्यासाठी मी वचनबद्ध होते. आपल्या मुलांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला एक चांगलं जग मागे ठेवायचं आहे ही भावना पुरून उरते.
ख्रिस्तियाना फिग्युरेस
वकील
WWP म्हणजे विमेन वेज पीस या व्यासपीठाची संयोजक म्हणून काम करताना याइल ब्राउडो बहात यांनी इस्रायलच्या तळागाळात शांंसता चळवळ पोहोचवली. त्सासाठी त्यांनी आपलं कायद्याचं ज्ञान उपयोगात आणलं. WWP चे आता 50 हजारांहून अधिक सदस्य आहेत.
2014 मध्ये सुरू झालेला WWP हा मंच इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर स्त्रियांच्या सहभागाने शांततामय राजकीय चर्चा आणि त्यातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
पॅलेस्टाइनमध्ये याच धर्तीवर काम करणारी भगिनी संस्था 'विमेन ऑफ द सन'शी त्यांच्या संस्थेने दोन वर्षांपूर्वीपासून जोडून घेतलं आहे.
याइल ब्राउडो बहात या त्यांच्या कामाचं बहुतांश श्रेय त्यांच्या गुरू विवियन सिल्व्हर यांना देतात. WWP च्या सहसंस्थापक असलेल्या सिल्व्हर यांनी त्यांच्या आयुष्याची अनेक दशकं इस्रायल-पॅलेस्टाइनदरम्यान समझोता आणि समानता असावी यासाठी वेचली. 7 ऑक्टोबर 2023 ला 'हमस'ने केलेल्या हल्ल्यात सिल्व्हर मारल्या गेल्या.
Politics4Her च्या संस्थापिका
लैंगिक समतेचा विषय पुढे नेण्यासाठी यास्मिना बेन्सलिमेन यांनी Politics4Her ची स्थापना केली. महिला आणि तरुण मुलींनी धोरण प्रक्रियेत सगभागी व्हावं, राजकारणात सक्रिय व्हावं यासाठी ही संस्था प्रयत्न करते.
यास्मिना यांच्या मोरोक्को हा देश सप्टेंबरमध्ये भीषण भूकंपाने हादरला, त्यावेळी मदत कार्यात लैंगिक संवेदनशीलता हवी अशी मागणी त्यांच्या संस्थेने लावून धरली.
अशा प्रकारच्या आपत्तीमुळे स्त्रियांना आणि मुलींना वेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. कुणाला पाळीदरम्यान आवश्यक सुविधा मिळत नाही, कुणाची पाळीदरम्यान काळजी घ्यायची ऐपत उरत नाही तर कुणाची बळजबरीने लग्न लावली जातात. अशा आव्हानांचा एक जाहिरनामाच त्यांनी तयार केला.
अनेक स्वयंसेवी संस्थांच्या त्या सल्लागार, मेंटर आणि संचालक मंडळ सदस्य म्हणून काम करताना त्या तरुण स्त्रियांना त्यांच्यातील नेतृत्वगुण वाढवण्यासाठी मदत करतात. राष्ट्रसंघाच्या विमेन पीस बिल्डर अवॉर्डच्या त्या मानकरी आहेत.
बालविवाहविरोधातील कार्यकर्ती
युलांडा मटांबा या मलावीमधील लिलाँग्वे समाजात वाढल्या. त्यांच्या समाजात मुलींच्या शिक्षणाबद्दल फारशी आस्थानाही. लवकर लग्न करून द्यायची प्रथा असल्याने 18 च्या आतच अनेक मुलींची लग्न होतात आणि त्यांना शाळा सोडावी लागते.
युलांडा यांनी या सामाजिक प्रथेविरोधात आवाज उठवला आणि स्वतः विद्यापीठात जाऊन उच्चशिक्षण घेतलं.
बालविवाहापासून मुलींचं रक्षण करणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्या आग्रही आहेत. कमी वयात आई होणाऱ्या मुलींच्या आरोग्याशी निगडित धोक्याचा विचार अग्रक्रमाने व्हावा यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.
सध्या त्या AGE आफ्रिका या संस्थेसाठी मलावी देशाच्या प्रमुखम्हणून काम पाहतात. आफ्रिका खंडातील सर्व मुलींना माध्यमिक शिक्षणाची समान संधी मिळवून देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते.
पत्रकार
तामार मुझेरित्झ या त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षापासून जॉर्जियातील टीव्हीच्या राष्ट्रीय वाहिनीचा सर्वपरिचित चेहरा म्हणून नावारुपाला आल्या. तामुना म्हणूनही त्या ओळखल्या जातात. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा आपण दत्तक मूल आहोत याचा त्यांना शोध लागला.
आपले खरे जन्मदाते आई-वडील शोधण्यासाठी त्यांनी सगळं काही सोडलं, सर्वस्व पणाला लावलं. यासबंधी शोध घेत असताना जॉर्जियात 1950 पासून मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने मुलं दत्तक देण्या-घेण्याचा बाजारच मांडलेला असल्याचे पुरावे त्यांच्या हाती लागले.
I'm Searching' या नावाने एक फेसबुक ग्रूप तयार करून त्यांनी या विषयावर देशभर याविषयी चर्चा घडवली. बरीच मुलं या अडॉप्शन ब्लॅक मार्केटमध्ये थेट प्रसूतीगृहातूनच नेली जातात. त्यांच्याबद्दल या ग्रूपच्या माध्यमातून बोललं गेलं.
तामार यांच्या संस्थेने आतापर्यंत अवैध दत्तकविधानामुळे दुरावलेल्या शेकडो कुटुंबीयांना एकत्र आणण्यात मदत केली आहे. पण त्यांना स्वतःला मात्र आपल्या जन्मदात्यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
माजी राजकारणी आणि शांततादूत
उत्तर आयर्लंडच्या गुड फ्रायडे कराराला यंदा 25 वर्षं पूर्ण झाली. त्या कराराकडे घेऊन जाणाऱ्या त्या वेळच्या बहुपक्षीय शांतता चर्चेत मोनिका मॅकविल्यम्स यांनी मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती.
नॉर्दर्न आयर्लंड विमेन्स कोअॅलिशन नावाच्या राजकीय पक्षाच्या त्या सहसंस्थापक. त्यांनी सांप्रदायिक भेदांवर मात करत शांतता करारासाठी महत्त्वाच्या तरतुदी सुचवल्या.
नॉर्दर्न आयर्लंडच्या पहिल्या विधानसभेवर त्या निवडून आल्या होत्या. नॉर्दर्न आयर्लंड मानवाधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्त म्हणून त्यांनी नॉर्दर्न आयर्लंडच्या हक्कांबद्दलच्या विधेयकाचा मसुदा तयार केला.
मॅकविलियम्स सध्या सशस्त्र गटाच्या विभाजनासाठीच्या आयुक्त म्हणून काम करतात आणि त्यांनी महिलांवरील हिंसाचाराविरोधात व्यापकपणे काम केलं आहे.
महिला हक्क आणि हवामान चळवळ कार्यकर्ती
अलमासर लायब्ररी सेंटरच्या संस्थापक नायला मोहम्मद लामिन यांना नैर्ऋत्य अल्जेरिया भागातील सहाराच्या निर्वासित शिबिरांतील स्त्रिया आणि मुलांना त्यांचा आरोग्याविषयी शिक्षण द्यायचं आहे आणि पर्यावरण रक्षणाचेही धडे द्यायचे आहेत.
मोहम्मद-लामिन यांचं कुटुंब मूळचं पश्चिम सराहा भागात होतं. तिथे 1975 पासून मोरक्कन राजवटीत आलेली पूर्वीची स्पॅनिश वसाहत होती. हिंसाचाराच्या भीतीने त्यांच्या कुटुंबीयांना तिथून पळून जाऊन निर्वासित व्हावं लागलं.
निर्वासित शिबिरातच वाढलेल्या मोहम्मद-लामिन किशोरवयात इंग्रजी शिकल्या. परदेशी शिष्टमंडळासाठी अनुवाद केला आणि उच्चशिक्षणासाठी समाजातून निधी गोळा करून त्या परदेशी शिकायलाही जाऊ शकल्या.
शाश्वत विकास आणि महिला अभ्यास विषयात पदवी मिळवल्यानंतर त्या शिबिरात परतल्या त्या इथल्या 2 लाखांवर सहारावी निर्वासितांना मदत करण्याच्या हेतूने. हवामान बदलामुळे या निर्वासितांचे अन्नपाण्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत.
वाळवंटी प्रदेशात भीषण रीतीने वाढलेल्या हवामान बदलाच्या परिणामांकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आमच्या घरांना आता नियमित पुरांचा वेढा पडतो, वाळूच्या वादळांनी घरं उद्द्धवस्त होतात आणि लोकांना तीव्र तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामान संकटाला कारणीभूत ठरेल अशी कुठलीही थेट कृती न करताही आमच्या लोकांना हे भोगावं लागत आहे.
नायला मोहम्मद-लामिन
लेखिका आणि कलाकार
हिजाब वापरणं अनिवार्य केल्याच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे सेपिदेह राश्नू हे नाव इराणमध्ये सर्वपरिचित झालं.
बसमध्ये एका महिलेने त्यांना डोकं झाकून घेतलंच पाहिजे यासाठी सक्ती केली त्यावरून दोघींमध्ये वाद झाले आणि सेपिदेह यांना अटक झाली.
पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्या टीव्हीवरही दिसल्या. चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या आणि आपण वागलो त्याबद्दल त्या दिलगिरी व्यक्त करताना दिसल्या. जुलै 2022 मधली ही गोष्ट. त्यानंतर काही आठवड्यातच 22 वर्षांच्या माहसा अमिनी यांचा इराणच्या नैतिक पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
या वर्षाच्या सुरुवातीला डोक्यावर स्कार्फ नसलेले फोटो त्यांनी ऑनलाइन केले आणि त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभं करण्यात आलं. आपल्या या चळवळीमुळे विद्यापीठाने आपल्याला बेदखल केल्याचं त्या सांगतात.
त्या सध्या तुरुंगाबाहेर असून अजूनही हिजाब सक्तीला जाहीर विरोध करणं त्यांनी सोडलेलं नाही.
स्त्रीवादी नेत्या
जागतिक स्त्रीवादी चळवळीच्या 1970 च्या दशकापासूनच्या नेत्या असलेल्या ग्लोरिया स्टायनेम यांचं स्त्रीवादला दिलेलं योगदान जगभर पिढ्यान पिढ्यांपर्यंत पोहोचेल असं आहे.
एक कार्यकर्ती, पत्रकार, लेखिका, प्राध्यापिका आणि माध्यमांतील प्रवक्ती म्हणून त्यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी कायम लढा दिला आहे.
1971मध्ये सुरू झालेल्या Ms. Magazine च्या त्या सहसंस्थापक. महिला अधिकारांविषयीच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणायचे काम करणाऱ्या या मिस नियतकालिकाचं प्रकाशन आजही सुरू आहे.
विमेन्स मीडिया सेंटर, ERA गट आणि इक्वॅलिटी नाऊ अशा संस्थांच्या माध्यमातून त्या आज वयाच्या 89 व्या वर्षीदेखील अधिक समन्यायी जग निर्माण व्हावं म्हणून कार्यरत आहेत.
हवामान धोरण सल्लागार
हवामान धोरणांबद्दलच्या आघाडीच्या तज्ज्ञ असलेल्या इरायना स्टाव्हचुक यांनी नुकतेच युरोपीयन क्लायमेट फाउंटडेशनच्या युक्रेन प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून जबाबदारी स्वीकारली. युद्धोत्तर नुकसानातून बाहेर पडण्यासाठी युक्रेनमध्ये आखण्यात येणारं धोरण पर्यावरणपूरक आणि हवामान संकटाला दूर ठेवणारं असावं हे त्यांचं मुख्य उद्दीष्ट आहे.
ही नवी जबाबदारी घेण्याआधी त्या 2019 ते 2022 दरम्यान युक्रेन सरकारमध्ये उपपर्यावरणमंत्री होत्या. हवामान बदलासंदर्भात ध्येयधोरण आखणी, युरोपीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जैववैविध्य अशी जबाबदारी त्यांच्यावर होती.
स्टाव्हचुक या इकोअॅक्शन आणि कीव सायक्लिस्ट असोसिएशन (U-Cycle)महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांच्या सहसंस्थापक आहेत. हवामान बदल या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या स्थानिक नेटवर्कच्या संयोजनाचं कामही त्यांनी केलं आहे.
आम्ही आता आहोत तिथे आणि आहे त्या परिस्थितीत सर्वोत्तम काम करण्याचं आमचं ध्येय आहे. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या शब्दांत सांगायचं तर: 'गरजेचं आहे ते करण्यापासून सुरुवात करा; मग शक्य आहे ते करा; आणि बघा तुम्ही अचानक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू लागाल.'
इरायना स्टाव्हचुक
बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या वतीने लढा
2008 मध्ये आपली बहीण बेपत्ता झाल्यानंतर तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी, उत्तरं मिळवण्यासाठी बर्नाडेट स्मिथ यांनी खूप आटापिटा केला.
कॅनडामध्ये मूळ रहिवासी समाजातील हरवलेल्या, बेपत्ता किंवा खून झालेल्या महिला आणि मुलींच्या कुटुंबीयांसाठी लढणाऱ्या त्या प्रमुख कार्यकर्त्या ठरल्या. अशा कुटुंबीयांना एकत्र करून त्यांना मदत करण्यासाठी, त्यांच्यासाठी उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी संघटना सुरू केली.
ड्रॅग द रेड नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. विनिपेग्ज रेड रिव्हरमध्ये बेपत्ता व्यक्तींचा, त्यांच्या मृतदेहांचं, अवशेषांचा पुरावा म्हणून शोध घेण्याचा हा उपक्रम आहे.
स्मिथ यांची नुकतीच मोनिटोबा विधानसभेवर तिसऱ्यांदा निवड झाली. त्यांच्या प्रांताचं मंत्रिपद मिळवून त्यांनी इतिहास घडवला. कारण फर्स्ट नेशन वुमेनपैकी मंत्रिपदी निवड झालेल्या दोघींत त्या पहिल्या होत्या. त्या सध्या गृहनिर्माण, व्यसने आणि बेघर व्यक्तींसाठीच्या मदतीसाठीच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत.
गृहनिर्माण क्षेत्र कार्यकर्ती
मायामीच्या लिटल हैती भागातील रहिवासी असलेल्या मादाम रेनिता होम्स या O.U.R Homes या उद्योगाच्या संचालिका आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात त्यांचा हा उद्योग आणि बांधकाम सल्लागार म्हणून व्यवसाय आहे.
वंचित समाजासाठी हक्काचं घर असावं यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली. ज्या लोकांना हवामान बदलाचा परिणाम म्हणून वाढलेल्या समुद्रपातळीमुळे किनारपट्टी सोडावी लागली त्यांच्या हक्कांसाठीही त्या लढा देतात.
त्यांची आई एकल माता होती आणि तिने 11 मुलांना वाढवलं. होम्स या आता त्यातल्या मोठ्या.
क्लिओ इन्स्टिट्यूटच्या एमपॉवरिंग रेझिलिएंट विमेन कार्यक्रमाच्या त्या फेलो आहेत. विज्ञानाधारित शिक्षणातून हवामानाविषयी काळजी घेण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आफ्रिकन-अमेरिकन आणि अंतर्गत शहरांमधील लोकांसाठीच्या स्थानिक गृहनिर्माण संस्थांना रेनिता होम्स मदत करतात.
स्त्री म्हणून आपलं धरणीमातेशी असलेलं नातं ओळखू अशी आशा आहे. आम्ही काटक आहोत, कणखर आहोत, सांभाळ करण्यासाठीच बनल्या आहोत; आम्ही काम करतो आणि आम्ही काळजीही घेतो.
रेनिता होम्स
ग्रीन बिल्डिंग उद्योजक
2014 साली जेव्हा बसिमा अब्दुलरहमान यांच्या देशावर कथित इस्मालिक स्टेट गटाने कब्जा केला, तेव्हा त्या अमेरिकन युनिव्हर्सिटीत शिकत होत्या.
या लढाईत अनेक शहरं बेचिराख झाली. मास्टर्स इन स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेऊन अब्दुलरहमान जेव्हा मायदेशी परतल्या त्या वेळी मात्र यातून सावरायचा मार्ग त्यांना दिसला.
ग्रीन बिल्डिंगला चालना देणारा KESK नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. ग्रीन स्ट्रक्चर्स म्हणजे पर्यावरण स्नेही आणि उर्जाबचत करणारं आधुनिक तंत्रज्ञान वापरणं. त्याची पारंपरिक इराकी इमारत बांधणीच्या सामानाशी सांगड घालत त्यांनी ग्रीन बिल्डिंग उभारण्याची पद्धत शोधली.
आजच्या बांधकाम व्यवसायाने पुढच्या पिढ्यांचा विचार करूनच इमारती बांधल्या पाहिजेत असं त्यांचं ठाम मत आहे. भविष्यात त्रास भोगावा लागू नये म्हणून त्या कटिबद्ध आहेत.
हवामान संकटाबद्दलच्या विचाराने मी नेहमीच अस्वस्थ होते. याच्या धोक्यांपासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजनांचा विचार न करता कोणी स्वस्थ कसं बसू शकतं असा प्रश्न मला पडतो.
बसिमा अब्दुलरहमान
जनरल सर्जन
गाझा पट्टीत पहिल्या शल्यविशारद झालेल्या महिला म्हणून ओळख असलेल्या डॉ. सारा अल-साक्का या तेथील अल-शिफा या सर्वांत मोठ्या रुग्णालयात काम करतात.
युद्धादरम्यान जखमी लोकांवर उपचार करतानाचे त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर करतात. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझाचं अल-शिफा हे रुग्णालयदेखील लक्ष्य झालं.
रुग्णालयात वीज, पाणी, अन्न, इंधन याचा पुरवठा होत नसल्यामुळे आता रुग्णांवर उपचार करता येत नसल्याचं अल-साक्का यांच्या पोस्ट सांगतात. इस्रायली संरक्षण दल ज्याचा उल्लेख 'हमास'विरोधी लक्ष्यभेदी कारवाई असा करत आहेत त्या कारवाईदरम्यान इस्रायली सैनिकांनी रुग्णालयावर छापा घालण्याअगोदर काही वेळ डॉ. सारा यांना रुग्णालय सोडावं लागलं.
डॉ. सारा यांचा जन्म आणि पालनपोषण सौदी अरेबियात झालं. 2010 मध्ये त्या गाझामध्ये स्थालांतरित झाल्या. इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझा इते त्यांनी मेडिसिन विषयाचा अभ्यास केल्यानंतर सर्जरीतील उच्चशिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं. तेथील क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतून त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. त्या गाझामधील पहिल्या शल्यविशारद असल्या तरी आता अनेकींनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्या आता एकट्या फिमेल सर्जन नाहीत.
मानसिक आरोग्य पुरस्कर्ती
शाश्वतता म्हणजे कृती, शाश्वत विकास सुसंगत आणि तरुणाईच्या भाषेत कूल वाटावा या उद्देशाने जेनिफर उचेंडू यांनी SustyVibes नावाची एक युवक संघटना स्थापन केली.
हवामान संकटाचे आफ्रिकन लोकांच्या विशेषतः तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाले आहेत हे तपासण्याचं काम उचेंडू यांनी नुकतंच हाती घेतलं आहे.
इको एंझायटी आफ्रिका (TEAP) नावाने 2022 मध्ये त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला. हवामानविषयक आफ्रिकन लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या जपण्याचं काम संशोधन, चळवळ आणि हवामान जागृजी होण्यासाठी सायकोथेरपी त्या करतात.
मानसिकता बदलण्यासाठी आणि अवघड नि बऱ्याचदा सोयीस्कर नसलेलं काम म्हणजे हवामान भावना समजून घेण्यासाठी लोकांबरोबर, संस्थांबरोबर काम करायचं त्यांचं ध्येय आहे.
हवामान संकटाचा विषय निघाला की, मला वेगवेगळ्या भाव-भावना उफाळून येताना दिसतात. कितीही केलं तरी यासंदर्भात काम करताना आपण पुरे पडू शकणार नाही या भावनेशी आता मी एकमत झाले आहे. त्याऐवजी माझं सर्वोत्तम योगदान देण्याकडे मी आता लक्ष वेधलं आहे. हवामानाविषयीच्या माझ्या कळकळीला जपण्यासाठी इतरांच्या कृतीला पाठिंबा देणं, त्यांच्या सोबत असणं आणि केवळ तिथे असणं हे मी करते.
जेनिफर उचेंडू
वणवाशोधक तंत्रज्ञ
या वर्षभरात जगभरातील काही मोठी जंगलं वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडलेली आपण पाहिली. एकदा भडकलेला वणवा एवढ्या वेगाने पसरतो की, तो भीषण आगडोंब आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा पुरी पडत नाही. सोनिया कॅस्टनर यांनी वणव्याचा शोध आग लागताक्षणीच घेता यावा आणि तो लवकर आटोक्यात यावा यासाठी संस्था स्थापन केली आहे.
Pano AI हे त्यांचं तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वणवा लागताक्षणीच त्याविषयीचा संदेश पोचवण्याचं काम करतं. वणवा भडकून पसरण्याअगोदरच आग लागल्याची वार्ता आणि कुठे पसरेल याचा अंदाज येत असल्याने वणवा भडकल्यानंतर लोकांनी आपत्कालीन सेवांना फोन केल्यानंतर अग्निशमन यंत्रणेचं काम सुरू होतं. ते आता खूपच सुरुवातीच्या टप्प्यात सुरू होऊ शकतं.
कॅस्टनर यांनी यापूर्वी दहा वर्षं वेगवेगळ्या तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप्ससाठी काम केलं आहे.
मानवी अविष्कारांची विलक्षण ताकद मला आशादायी वाटते. हवामान संकटाच्या भीषण परिणामांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान आणि माहितीआधारित उपाययोजना कसे उपयुक्त ठरू शकतात हे मी स्वतः अनुभवलं आहे.
सोनिया कॅस्टनर
सागरी वैज्ञानिक
समुद्री गवत हे त्याच्यातील कार्बन साठवायच्या गुणधर्मामुळे आणि माशांना मिळणाऱ्या हिरव्या ठेव्यासाठी प्रसिद्ध आहे.पण पाण्याखालचे काही अधिवास आता पुरते उद्ध्वस्त झाले आहेत.
लिआन क्युलेन-अन्सवर्थ या प्रोजेक्ट सीग्रासच्या संस्थापकांपैकी एक असून सध्या संस्थेच्या सीईओ आहेत. अर्थपूर्ण व्याप्ती असलेला हा ब्रिटनमधील पहिलाच समुद्री गवत संवर्धनाचा प्रकल्प आहे.
या प्रकल्पात समुद्री गवताची लागवड सोपी करून टाकली आहे, कारण ते रिमोट कंट्रोल रोबोच्या साहाय्याने बिया पेरतात. पाण्याखालच्या किंवा समुद्रतळाच्या वनस्पती जगवण्यासाठी इतर देशांनाही अनुकरणीय अशी ही ब्लूप्रिंट आहे.
क्युलेन-अन्सवर्थ या आंतरविद्याशाखीय शास्त्रज्ञ असून सागरी संशोधनाचा त्याचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. विज्ञानानाधारित संवाद आणि संवर्धन या विषयाला त्यांनी वाहून घेतलं आहे.
कुणालाही एकट्याला कितीही करून झेपणार नाही असं हे काम आहे. पण लोकांनी एकत्र येऊन काम केलं तर ज्ञान वाटलं जातं. माझ्यापुरतं बोलायचं तर मी एक महत्त्वाचा अधिवास वाचवण्याचं काम करू शकते, हे मला माहीत आहे. त्याचं संरक्षण आणि संवर्धन करून त्यापासून मिळणारे सगळे फायदे आपल्या समाजासाठी, पृथ्वीसाठी ते देणार आहे.
लिआन क्युलेन-अन्सवर्थ
बायोगॅस व्यावसायिक
2012 मध्ये ट्रान गाम यांनी व्हिएतनाममधील शेतांसाठी पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांची ओळख करून द्यायला सुरुवात केली.
दोन मुलांची आई असणाऱ्या ट्रान गाम यांनी स्थानिक बाजारात अशा उर्जासाधनांची पुरेशी उपलब्धी नसल्याचं हेरून हनोईमध्ये बायोगॅस प्लांट बसवून त्यांचं व्यवस्थापन करण्याचं काम सुरू केलं. हळूहळू त्यांचा व्यवसाय लगतच्या तीन प्रांतांमध्ये पसरला.
गाईगुरांचे शेण, डुकराची विष्ठा, जलपर्णी आणि इतर घरगुती कचरा जिरवून बायोगॅसमधून इंधन मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा इंधनावरचा खर्च कमी झाला. घरगुती वापरासाठी, स्वयंपाकासाठी वापरण्यास सुयोग्य असा बायोगॅस हे नॅचरल गॅसपेक्षा अधिक पर्यावरस्नेही इंधन असल्याचं त्यांच्या प्रकल्पांमुळे समजलं.
हवामान बदलासाठी आवश्यक कृती करण्यासाठी स्थानिक समाजालाही उद्युक्त करून राजकीय पाठिंबा मिळवता येतो हे ट्रान यांच्यासारख्या उद्योजिकेने दाखवून दिलं.
आपण सर्वांनी जगायला हवं आणि छान जगायला हवं, या विचारातूनच मी स्वतः आपल्या माणसांना जपायला शिकले. त्यासाठी आपलं आरोग्य व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली झोप घेऊन टिकवलं पाहिजे. अशी ऑरगॅनिक लाइफस्टाइल इतरांनीही अंगिकारावी यासाठी मी प्रयत्न करते. त्यासाठी आपला भाजीपाला, फळं आपण पिकवणं आणि त्यावर रासायनिक जंतुनाशकांचा मारा न करणं आवश्यक आहे.
ट्रान गाम
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ज्ञ
अत्यंत प्रभावी AI Computer Scientist किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ असलेले तिम्नित गेब्रू या Distributed Artificial Intelligence Research Institute (DAIR)च्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालक आहेत. ही बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रभावाशिवाय काम करणारी, कृत्रिम बुद्धिमत्तेतून समाजोपयोगी संशोधन करू इच्छिणारी, स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहे.
चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञान वंशभेदी असल्याची टीका करून त्यांनी त्याविरोधात एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे आणि AI तंत्रज्ञानात कृष्णवर्णीयांना सामावून घेणं वाढावं यासाठी त्या आग्रही आहेत.
इथियोपियात जन्मलेल्या या कॉम्प्युटर शास्त्रज्ञ AddisCoder च्या संचालक मंडळावर आहेत. इथियोपियन विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवायचं काम ही संस्था करते.
गुगलच्या एथिकल एआय टीमच्या सहप्रमुख म्हणून काम करताना 2020 मध्ये त्यांनी एका शैक्षणिक शोधनिबंधाचं सहलेखन केलं. त्यात AI च्या भाषिक मॉडेल्समध्ये असणाऱ्या प्रश्नांची चर्चा केली. अल्पसंख्याकांविषयी तांत्रिक भेदाभेद आणि वंचित लोक आणि प्रदेशांविषयी एकात्मता यांचा अभाव असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
या रिपोर्टनंतर त्यांची कंपनीतून गच्छंती झाली. या शोधनिबंधात सुसंगत संबंधित संशोधनाकडे दुर्लक्ष केलं, असं कंपनीचं म्हणणं होतं. गेब्रू यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचंही कंपनीने जाहीर केलं. पण गेब्रू या मात्र कामाच्या ठिकाणी होत असलेल्या भेदभावाबद्दल आवाज उठवल्यामुळे आपल्याला राजीनामा द्यायला लावला, असं सांगतात.
अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेती
अमेरिकेच्या आर्थिक इतिहासकार आणि श्रम अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. महिलांचा रोजगार आणि लैंगिक आधारावरील वेतनातील तफावतीची कारणं यावर केलेल्या कामाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हा पुरस्कार आतापर्यंत केवळ तीन स्त्रियांना मिळाला आहे आणि कुठल्याही पुरुष सहकाऱ्याबरोबर संयुक्तरीत्या पुरस्कार न घेता एकटीने मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठात हेन्री ली प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून काम करतात आणि उत्पन्नातील भेदभाव, शिक्षण आणि स्थलांतर हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.
त्यांच्या सर्वांत प्रभावी शोधनिबंधांमधून त्यांनी स्त्रीचा करिअर आणि कुटुंब यासाठीच्या शोधाचा इतिहास नोंदवला आहे आणि स्त्रियांच्या करिअरवर आणि लग्नाच्या निर्णयांवर गर्भनिरोधक गोळीचा कसा आणि काय परिणाम होतो याचीही मांडणी केली आहे.
शास्त्रज्ञ
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट येथे सध्या संचालक म्हणून काम करणाऱ्या सुझॅन चोंबा सांगतात की मध्ये केनियातल्या किरिंयागा प्रांतात त्यांचं बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेलं. त्यामुळे आपल्यासारख्या इतरांना मदत करून त्यांचं जीवनमान उंचावण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली.
त्यांचं लक्ष प्रामुख्याने वन संरक्षण, जमीनींचं संवर्धन आणि आफ्रिकेच्या अन्न प्रणालीत बदल करण्याकडे आहे.
काँगो खोऱ्याच्या उष्णकटिबंधीय जंगलांपासून ते कोरड्या पश्चिम आफ्रिकन साहेलपर्यंत, तसंच पूर्व आफ्रिकेपर्यंत सगळीकडे अल्पभूधारक शेतकरी, विशेषत: महिला आणि तरुण लोकांसोबत चोंबा करतात. त्यांना त्यांच्या जमिनीचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करण्यात मदत करण्यास सुचवतात.
त्या आपलं ज्ञान सरकार आणि संशोधकांपर्यंत पोहोचवून त्यातून तीव्र हवामान बदलांचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने समाजबांधणी करण्यासाठी प्रयत्न करतात.
सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या देशातील बडे जागतिक नेते... त्यांच्याकडे खरं तर जगाला बदलू शकणारी आर्थिक सत्ता आहे.. ते काहीच करत नाहीत हे पाहून मला सगळ्यात जास्त त्रास होतो. पैसा, सत्ता आणि राजकारण त्यांना मागे खेचतात. या मनस्तापातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मग मी आफ्रिकेच्या तळागाळात फिरते. कामकरी महिला, तरुण मुलं यांच्याबरोबर काम करून त्यांनाच संरक्षण आणि संवर्धनाविषयी सांगते. अशातूनच आपली अन्न प्रणाली बदलू शकेल आणि मग धोरणही बदलू शकेल.
सुझॅन चोंबा
पशुवैद्यक
युगांडाच्या पुरस्कारप्राप्त पशुवैद्यक आणि संवर्धनवादी कार्यकर्त्या ग्लेडीस कालेमा-झिकुसोका या त्यांच्या देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पर्वतीय गोरिलांच्या संरक्षणाचं काम करतात. या गोरिलांच्या अधिवासावर हवामान बदलाचा विपरित परिणाम झाला आहे.
कॉन्झर्वेशन थ्रू पब्लिक हेल्थ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या त्या संस्थापक आणि सीईओ आहेत. माणूस, गोरिला आणि इतर वन्यजीव यांच्या एकत्रित अधिवासातून त्यांचं आरोग्य सुधारणं आणि यातून जैववैविध्य साधणं यासाठी त्यांची संस्था काम करते.
तीस वर्षं सातत्याने काम केल्यानंतर माउंटन गोरिलांची संख्या 300 वरून 500 पर्यंत पोहचवण्यात त्यांना यश आलं आहे. अतिधोकादायक स्थितीतून धोकादायक स्थितीतील जमात अशी या गोरिलांची नोंद झाली आहे.
कालेमा-झिकुसोका यांना राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमात 2021 साली चँपियन ऑफ द अर्थ म्हणून गौरवण्यात आलं.
हवामान संकटात मला दिसत असलेला आशेचा किरण म्हणजे या विषयाला ज्याची गरज होती ते प्राधान्य आता मिळताना दिसतंय. या संकटाचा सामना करण्यासाठी काही नावीन्यपूर्ण पद्धती अंगिकाराव्या लागतील आणि काही बदल करावे लागतील.
ग्लेडीस कालेमा झिकुसोका
सामाजिक मनोवैज्ञानिक
सामाजिक मानस शास्त्रज्ञ म्हणून आपल्या शैक्षणिक कारकीर्दीला फॅबिओला ट्रेजो यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी सुरुवात केली, त्यावेळी मेक्सिकोमध्ये स्त्रियांचे लैंगिक सुख आणि सामाजिक न्याय याविषयी एकही संशोधन उपलब्ध नव्हतं.
स्त्रियांच्या लैंगिक न्यायाच्या हक्कांना ट्रेजो यांनी त्यांच्या कामातून वाचा फोडली. त्यांचं संशोधन सामाजिक विषमता, लैंगिक हिंसाचार आणि लैंगिक सुखाची राजकीय शक्ती यावर भाष्य करतं.
काही ठिकाणच्या विषमतांमुळे स्त्रिया लैंगिकदृष्टया खचतात. लैंगिक सुखाच्या कल्पना, समज-गैरसमजस, हस्तमैथुन, ऑरगॅझम याविषयी जाहीरपणे बोलून, कार्यशाळांच्या माध्यमातून आणि शास्त्रीय संशोधन मांडून त्या आपले मुद्दे समाजापर्यंत पोहोचवतात.
लॅटिन अमेरिका आणि स्पॅनिश भाषिक देशांमध्ये अजूनही महिला आरोग्य आणि स्त्रियांची लैंगिकता हे विषय अजूनही निषिद्ध मानले जातात. तिथे ट्रेजो यांचं काम महत्त्वाचा आवाज म्हणून पुढे येतं.
ध्वनिमुद्रक
हातात टेप रेकॉर्डर घेऊन इसाबेला डिलुझीक युरोपातल्या सर्वांत चांगल्या पद्धतीने जतन केलेल्या जंगलात चालायला लागतात. पोलंडमधील बियालोवेइझ या संवर्धित वनात वेगवेगळे आवाज टिपण्यासाठी त्या बाहेर पडतात.
फील्ड रेकॉर्डिस्ट म्हणून त्यांचं या पुरुषप्रधान क्षेत्रातील काम फक्त एक तरुण स्त्री म्हणून वेगळं नाही. पण त्या स्वतः अंध असूनही आपलं काम चोख करतात, हे यातलं वेगळेपण आहे.
वयाच्या 12 व्या वर्षी इसाबेलाला कुटुंबीयांकडून टेप रेकॉर्डर मिळाला. तेव्हापासून त्यांना पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज टिपायचा छंद जडला. फक्त आवाजावरून त्या पक्षांच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती ओळखतात.
आपण एकमेकांमध्ये कितीही भेदाभेद पाहात असलो तरी निसर्गाने भरभरून दिलेले "जे जे उत्तम, उदात्त, सुंदर ते" मला शेअर करायला मिळतं हे एक प्रकारे भाग्यच, असं त्या मानतात.
शास्त्रज्ञ आणि संशोधक
अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टि्टूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या कॅनान डॅगडेविरेन यांनी नुकताच वेअरेबल अल्ट्रासाउड पॅच शोधून काढला आहे. स्तनांच्या कर्करोगाचं लवकर निदान होण्यासाठी हे अंगात घालता येईल असं उपकरण आहे.
त्यांच्या आत्याला वयाच्या 49 व्या वर्षी शेवटच्या स्टेजमधील ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि त्या सहा महिन्यात गेल्या. त्यांचं नियमितणे कॅन्सर स्क्रीनिंग होत असूनही हा रोग लक्षात आला नाही. या घटनेने कॅनान यांना संशोधनासाठी प्रेरित केलं.
स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असणाऱ्या स्त्रियांना ब्राच्या आत घालून ठेवता येईल आणि सातत्याने चाचणी होईल असं कॅन्सर निदान करण्याचं उपकरण त्यांनी शोधून काढलं. आजारी आत्याच्या बेडशेजारी बसूनच त्यांनी या उपकरणाचं डिझाइन केलं. या तंत्रज्ञानाने हजारोंचे प्राण वाचू शकतात.
वैद्यकीय तज्ज्ञ
गर्भपाताविषयी युरोपातील सर्वांत कडक नियम माल्टा देशात आहेत. नताली पीसैला याविषयी गरजू महिलांना माहिती देण्याचं आणि सल्ला देण्याचं काम करतात.
डॉक्टर्स फॉर चॉइस माल्टा नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. गर्भनिरोधकाचा वापर सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी गर्भपाताचे गुन्हेगारीकरण रोखायचा आणि गर्भपात कायदेशीर करायचा त्या पुरस्कार करतात.
डॉ. नताली म्हणतात, केवळ स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण झाला तरच माल्टामध्ये गर्भपाताला कायदेशीर परवानगी मिळते. याचा अर्थ नकोशा गर्भाला पाडण्यासाठी स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच गोळ्या घेत राहतात. गर्भपातापूर्वी, गर्भपाताच्या वेळी आणि त्यानंतर महिलांना मदत करण्यासाठी त्यांनी हेल्पलाइन सुरू केली आहे.
10 ते 13 वर्षं वयोगटातील मुलांना लैंगिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने 'माय बॉडीज फँटास्टिक जर्नी' हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. देशाचं प्रजनन आरोग्य वाढीस लागावं यादृष्टीने ज्ञान वाढवाण्यास मदत करण्याचा त्यामागचा विचार आहे.
एक्सपीडिशन गाइड
हिमनद्या या स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचा गोड्या पाण्याचा स्रोत म्हणून उपयुक्त असतात. पण कोलंबियातील हिमनद्या झपाट्याने नष्ट होत आहेत.
एके काळी अस्तित्वात असलेल्या 14 हिमनद्यांपैकी केवळ 6 सध्या जिवंत राहिल्या आहेत आणि त्याही नष्ट होण्याची भीती आहे. याबद्दल जनजागृती निर्मण करण्याच्या उद्देशाने 'कुम्ब्रेज ब्लँकास' म्हणजे धवल शिखरे नावाने मार्सेला फर्नांडिझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक स्वयंसेवी संस्था सुरू केली.
शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या अभ्यास दौऱ्यांमधून आणि त्यासाठी गिर्यारोहक, फोटोग्राफर, शास्त्रज्ञ आणि कलाकार यांचा गट जमवून फर्नांडिझ हिमनद्यांचं बारकाईने निरीक्षण करतात आणि बदलांची नोंद ठेवतात. हिमनद्या वाचवण्यासाठी कल्पक मार्ग त्या शोधून काढतात.
पॅझाबोर्डो म्हणजे Peace on Board नावाने त्यांनी आणखी एक संलग्न प्रकल्प सुरू केला आहे. कोलंबियात 50 वर्षं सुरू असलेल्या अंतर्गत कलहात हिंसाचाराने होरपळलेल्या भागांचा दौरा त्या करतात.
हिमनद्यांनी मला दुःखाशी सामना कसा करायचा, अनुपस्थितीला कसं सामोरं जायचं ते शिकवलं. तुम्ही त्यांचा आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला जाणवतं की, त्यांना गमावणं म्हणजे कधीही आपण भरून काढू शकणार नाही अशी हानी आहे. पण तरीही आपण थोडंफार योगदान देऊच शकतो, त्याने फरक पडेल.
मार्सेला फर्नांडिझ
डायरिस्ट आणि चिरंतन विकास प्रवर्तक
2018 पासून नियमितपणे स्थानिक झाडांच्या निरीक्षणातून पाण्याचे बदललेले स्रोत, आणि हवामानातील बदलांच्या नोंदी बायांग आपल्या इको डायरीत करत आहेत.
चीनच्या किंघाई प्रांतात त्या राहतात. हा भाग जवळपास तिबेटच्या पठारालगत आहे. तिथल्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने हवामान बदलाचे चटके जाणवू लागले आहेत. हिमनद्या वितळणे आणि वाळवंटीकरण असे परिणामही दिसू लागले आहेत.
सांजियांग्वान महिला पर्यावरणवाद्यांच्या नेटवर्कच्या त्या भाग आहेत. आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या कामासाठी त्या प्रयत्न करतात.
लिप बाम, साबण, पिशव्या अशी इको फ्रेंडली उत्पादनं तयार करण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं आहे. यातून स्थानिक जलस्रोतांचं संरक्षणही होतं आणि इतरांना पर्यावरणीय उपक्रमांत सहभागी होण्याची प्रेरणा मिळते.
स्वयंसेवी बचाव कार्यकर्ती
2017 मध्ये सीरियात नागरी युद्धाचा भडका उडाला त्या वेळी अमिना अल बिश यांनी सीरिया सिव्हील डिफेन्स या स्वयंसेवी संस्थेत दाखल व्हायचं ठरवलं. व्हाइट हेल्मेट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत दाखल होणाऱ्या त्या पहिल्या महिला स्वयंसेवक होत्या. युद्धग्रस्त भागात नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणं आणि जखमींना प्राथमिक उपचार पुरवण्याचं काम ही संस्था करते.
सीरिया आणि टर्कीला फेब्रवारी 2023 मध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपग्रस्त भागात बचावकार्यही अमिना यांनी केलं. त्यांचं स्वतःचं कुटंब या भूकंपाच्या तडाख्यात सापडलं होतं आणि त्यांचे सख्खे नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकले होते.
अमिना या सध्या त्यांच्या समाजाच्या उत्तर सीरिया भागात जिथे अजूनही युद्ध सुरू आहे, तिथे राहणाऱ्या इतर महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करत आहेत. त्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. शांततापूर्ण सीरिया उभा करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
मिडवाइफ (सुईण/प्रसविका)
गेल्या वर्षी पाकिस्तानात महापूर आला असताना नेहा मंकणी यांनी प्रलयातही पूरग्रस्त भागातून फिरत गरजू स्त्रियांच्या प्रसूतीच्या गरजा पूर्ण केल्या.
ममा बेबी फंड या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मंकणी आणि त्यांच्या टीमने गावोगावी जात 15000 पूरग्रस्त कुटुंबांना बर्थिंग किट पुरवली आणि प्रसूतीसाठीच्या वेळी काळजी घेतली.
नेहा मंकणी या नेहमीच कमीत कमी खर्चात, किमान स्रोत वापरून गरजूंपर्यंत तत्काळ सुविधा पुरवतात आणि विशेषतः नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागापर्यंत प्रसूतीसेवा देतात.
ममा बेबी फंडने आता बोट अँब्युलन्स सुरू करण्याएवढा निधी उभा केला आहे. किनारी भागात राहणाऱ्या गरोदर स्त्रियांना वेळी-अवेळी जवळच्या रुग्णालयापर्यंत आणि दवाखान्यापर्यंत तत्काळ पोहोचवण्याचं काम या बोटीतील रुग्णवाहिका करतील.
विपरित हवामानामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या गावांपर्यंत प्रसविकेची सेवा पोहोचणं महत्त्वाचं आहे. आम्ही दोन्ही कामं करतो - आपत्कालीन स्थितीत आम्ही त्याच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतो आणि आम्ही पर्यावरणीय कार्यकर्ते म्हणूनही काम करतो. आपत्कालीन स्थितीतही गरोदर स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात लागेल ती मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
नेहा मंकणी
पर्यावरण सल्लागार
संपूर्ण आफ्रिका खंडासाठी प्रेरणादायी नेत्या ठरलेल्या वंजारा मथाई या सामाजिक आणि पर्यावरणीय बदल घडवून आणण्यासाठी गेली 20 वर्षं अथक प्रयत्न करत आहेत.
त्यांची आई वंगारी मथाई यांनी सुरू केलेल्या ग्रीन बेल्ट मूव्हमेंटच्या त्या प्रमुख आहेत. या चळवळीने केनियातील गावखेड्यातील महिलांना एकत्र करून त्यांना झाडं लावायला लावली आणि त्यांचंही सबलीकरण केलं. वंगारी मथाई यांना या कामासाठी 2004 चा नोबेल (शांतता)पुरस्कार मिळाला होता.
वंजिरा मथाई या आता वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्लोबल पार्टनरशिप्स आणि आफ्रिकेच्या संचालिका आहेत. वंगाई मथाई फाउंडेशनच्या प्रमुख म्हणूनही त्या काम पाहतात.
बेझोस अर्थ फंडच्या आफ्रिका सल्लागार, क्लीन कुकिंग अलायन्स आणि युरोपीयन क्लायमेट फाउंडेशनच्यादेखील त्या सल्लागार आहेत.
कृती ही स्थानिकच असते. म्हणूनच आपण वनाधारित उद्योग आणि संवर्धनासाठी, अक्षय उर्जेसाठी आणि त्यातून अर्थचक्राला चालना देणाऱ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे.
वंजिरा मथाई
अर्ली मेनोपॉज कँपेनर
अनियमितपणे येणारी पाळी हे कुठल्या इतर गंभीर गोष्टीचं लक्षण आहे याचा इसाबेस फारिअल मेयर यांना पत्ताच नव्हता. पण वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांना अर्ली मेनोपॉज आला. ते पाळी जाण्याचं म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हेरिअन फेल्युअरचं लक्षण होतं. ओव्हरीजचं म्हणजे अंडाशयाचं काम अचानक बिघडतं तेव्हा असं होतं. जगभरातील 40 च्या आतल्या 1 टक्के स्त्रियांना हा त्रास होतो.
या आजारात स्त्रियांना मेनपॉजसारखीच लक्षणं जाणवतात, फक्त तो खूपच कमी वयात येतो. फारिअस यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल, त्यामुळे आयुष्य कसं बदललं, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसून होणं आदीसुद्धा लवकर आयुष्यात कसे आले याविषयी खुलेपणाने बोलायला सुरुवात केली.
30 वर्षांच्या या पत्रकार स्त्रीने लॅटिन अमेरिकेतलं पहिलं अर्ली मेनोपॉज नेटवर्क सुरू केलं. यातून या स्थितीबद्दल, लक्षणांबद्दलचे समज-गैरसमज दूर करून खरी माहिती पोहोचवण्याचा उद्देश होता. या स्थितीत जगणाऱ्या स्त्रियांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी हे नेटवर्क सुरू झालं.
हवामान सल्लागार आणि विकलांग हक्क
इल्हाम युसेफिआन या मानवाधिकार चळवळीतील तडफदार वकील असून त्या स्वतः अंध आहेत. हवामान बदलाबद्दलच्या प्रश्नांची चर्चा करताना विशेषतः पर्यावरणीय घटनांवरच्या प्रतिक्रियांचा विचार करताना विकलांग व्यक्तींना सामावून घ्यावं यासाठी त्या आग्रही आहेत.
इराणमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या युसेफिआन 2016 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. इंटरनॅशनल डिसेबिलिटी अलायन्स या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये त्या आज महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. या नेटवर्कमध्ये विकलांगांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 1100 वर संस्था सहभागी आहेत.
हवामान बदलाच्या परिणामांचा विचार होताना विकलांगांचा विचार करणं अपरिहार्य असल्याचा धडा धोरणकर्त्यांना देणं हे त्यांचं ध्येय आहे. विकलांग व्यक्तींमध्ये हवामान संकटाशी सुरू असलेल्या लढ्यात योगदान देण्याचं मोठं सामर्थ्य असल्याचंही त्या आवर्जून सांगतात.
आम्ही, अपंग व्यक्ती किचकट आव्हानांवर मात करण्याची आणि सरळ सरळ न दिसणाऱ्या प्रश्नांवरही उपाय शोधण्याची आमची क्षमता वेळोवेळी सिद्ध करत आलो आहोत. अपंग व्यक्ती हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर उभ्या राहू शकतात आणि आणि त्यांनी तसं उभं राहायला हवं.
इल्हाम युसेफिआन
शास्त्रज्ञ
स्त्रिया आणि मुलींनो, तुम्ही हवामान बदल संकटावरील उपाययोजनांचा भाग आहात' असा विषय ओमानी शास्त्रज्ञ रुमायता अल बुसाइदी यांनी 2021 च्या TED talk मध्ये मांडला होता. हा व्हिडीओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आणि यातूनच अरब जगातील महिला हक्कांबद्दल त्यांचा आग्रह दिसला.
अल बुसाइदी या त्यांच्या अभ्यासामुळे अरब युथ कौन्सिल फॉर क्लायमेट चेंज आणि एन्व्हार्नमेंट सोसायटी ऑफ ओमान या संस्थांमध्ये चांगल्या पदांवर पोहोचल्या.
त्यांनी अमेरिकेच्या बायडेन सरकारला परकीय मदत देताना पर्यावरणाचा विचार करण्याचा सल्ला दिला आणि ग्रीनलँड सरकारला शाश्वत पर्यटनाबद्दल सल्ला दिला आहे.
दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या त्या सर्वांत तरुण ओमानी महिला आहेत. अरब महिलांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यांनी वुमनएक्स नावाचा मंचही स्थापन केला आहे.
हवामान बदलाला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे महिला आणि मुलींचं सबलीकरण. त्यांचा समाजात बहुपेडी आणि गुणक प्रभाव असल्याने त्या समज बदलण्यासाठी आणि कृती करण्यासाठी भाग पाडतील. आपण ज्याला आपलं घर मानतो ती जागा वाचवायची असेल तर हे करायला हवं.
रुमायता अल बुसाइदी
बालहक्क कार्यकर्ती
युद्धाच्या धक्क्यातून युक्रेनची मुलं सावरावीत यासाठी त्यांना मदत करण्याचं ओलेना रोझवाडोवस्का यांचं ध्येय आहे. व्हॉइसेस ऑफ चिल्ड्रेन नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या त्या सहसंस्थापक असून त्यांची संस्था लहान मुलांना मानसिक आधार देण्याचं काम करते.
रोझवाडोवस्का यांनी डोनबासच्या आघाडीवर स्वयंसेवक म्हणून सेवा दिली होती. त्या वेळी रशियाच्या पाठिंब्याने फुटीरवाद्यांनी युक्रेनविरोधात तिथे लढाई सुरू केली होती. यानंतर चार वर्षानी 2019 मध्ये तळागाळातील उपक्रम म्हणून रोझवाडोवस्का यांनी संस्था सुरू केली.
आता त्यांच्या फाउंडेशनमध्ये 100 मानसोपचारतज्ज्ञ काम करतात. त्यांची 14 केंद्रं आहेत आणि फ्री हॉटलाइन सेवाही आहे. हजारो मुलं आणि पालकांनना त्यांच्या या सेवेचा फायदा झाला आहे.
रोझवाडोवस्का यांनी ऑस्कर नामांकित माहितीपटात - अ हाउस मेड ऑफ स्प्लिंटर्स मध्ये काम केलं. वॉर थ्रू द व्हॉइसेस ऑफ चिल्ड्रेन नावाचं पुस्तकही त्यांनी आणि त्यांच्या टीमने प्रकाशित केलं आहे.
वाहतूक सुरक्षा प्राध्यापिका
गेली अनेक दशकं नवी कार निर्माण करताना सर्वसाधारण पुरुषांची ठेवण लक्षात घेऊन क्रॅश टेस्ट डमी तयार केल्या जातात. वास्तविक आकडे सांगतात की, समोरासमोर टक्कर झाली तर अपघातात जबर जखमी होण्याचा किंवा मृत्यू पावण्याचा धोका स्त्रियांमध्ये अधिक असतो.
ॲस्ट्रिड लिंडर या इंजिनीअर महिलेने हे बदलायचं ठरवलं. जगातली पहिली सर्वसाधारण आकाराची फीमेल क्रॅश टेस्ट डमी तयार करण्याच्या प्रकल्पाचं नेतृत्व ॲस्ट्रिड यांनी केलं. या क्रॅश टेस्टसाठी त्यानी स्त्रीच्या शरीराचा आकार, ठेवण विचारात घेतली.
स्वीडिश नॅशनल रोड अँड ट्रान्सपोर्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमद्ये वाहतूक सुरक्षा हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका आणि चामर्स युनिव्हर्सिटीत सहायक प्राध्यापक पदावर असणाऱ्या लिंडर बायोमेकॅनिक्स आणि रस्ते अपघातातील दुखापतींपासून बचाव या विषयांतील तज्ज्ञ आहेत.
स्टोरीटेलर
एक पर्यावरणवादी आणि कंटेण्ट क्रिएटर म्हणून काम करणाऱ्या कियूँ वू सोशल मीडियामधून आपल्या हवामान बदलाविषयीच्या कल्पना मांडत असतात.
The Weird and the Wild या त्यांच्या ऑनलाइन मंचाच्या माध्यमातून हवामानशास्त्र हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि कमी किचकट आणि कमी भीतीदायक रूपात तो मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी काय कृती करता येईल याविषयी जागृती, शिक्षण देऊन समाजाला जोडून ठेवण्याचं काम त्या करतात.
आग्नेय आशियातील पर्यावरणविषयक बोलणारं क्लायमेट चीजकेक नावाचं पॉडकास्ट त्या नियमित करतात. त्यामधून हवामानविषयक किचकट तथ्य आणि माहिती त्या साध्या-सोप्या शब्दांतून पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
नॅशनल जिओग्राफिक यंग एक्सप्लोरर हीसुद्धा त्यांची एक ओळख आहे.
हवामानविषयीचे प्रश्न हे गुंतागुंतीचे, किचकट आणि भीतीदायक आहेत. आपण त्यांना घाबरून राहण्याऐवजी त्यांच्यापर्यंत आक्रमकपणे पण थोड्या कुतूहलासह थेटपणे भिडू शकतो. म्हणजे जगाची काळजी घ्यायला आपलं मन आपण थोडं मोठं करू शकू. कारण तसं झालं तरच अनावश्यक ते तोडून टाकण्यासाठी आपण आपली शस्त्र परजू आणि आवश्यक ते उभारण्यासाठी सज्ज राहू.
कियूँ वू
कण भौतिकज्ञ
ॲनामारिया फाँट व्हिलारोएल या पार्टिकल फिजिक्स किंवा कण भौतिकशास्त्रातल्या संशोधक असून त्यांनी सुपरस्ट्रिंग सिद्धांतावर काम करत आहेत. निसर्गातील सर्व कण आणि मूलभूत शक्ती म्हणजे अगदी सूक्ष्म, कंपनशील उर्जेच्या पट्ट्याआहेत असं मानून तो सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
प्रा. फाँट यांच्या संशोधनाने सिद्धांताच्या परिणामांचा विचार करता पदार्थाची संरचना आणि क्वांटम सिद्धांत याविषयीची समज वाढली आहे. कृष्णविवरांचे अस्तित्व आणि बिग बँग नंतरच्या पहिल्या काही क्षणांची माहिती यासंबंधीदेखील या संशोधनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
फाँट यांना यापूर्वी Fundación Polar पुरस्कार व्हेनेझुएलात मिळाला आहे आणि यंदाच्या वर्षी युनेस्को विमेन इन सायन्स या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली.
वनव्यवस्थापक
इंडोनेशियाचा 'आस्चेह' प्रांत तसा रूढीवादी. तिथे एखाद्या स्त्रीने नेतृत्व करणं तसं दुर्मिळच!
सुमिनी यांना आपल्या गावात आलेल्या भीषण पुरामागे वृक्षतोड हे कारण असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी पर्यावरण बचावासाठी कृती करण्याचं ठरवलं. आसपासच्या परिरातील स्त्रियांना एकत्र घेत त्यांनी कृतीगट स्थापन केला.
पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून त्यांच्या गटाला दामारन बारू गावातील समाजाबरोबर 251 हेक्टरचं वनक्षेत्र 35 वर्षं सांभाळण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
गावातील वनव्यवस्थापन केंद्र (LPHK)आता त्या सांभाळतात. सुमात्राचे वाघ, पँगोलिन्स आणि इतर नामशेष होऊ पाहणारे वन्यजीवांचं रक्षण करणं, त्यांना शिकाऱ्यांपासून वाचवणं आणि अनधिकृत वृक्षतोडीला आळा घालण्याचं काम त्या करतात.
अनिर्बंध वृक्षतोड आणि वन्यजीवांची शिकार यामुळे आता जंगलांकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. कारण तरच आपण एकत्रितपणे हवामान संकटाचा सामना करू शकू. जंगल वाचवा, जीवन वाचवा.
सुमिनी
कार्बन इम्पॅक्ट टेक एक्स्पर्ट
चिरंतन विकासासाठी प्रयत्नवादी असणाऱ्यांपैकी एक अॅना हुत्तुनेन या फिनलंडच्या लाहती शहराच्या पर्यावरणस्नेही, मोकळ्या, शुद्ध आणि अधिक प्रभावी विकासासाठी प्रयत्न करतात. त्यांना त्यासाठी 2021 चा युरोपीयन ग्रीन कॅपिटल पुरस्कार मिळाला.
शहरात पर्सनल कार्बन ट्रेडिंग मॉडेल राबवून त्यांनी नागरिकांना ते किती उर्जा जाळतात याचा हिशोबच ठेवायला लाहला. जगातलं हे पहिलं अॅप आहे, ज्यात नागरिक पर्यावरणस्नेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा सायकल वापरून क्रेडिट्स मिळवू शकतात.
नेटझीरोसिटीज नावाच्या संस्थेसाठी त्या क्लायमेट न्युट्रल सिटीज अॅडव्हायजर म्हणून काम करतात. युरोपीयन शहरांना 2030 पर्यंत क्लायमेट न्यूट्रल म्हणजे हवामान बदलाचा परिणाम होणार नाही अशी शहरं बनवण्याच्या उद्देशासाठी ही संस्था काम करते.
सस्टेनेबल मोबिलिटीसाठी इतरांनीही प्रेरित व्हावं असं अॅना यांना वाटतं. सायकलिंगसारख्या वाहतूक साधनाचा त्या जोमाने प्रसार करतात. भविष्यातील शहरी वाहतुकीसाठी सायकल हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं त्या मानतात.
आपल्या नागरिकांना अधिक सुकर अक्षय आयुष्य लाभावं यासाठी जगभरातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये काही उत्तम काम करणारी माणसं आहेत. तुम्ही तुमच्या वाट्याचं काम चोख केलंत आणि इतरांना सामावून घेतलंत तर आपोआपच बदल घॅडून येईल.
अॅना हुत्तुनेन
दरवर्षी बीबीसी जगभरातील 100 प्रेरणादायी आणि प्रभावी महिलांची नावं बीबीसी 100 विमेनच्या यादीत जाहीर करते. आम्ही त्या स्त्रियांच्या मुलाखती, त्यांच्या आयुष्याबद्दलची फीचर आणि माहितीपट तयार करून त्यांच्या स्त्रीकेंद्रित कहाण्या बीबीसीच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरून प्रकाशित आणि प्रसारित करतो.
BBC 100 Women ला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. #BBC100Women असा हॅशटॅग वापरून यासंदर्भातल्या संवादात सामील व्हा.
बीबीसी मीडिया अॅक्शन यासंदर्भात संशोधन करते आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या जगभरातील लँग्वेज टीम्सच्या नेटवर्कमधून यासंदर्भात नावं सुचवण्यात येतात. या संशोधन आणि संकलनानंतर बीबीसी 100 विमेनची टीम यादी तयार करते.
गेल्या 12 महिन्यांत ज्यांनी बातम्यांच्या शीर्षकांमध्ये स्थान मिळवलं आहे किंवा महत्त्वाच्या घडामोडींमध्ये प्रभाव पाडला आहे अशांचा आम्ही शोध घेतो. शिवाय ज्या स्त्रियांच्या कहाण्या प्रेरणादायी आहेत किंवा ज्यांनी काही महत्त्वपूर्ण यश मिळवत समाजाला प्रभावित केलं आहे पण ज्यांच्या बातम्या होऊ शकलेल्या नाहीत अशांचाही आम्ही विचार करतो.
ही नावं शोधताना यंदाची थीम - हवामान बदल आणि त्याचा जगभरातील महिला आणि मुलींवर होणारा विपरित परिणाम - याचाही प्राधान्याने विचार झाला. त्यातून 28 हवामान प्रवर्तक आणि पर्यावरणवादी नेत्या निवडल्या गेल्या.
आम्ही वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचा अवलंब करणाऱ्या आणि मतभेद असलेल्या विषयांवर काम करणाऱ्या स्त्रिया, ज्यांनी त्यांच्या बदलाच्या प्रक्रियेत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, अशांचाही या यादीत समावेश केला आहे.
यादीला अंतिम रूप देण्याअगोदर आम्ही प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि निःपक्षपातीपणाच्या फुटपट्टीवरही ही नावं मापून घेतली. या यादीतील सर्व स्त्रियांची त्यांच्या सहभागाला संमती दिली आहे.
बीबीसी 100 विमेन प्रॉडक्शन टीम: व्हॅलेरिया पेरास्सो, अमेलिया बटर्ली, रिबेका थॉर्न, पॉला अॅडामो इडोएटा, कॉर्डेलिया हेमिंग, लॉरा गार्सिया, सारा डियाझ, ल्युसी गिल्डर, मै कन्नानेह, मार्क शिया, वंदना विजय, किंदा शैर, हया अल बदरनेह, दारिया तारादाइ, लामीस अल्तालेबी, फिरौझी अकबरिअन, सारा साफी, कटेरिना खिनकुलोव्हा, तामारा गिल, मौना बा आणि ख्रिस क्लेटॉन
बीबीसी 100 विमेन एडिटर: गोलनूश गोलशानी
वर्ल्ड सर्व्हिस लँग्वेजेससाठी प्रॉडक्शन: रॉबर्टो बेलो-रोव्हेला आणि कार्ला रॉश
डिझाइन: प्रिना शाह, जेनी लॉ, मॅट थॉमस, पॉलीन विल्सन आणि ओली पॉवेल
डेव्हलपमेंट: स्कॉट जार्विस, अरुण भारी, अलेक्झांडर इव्हानोव, प्रीती वाघेला आणि होली फ्रॅम्प्टन
फोटो कॉपीराइट्स: मिलर मोबली, मॅकिएक टॉमिझेक/ऑक्सफर्ड एटेलियर, आरती कुमार-राव, हमना हक्की, क्रेग कोलेस्की, पॅनो एआय, एल. रीड, बेंजामिन जोन्स, योबर एरियास, अमांडा ट्रिपलेट, अॅनी रॉबर्ट्स, डियोर अब्दुघाफोर्जोडा, डोई इंथॅनन द्वारा UTMB, किंघाई स्नोलँड ग्रेटरिव्हर्स इनव्हिऱन्मेंटल प्रोटेक्शन असोसिएशन, जेसन बॉबर्ग, चैदर मह्युद्दीन/एएफपी, न्यू बॅलन्स पॅराग्वे, जो अॅन मॅकआर्थर, द कार्टियर वुमेन्स इनिशिएटिव्ह (सीडब्ल्यूआय), लुसी पायपर, लुईस माबुलो, ख्रिश्चन टासो, मार्टिन चांग, कॉन्स्टँटिन डेरियागिन, गॅब्रिएल क्विंटो, अबेल कॅनिझालेस, पॅट्रिक वॅली, साराह हेल, जिमेना माटेओट, लुकास क्रिस्टियनसेन, हाना वॉकर-ब्राउन, वुडी मॉरिस, झिन्यान यू, ख्रिस पार्कर एडझोर्डझी सेफोगाहट, तासीर बेग, अल्बर्ट कामांगा झीया क्रिएशन्स, सालेम सोलोमन, ल्यूक न्युजेंट, आर. डेव्हिड मार्क्स, ली टिन, लीक सातू/व्हीटीआय, फिफा, जोश फिन्चे, किबुका मुकिसा, फोबी जू, ग्रेगरी वेप्रीक, डार्को टॉमस क्रॉपिक्स, वांजिरा मथाई, रुफत एर्गेशोव्ह, ओस्वाल्डो फँटन, दानी पुजाल्टे, जिउलियानो साल्वाटोर, फौंडेशन लॉरिअल, डॅनियल एडवार्डो, तात्याना एगोरेवा, डोवाना फिल्म्स, जिमी डे/एमआयटी, एडिटोरियल कॅमिनहो - लिया, खाइन ह्निन वाई फाउंडेशन, अँड्र्यू सिकोर्स्की, रॅमन टोलोसा कॅल्डेरॉन, मरियम सिद्दीकी, फेरल फिल्म्स, सेबॅस्टियन अलियागा, डायोर अब्दुघफोर्झोडा, द व्हाईट हेल्मेट्स/सीरिया सिव्हिल डिफेन्स, एली नुग्ले वार्ले, एली डिफ्ले, अबुमेनेस, इमानुएल एलो उसाई, फजल रहम अरमान, एमिलिया ट्रेजो, मॅटिया झोपेलारो, मार्टिन लुप्टन/लाइट कलेक्टिव्ह, यास्मिना बेन्सलिमाने, पावलो बोटानोव, मारिजेटा मोजासेविक, लेनाड्रा पेला/इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट क्लाइंबिंग, गॅल मोसेन्सन, गेटी इमेजेस